आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूरचे लोकमान्य टिळक ग्रंथालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर प्रसिद्ध आहे साखरेचे कोठार म्हणून, पण साखरेच्या या कोठारातही ग्रंथप्रेम जोपासणारी मंडळी आहेत. विशेष म्हणजे श्रीरामपूर नगरपालिकेने येथील ग्रंथचळवळ वाढवली आहे. सन 1956 च्या प्रजासत्ताक दिनी स्थापन झालेले नगरपालिकेचे लोकमान्य टिळक ग्रंथालय आपल्या सभासदांना आता 30 संगणक असलेले ‘इ-बुक्स ग्रंथालय’ उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकारची सुविधा देणारे राज्यातील हे पहिलेच अ वर्ग पालिका ग्रंथालय असेल. त्यासाठी ग्रंथालयाला 50 लाखांचा निधी मिळाला आहे. येत्या तीन महिन्यांत ही सुविधा वाचकांच्या सेवेत रुजू होणार आहे. वाचकांची सर्वाधिक मागणी असलेली एक हजार पुस्तके या योजनेत उपलब्ध केली जाणार असून, प्रकाशन संस्थांकडून मोफत मिळणारी इतर पुस्तकेही उपलब्ध केली जातील. वाचकसंख्या वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ग्रंथपाल एस. एफ. बागल यांनी सांगितले.
या ग्रंथालयामार्फत रात्री आठ ते अकरा या वेळेत चालवल्या जात असलेल्या ‘हरिभाऊ कुलकर्णी अभ्यासिके’ची क्षमता 60 असून विद्यार्थ्यांकडून महिन्याला नाममात्र 75 रुपये शुल्क आकारले जाते. दर वर्षी दिवाळीत ग्रंथ खरेदी करण्यापूर्वी वाचकांच्या शिफारशी मागवल्या जातात. खरेदीनंतर जुन्या व नव्या ग्रंथांचे प्रदर्शन भरवले जाते. ज्येष्ठ नेते व ग्रंथप्रेमी (कै.) अण्णासाहेब शिंदे, (कै.) रामराव आदिक यांच्या स्मृत्यर्थ राज्यातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या व्याख्यानमालेचे आयोजन ग्रंथालयातर्फे केले जाते. ज्येष्ठ पत्रकार (कै.) वसंतराव देशमुख यांच्या स्मृत्यर्थ आदर्श पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सन 2007 मध्ये राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रंथालयास मिळाला आहे.
शहरात मोक्याच्या जागी असलेले हे ग्रंथालय प्रशस्त म्हणजे 4 हजार 795 चौरस फूट जागेत आहे. 1978 मध्ये अ वर्ग मिळालेल्या या ग्रंथालयात सध्या 53 हजार 894 पुस्तके आहेत. सभासद संख्या 500 आहे. 30 दैनिके, 17 साप्ताहिके, 13 पाक्षिके व 89 मासिके वाचनालयात येतात. कर्मचारी वेतन व ग्रंथ खरेदीसाठी दरवर्षी 1 लाख 28 हजार रुपयांचे अनुदान मिळते. वेतन नगरपालिका देत असल्यामुळे ही संपूर्ण रक्कम पुस्तक खरेदीसाठीच वापरली जाते. ग्रंथालयाच्या वतीने वर्षभरात 50 महापुरुषांची जयंती किंवा स्मृृतीदिन साजरा केला जातो. एका अर्थाने लोकमान्य टिळक ग्रंथालय म्हणजे श्रीरामपूर शहराचे सांस्कृतिक केंद्रच बनले आहे.