आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंट्याराव !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला जेव्हा झोपेतून जाग आली तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर बंट्यारावचा चेहरा आला. एकदम तेजस्वी, बुद्धिमान असल्याची झलक, चेहऱ्यावर छोटंसं स्मितहास्य. डोळ्यात कमालीचा समंजसपणा, सहनशीलता! पण तो बंट्यारावचा चेहरा जितका स्पष्ट मला दिसला, तितक्याच वेगाने तो अंधुक होत गेला. मनात बंट्यारावचेच विचार होते. डोळ्यांसमोर आत्ता त्याचा चेहरा उभा राहणं आणि हळूहळू तो अंधुक होतं जाणं, हे चित्र मला काहीतरी सांगू पाहात होतं, असं वाटत होतं. त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं असावं; पण वेळ निघून चालल्यासारखं ते चित्र संपत गेलं नि त्याचं हासूदेखील. मी त्या चित्राला पकडायचा, साठवायचा प्रयत्न करू लागले, पण ते थांबणारं नव्हतं. ते निसटून गेलं. आणि आता मला बंट्यारावला भेटायची ओढ अधिकच वाटू लागली. असं वाटत होतं, जन्माजन्माचं बोलणं अपुरं राहिलं होतं आमच्यात.

गाडीने वेग धरला होता. ही प्रवासातली झोप ‘झोप’ नसतेच मुळी. ती पुढच्या थांब्याचं वर्णन करणारी किंवा त्या थांब्याची उत्सुकता वाढवत नेणारा एक काळ असतो, असं मला वाटून गेलं. मी गाडीतून बाहेरच्या आसमंताला अनुभवत होते. आता शहरं संपली होती. शहरांच्या आत आत लपलेली खेडी सुरू झाली होती, त्या काटेरी वाटा दिसू लागल्या होत्या. शहरं कशी गिळंकृत करतात खेड्यांना, काटेरी वाटांना, या नागड्या उन्हाला. शहरं एकदम चतुर असतात. मीही तशीच आहे का? शहराच्या सान्निध्यात राहून त्याचा प्रभाव तर माझ्यावर पडला नसावा ना, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मला भीती वाटली. असं वाटलं, इथे आहे तोवर या नागड्या उन्हासारखं व्हावं आपण, एकदम मोकळं. आहे तसं बरसत जावं आपण. नाहीतर पुन्हा शहरं येतील नि बदलून टाकतील आपलं रंगरूप. साचाच बदलतील ते माझा. या भीतीला लपवण्यासाठी मी पुन्हा बाहेरच्या वाटेकडे पाहू लागले. त्या काटेरी झाडाझुडपात मला बंट्यारावचं अस्तित्व जाणवत राहिलं. त्या काटेरी असण्यात त्याचं हासू पसरलं होतं. कारण त्याचं जगणंच काटेरी होतं. उभं आयुष्य असंच टोचत राहिलं त्याला नि तो निव्वळ सहन करत राहिला. प्रेम करत राहिला प्रत्येक काट्यावर! त्याचं आयुष्य म्हणजे एक दुःखद कादंबरी! आणि त्या दुःखावर त्याने प्रेम या भावनेने मिळवलेला विजय! गाडी वेग धरायचा प्रयत्न करत होती खरा, पण ओबडधोबड रस्ता त्याला परवानगी देत नव्हता. आदळत- आपटत- धक्के देत गाडी चालत राहिली.

