आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrimant Kokate Article About Shivaji Maharaj, Divya Marathi

छत्रपती शिवाजी महाराज : धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, लोकाभिमुख राजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोककल्याण, सुशासन, बालक व महिलांचा सन्मान, समताधिष्ठित आणि अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार चालवण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणातून मिळते. त्यांनी स्वत: कधीही जात अथवा धर्मभेद केला नाही. इतिहासात डोकावताना असे लक्षात येते की, त्यांनी विज्ञानवादाची साथ कधीही सोडली नाही. त्यासाठी अनेक दाखले देता येतील.
महाराजांच्या दरबारात कधीही भेदाभेद केला गेल्याचा पुरावा आपल्याला आढळत नाही. धर्मस्थळ, धर्मग्रंथ, स्त्रिया, बालके आदी शत्रूंची जरी असली तरी त्यांचा योग्य दर्जा आणि सन्मान राखला गेला पाहिजे, असे स्पष्ट आदेश त्यांनी आपल्या प्रांताध्यक्षांना दिलेले होते. दुष्काळग्रस्तांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची कल्पना सर्वप्रथम त्यांनीच आपल्या राज्यात मांडली अन् ती काटेकोरपणे अमलातही आणली. महाराजांनी दिलेले लढे हे राजकीय स्वरूपाचे होते. त्यांनी कधीही कुठल्याही लढाईला धार्मिक अथवा जातीचे स्वरूप दिले नाही. मोगल, आदिलशहा, इंग्रज आणि पोर्तुगीजांसोबत त्यांनी अनेक संघर्ष केले. मात्र लढ्यांना धार्मिक रंग चढू दिला नाही. तलवारी चालवल्या त्या राजकीय हेतूने. धर्मवादाचा लवलेशही त्यांनी लढायांना येऊ दिला नाही. किंबहुना त्यांच्या कधी ध्यानीमनीही असे विचार आले नाहीत.
सर्व भाषांवर प्रेम
आताचे राजकारणी भाषा, जात आणि धर्माच्या नावाने आपले ‘ईप्सित’ साध्य करताना दिसतात. महाराजांनी मात्र कधीही भाषेविषयी भेद केला नाही. त्यांना स्वत:ला पाच भाषा येत होत्या. मराठी, संस्कृत, कन्नड, फारसी आणि हिंदी भाषा त्यांनी अवगत केल्या. महाराजांचाच आदर्श घेऊन राजकारणात आलेल्या नेत्यांनी हिंदीला विरोध करून इंग्रजीला परकीय भाषा म्हणून हिणवले. मात्र भाषेच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ इच्छिणाया तमाम तरुणांनी जास्तीत जास्त भाषांवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे. जर्मन, इंग्रजी, जपानी आदी भाषा आल्याच पाहिजेत, त्यासाठी हवे ते प्रयत्न करावेत.
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी त्वरित प्रांताध्यक्षांना पत्र लिहिले. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करा, दुष्काळग्रस्तांची बैलजोडी दगावली असेल तर त्यांना बैलजोडी द्या, खंडी-दोन खंडी धान्याची रसद द्या. राज्याच्या तिजोरीवर बोजा पडला तरीही काहीच हरकत नाही. पण गरजेनुसार सर्वांना मदतीचा हात देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी केल्या. त्याशिवाय वसुलीचा तगादाही लावू नका, असेही निक्षून सांगितले होते.
महिला शत्रूंच्या शौर्याचाही सन्मान
कर्नाटक राज्यातील बेलवाडी किल्ल्यावर महाराजांच्या सैन्याने स्वारी केली होती. बेलवाडी किल्ला अजिंक्य राहण्यासाठी सावित्रीबाई नावाच्या एका शूर महिलेने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र युद्धानंतर झालेल्या तहामध्ये महाराजांनी सावित्रीबाईच्या शौर्याची ‘तारीफ’ करत तिला तिचा किल्ला परत केला होता. स्त्रियांच्या पराक्रमाला - मग ती शत्रूच्या ‘खेम्या’तील असेल तरीही - महाराजांनी तिला योग्य मानसन्मान दिला. महाराजांचे औदार्य आजच्या पिढीने अंगीकारले पाहिजे. आपण किमान घरातील महिलांचा तरी मान राखला अन् स्त्रीजन्माचा आदर केला तरीही पुरेसे होईल असे वाटते.
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)