Home »Magazine »Madhurima» Shrirang Jadhav Writes About Social Media

आज काय स्‍पेशल?

घरात बसवलेल्या घटांचे म्हणा वा गणपतीबाप्पांचे; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे म्हणा की पाडव्याच्या गुढीचे

श्रीरंग जाधव, पुणे | Sep 26, 2017, 03:00 AM IST

  • आज काय स्‍पेशल?
घरात बसवलेल्या घटांचे म्हणा वा गणपतीबाप्पांचे; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे म्हणा की पाडव्याच्या गुढीचे; होळीच्या पुरणपोळीचे म्हणा की दिवाळीच्या फराळाचे; फोटो काढून व्हाॅट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर करणं आता खूपच सर्वसामान्य आणि सर्वमान्यही झालंय.
पण असे फोटो पाहून, काही ‘स्पेशल’ न करणाऱ्यांना नेमकं काय वाटतं ते सांगणारी ही खुसखुशीत कव्हर स्टोरी.

सोशल मीडियाचा इतका प्रचंड उदय होण्यापूर्वी सांस्कृतिक आणि सामाजिक घुसळण आज दिसते आहे तेवढी नव्हती. मनुष्याची ऊठबस समान सामाजिक वर्गामध्येच बहुतांशी होत असे. वयोगटही साधारण सारखाच असे. आर्थिक परिस्थितीसुद्धा जवळपासचीच. राजकीय मते थोडीफार वेगवेगळी असत. पण त्यातही अगदीच टोकाचे मतभेद नसायचे. जातधर्म भलेही वेगवेगळे असले तरी विचारसरणी मिळतीजुळती असायची. त्यामुळे सांस्कृतिक धक्का असा प्रकार फारसा नसायचा. प्रत्येक जण आपापल्या वर्तुळात सुरक्षित असायचा. सोशल मीडियामुळे हे चित्र बदलले.
आपले सुरक्षित वर्तुळ भेदून लोकांचा संपर्क बाहेरील जगातील लोकांशी होऊ लागला. हा संपर्क उभा आणि आडवा अशा दोन्ही मितींमधील सामाजिक वर्गाशी झाला. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय तसेच वयोमानानुसार आणि भिन्नलिंगी इ. या सर्वच बाबतीत आपल्याहून कमी आणि अधिक स्तरांतील लोकांशी संपर्क प्रस्थापित झाला. एका अद्भुत जगाची ओळख या निमित्ताने झाली. एखाद्याच समान धाग्याने हे लोक जोडले गेले. काहींच्या बाबतीत थोडे अधिक समान धागे असतात. आवडनिवड हा समान धागा. तोही प्रत्येकासोबत वेगळा. म्हणजे कोणी संगीत आवडते म्हणून मित्र, तर कोणी वाचनाच्या आवडीमुळे जवळ आलेला. कोणी सिनेमाचा शौकीन, तर कोणी कलारसिक. एक आवड /छंद सोडल्यास दोघांत काहीच समानता नाही. ना वय ना आर्थिक स्थिती ना समाजातील स्थान ना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात डोकावायला मिळते आहे. किंवा असेही म्हणता येईल की, रोज एक सांस्कृतिक धक्का पचवायची मानसिक तयारी ठेवावी लागते आहे.
या घुसळणीचा एक भाग म्हणजे प्रत्येक रविवारी सगळीकडून अंगावर येणारा प्रश्न, ‘मग आज काय sunday special?’
या प्रश्नाच्या भीतीने रविवार उजाडू नये असेच आजकाल वाटते. पूर्वीच्या सुरक्षित कोशात रविवारही थोड्याफार फरकाने सारखेच असायचे. टिपिकल मध्यमवर्गीय रविवार.