गाडीने ब्रेक दाबला तेव्हा मला माझ्या गावचं घर दिसलं. त्याचं रूप बदलल्यासारखं वाटलं मला. त्याला दुःखाची किनार होती. मी गाडीतून उतरले. बाहेर काही अनोळखी चेहरे मख्ख चेहऱ्याने उभे होते. कदाचित त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण त्यांना त्याची भाषा गवसत नसावी. मी घरात गेले आणि पाहिलं तर बंट्याराव तसाच दिसत होता. जसा त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला होता प्रवासात. तेजस्वी! चेहऱ्यावर हासू! बुद्धिमत्तेची झलक! अगदी हुबेहूब! एकच फरक होता तो म्हणजे, ते समजंसपणा, सहनशीलता व्यक्तणारे डोळे आता मिटलेले होते. आणि आजूबाजूला बसलेल्या माझ्याच नातेवाइकांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला तेव्हा समजलं, बंट्यारावचे डोळे कायमचे मिटले होते. मी गोठून गेले. आजूबाजूचे सारे आवाज, येणारे जाणारे दुःखाचे उद‌्गार म्यूट होऊन गेले. आणि मला निव्वळ बंट्याराव आणि त्याच्या चेहऱ्यावरली शांतता ऐकू येऊ लागली. वयाची ८६ वर्षं जगून एखादी व्यक्ती अशी आपला हात कसा काय सोडू शकते, मला समजेचना! बंट्याराव होता म्हणजे काय होतं आणि तो नाहीये म्हणजे काय, याचं मला आकलनच होईना. कुठलीही व्यक्ती आपल्या आयुष्यात असते, तिचे नि आपले काही बंध तयार झालेले असतात. ते बंध, त्या धाग्याचं काय अस्तित्व असतं नेमकं? त्या दोघा व्यक्तींमधलं प्रेम विरून जातं का त्यातली एक व्यक्ती गेल्यावर? मला समजेना… मुळात एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते किंवा आपण तिला सोडतो, ही कल्पनाच मला मान्य होईना…
नि मग मला बंट्यारावचे किस्से आठवू लागले. तो पुण्यात काही काळ होता तेव्हाचे. बंट्यारावला मी आणि त्या अगोदर त्याचे बाबाच बंट्याराव म्हणायचे. लहानपणापासून धडधाकट, एकदम गब्बू! रुढार्थाने मुलासारखा. पुरुषी प्रकृतीचा. त्यामुळं त्याला बंट्याराव नाव पडलं. आणि ज्या दिवशी मला हे त्यानं सांगितलं त्या दिवसापासून तो माझा ‘बंट्याराव’ झाला. बंट्यारावच्या डोळ्यात अजूनही तितकीच निरागसता होती, जितकी लहान बाळाच्यात असते. “बंट्याराव, तू माझं बाळ आहेस.” असं जेव्हा मी त्याला म्हणायचे, तेव्हा “बाळ नाही. मी बंट्याराव आहे तुझा.” असं तो म्हणायचा. मला खूप हासू यायचं. त्याच्या त्या गोष्टी, चौथीला त्याला मिळालेली स्कॉलरशिप, त्यानंतर अचानक झालेलं लग्न, मग लुगडं नेसण्यापासून ते चपात्या लाटण्यापर्यंतचे उद्योग, त्यानंतर ‘शहाणी’ होणं, मग मुलं-बाळं, सासरचा त्रास, मुलाबाळांना शिक्षणं देण्यात असलेला रस, त्यांची लग्नं, मुलाचं अकस्मात जाणं, नवऱ्याचं जाणं ही सारी मालिका त्यानं माझ्यासमोर उघडी ठेवली होती. आणि त्यापुढचं त्याचं आयुष्य मी माझ्या डोळ्यांनी पाहात होते. तो पुण्यात होता, तेव्हाही तो निव्वळ उठू-बसू शकत होता. काम करण्याचं वय संपलं होतं. मग मी काही कामानिमित्त बाहेर निघाले की तो म्हणायचा, “श्रुती, लवकर ये बरं का. नाहीतर तुझी आई आणि आज्जी मला लै काम करायला लावतात बघ…” आणि मग बंट्याराव स्वतःच हसायचा एकदम लहान बाळासारखा!
आणि आज तो मला सोडून गेला तेव्हा त्यानं मला कोणी कामं सांगेल, याचा विचार कसा केला नाही, मला कळलंच नाही. बंट्याराव तू संपत नाहीस. तू माझ्या मनात जगत असतोस. तुझं संयमी असणं माझ्यात जगत असतं. तुझं बेभान प्रेम करणं माझ्यात जगत असतं. तुझ्यातलं लहान मूल माझ्यात जगत असतं. खरंच !

बंट्याराव म्हणजे माझी पणजी खरं तर. ८६व्या वर्षी ती मला सोडून गेली. सरण जळत राहिलं पण माझा बंट्याराव मात्र त्या सरणावरही उजळत राहिला. माझ्याकडे पाहून हासत राहिला. “बंट्याराव, तू माझा बाळ आहेस ना?” माझा आवाज आसमंतात घुमत राहिला आणि बंट्यारावचं स्मितहास्य त्याला प्रतिसाद देत राहिलं.
dancershrutu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...