सकाळी थोडेसे उशिरा उठून चहापाणी आवरून मुलांचे केस कापून आणणे वगैरे. मग शिकेकाई डोळ्यांत जाऊन कढत पाण्याने डोक्यावरून अंघोळी. रविवार स्पेशल शिरा खात रेडिओवर बालोद्यान. वडील मंडळी रविवारच्या बाजारात येणारा देशी भाजीपाला खरेदीसाठी रवाना व्हायची. बहुजन समाजात हमखास मांसाहारी जेवण असायचेच.
मुले जेवून गल्लीत काही तरी खेळ खेळायला उधळायची.
आईवडील कधी नव्हे ती मिळणारी दुपारची झोप स्वस्थपणे घ्यायचे. महिन्यातल्या पहिल्या रविवारी सिनेमाचा बेत असायचा. सिनेमा आणि एखादे आइस्क्रीम, किंवा हॉटेलमध्ये सर्व जण जाऊन डोसा-उत्तप्पा खाणं म्हणजे चैनीची कमाल.
स्पेशल म्हणजे हे इतकेच असायचे.
उलट बाकीचे रविवार म्हणजे धुण्याचे ढीग, कपड्यांना इस्त्री, पेपरची रद्दी, दळणे, किराणा भरणे, घराची साफसफाई, मुलांच्या वह्या तपासणे, जास्तीचे अभ्यास, चपलांची सायकलची गाड्यांची दुरुस्ती, कुकरच्या मिक्सरच्या रिंगा, धान्याची वाळवणे, नातेवाइकांची वास्तपुस्त... घरोघरी हेच.
माझ्या पिढीतल्या बहुतेकांचे रविवार अजूनही असेच असतात.
पण सोशल मीडियामुळे संपर्कात आलेल्या नव्या पिढीचा रविवार खरोखरच स्पेशल असतो.
सकाळी साधा चहा नसतो त्यांचा. ब्लॅक वा ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी वगैरेने त्यांचा रविवार सुरू होतो. आन्हिकं उरकून ते ब्रंचसाठी बाहेर पडतात. ही ठिकाणं ठरावीक असतात. तिथे आपसूकच त्यांचे मित्रही भेटतात. किमान दोनअडीच तास तरी हा ब्रंच चालतो.
तिथूनच एखाद्या मूव्हीचा प्लॅन होतो. गाड्या मल्टिप्लेक्सकडे वळतात. नवीन ट्रेंडिंग मूव्ही नसेल तर जवळचे एखादे पिकनिक स्पॉट विचारात घेतले जाते. जाता जाता एखाद्या वाइन शॉपमधून थंड बिअर गाडीत टाकली जाते.
वर्ल्ड इकॉनॉमी, हॉलीवूड मूव्हीज, सब्यसाची/रितूकुमारची नवीन डिझाइन्स, अॉडीचे नवे मॉडेल, वीकेंड होम किंवा फार्महाउस प्लॉट्सचे अॉप्शन, आयफोन चांगला की नोट थ्री, मोदींचे गुणगान, राहुलचे विनोद यावर मनसोक्त गप्पा मारत, अधूनमधून निसर्गाच्या पार्श्वभूमीवर सेल्फ्या काढत, बिअर संपल्याबद्दल खंत व्यक्त करून गाड्या पुन्हा शहराच्या दिशेने वळतात.

जे मल्टिप्लेक्समध्ये मूव्ही बघायला गेलेले असतात ते आणि पिकनिकवाले असे दोघेही संडे असूनही मॉलमध्ये गेलो नाही तर पाप लागेल या भीतीने खचाखच भरलेल्या मॉलमध्ये टाइमपास म्हणून पंधरावीस हजारांची किरकोळ शॉपिंग करतात. पुरेसा अंधार झाल्यावर शॉपिंग बॅग्ज मागच्या सीटवर फेकून एखादा मस्त लाउंज गाठला जातो.
नाउ इज द टाइम टू चिल आउट बेबी. आणि कधीतरी बेरात्री संडे संपतो. यात वाईट काही नाही. प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे.
एकाच वेळी एकाच शहरात ही दोन्ही विश्वे अस्तित्वात आहेत.
फक्त पूर्वीच्या व्यवस्थेत त्यांची वर्तुळे एकमेकांना छेदत नव्हती.
सोशल मीडियाने हा छेद घडवलाय.
आणि आज या दुसऱ्या वर्तुळाने विचारलेल्या ‘मग आज काय sunday special’ या प्रश्नाला उत्तर देताना मी हैराण होऊन गेलोय.
shrirangjadhav68@gmail.com

Next Article

Recommended