ही एक पणती कुणाची पहिली लग्नाची भेट असेल तर कुणाच्या आजारपणात
उठलेली कळ… ही पणती सुखवस्तू घरात सुशोभित दगड होऊन बसली असेल,
तर एखाद्या कवीच्या मनात कविता…
पहाट झाली असावी. असेच तीन-चार वगैरे वाजले असतील. मी अस्वस्थ होते. खिडकीतून कुणीतरी आत येईल, अशी शंका वाटल्यानं बहुधा मी पांघरुणातून उठले आणि खिडकी बंद केली. पण खिडकीतून कुणीही कसं काय येऊ शकेल, हा विचार माझ्या मनात आला नाही नि मी झटकन आलेल्या विचारावर कृती केली. मी आईच्या बेडरुममध्ये गेले आणि तिला गदागदा हलवू लागले, “आई, कुणी आलं खिडकीतून तर त्याला आत येऊ देऊ नको,” असं सांगून मी पुन्हा माझ्या पांघरुणात गडप झाले. पण आई त्यावर काय बोलली होती, हे ऐकायलासुद्धा मी थांबले नसावे. मी शांतपणे झोपी गेले. मला पुन्हा जाग आली. मी खिडकीकडे वळले तर खिडकी पुन्हा एकदा अर्धवट उघडी! हे असं कोण उघडतंय माझी खिडकी, मला कळेना. कुणाचा हा पराक्रम आहे? कुणाला माझ्या खिडकीतून आत यायचंय, हे मला पाहायचं होतं. आज
आपण जागंच राहायचं, असं ठरवून मी डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करू लागले. पण झोप माझा पिच्छा सोडेल तर काहीतरी होऊ शकेल ना! माझे डोळे गु…ल! मी गु…ल! पुन्हा एकदा! यानंतर काही काळानं माझ्या मोबाइलचा अलार्म वाजला… आणि मी जागी झाले तेव्हा मला समजलं की, आपण या झोपेतून पहिल्यांदा जागे होतो आहोत नि आत्ता पहाटेचे पाच वाजले आहेत. मग हे खिडकी बंद करायचं काय खूळ झालं नेमकं? स्वप्नातलं स्वप्न बहुतेक! मी उठले तर माझ्या लक्षात आलं की, माझ्या रुमची खिडकी सताड उघडी होती. मी तिच्याकडं पाह्यलं आणि मला खुदकन हासूच आलं. एकदम असं स्वप्न का पडलं असेल, याची जाणीव करून देणारं हासू! खिडकीतून भयानक थंडी, वारा आत येत होता आणि मला झोपेत या थंडीचा त्रास होत होता. म्हणूनच मी आईलाही कुणी खिडकीतून येत असेल तर त्यावर वॉच ठेवायला सांगितलं होतं. बावळटच मी, असं म्हणून मी पुन्हा एकदा स्वतःच्याच डोक्यावर टपली मारली. माझ्या शरीरावरून पुन्हा एक अतिशय थंड झुळूक गेली, म्हणून मी खिडकी बंद करायला खिडकीपाशी गेले तर माझ्या लक्षात आलं की, खिडकीत आईनं चार पणत्या तेवत ठेवल्या होत्या प्रत्येक कोन्यात! मी एका पणतीपाशी माझा हात नेला तर मला एकदम हळुवार ऊब मिळाली. हे थंडी आणि पणतीचं कॉम्बिनेशन भन्नाट होतं. एकदम मोहक! वातावरण कसं उजळलं होतं त्या दोघांच्या असण्यानं! त्रास देणाऱ्याबरोबर त्रासावर फुंकर मारणारादेखील असावा लागतो तरच त्या त्रासाचीदेखील मजा येते, तसं काहीसं.
मग मात्र मी खिडकी बंद केली नाही. मी खिडकीच्या कठड्यावर हात रोवून प्रत्येक पणतीकडे पाहू लागले. ‘तू कुठल्या कुठल्या घरात तेवत असतेस गं?’ मला एकदम असं वाटलं की, पणतीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पण कशी देणार ती? किंवा कदाचित दिलंही असेल; पण मला ते समजणार कसं? ती बहुधा लकाकली. ही पणती जशी तुमच्या-माझ्या घरात तेवतेय, तशीच ती एका अत्यंत दुःखी असणाऱ्या कुटुंबातदेखील तेवतेय. ही एक पणती कुणाची पहिली लग्नाची भेट असेल, तर कुणाच्या आजारपणात उठलेली कळ… ही पणती एका अत्यंत सुखवस्तू घरात सुशोभित दगड होऊन बसली असेल, तर एखाद्या कवीच्या मनात कविता. ही पणती तुझ्या आतला निखळ आनंद असेल तर माझ्या आतली अनामिक हुरहुर! पणती हे एका कुणाचंच प्रतीक नाही. ती प्रत्येकाच्या नजरेतून बदलत राह्यलीये… बदलत राहील.
पणतीला या घडीला लाभलेलं बॅकग्राउन्ड मला एकदम योग्य वाटतं. ही सिच्युएशनच मला एकदम छान वाटतेय. मी झोपेतून जागी झालीये. माझे केस विस्फारलेले आहेत. डोळ्यात थोडासा थकवा, थोडं ताजेपण! चेहऱ्यावर थोडंसं समाधान! एकदम नैसर्गिक मी! कसलंही आवरण न चढवलेली! जणू काही मी पणतीच्या तेवण्यात माझं रूप न्याहाळतेय. आणि त्यामागे निरभ्र आकाशाचा पडदा. हे एकदम काव्यमय आहे. प्रत्येक जण कवीपण अनुभवतो, असं मला वाटून गेलं. किंवा ही पणती मला ते कवीपण देऊ करते. ती जाणीव करून देते अशा एका निरभ्र आभाळाची, जिथे उद्या जाऊन मला पोहोचायचं आहे. ती सांगते, आपल्यावरली धर्म, जात, लिंगाची आवरणं काढून फेकून द्यायला. ती गदागदा हलवून सांगते, तू माणूस आहेस म्हणून. ती तेवत ठेवते संवेदनशीलता तुमच्या-माझ्या मनातली. ती सांगते, तुमचं- प्रत्येकाचं असणं किती महत्त्वाचं आहे ते. ती विश्वास देते, अंधाराच्या बॅकग्राउन्डवरदेखील उजळून दाखवू शकण्याचं! आणि ती जोपासते, तुमच्या-माझ्यातली ढाई अक्षरं…
थंडीत बसणं स्वीकारून बाकीच्यांना ऊब देणारी पणती मला समंजसपणाचा, प्रगल्भपणाचा एक आविष्कार वाटते. इतक्यात आई माझ्या रुममध्ये येते आणि म्हणते, ‘अगं उठलीस ना! खिडकी मुद्दामच उघडली होती. तुला थंडी वाजली की तू उठशील म्हणून. नाहीतर कशी उठणार ना तू!’ ती खिडकी लावू लागली आणि मी तिच्यावर रागवायचं सोडून तिला म्हटलं… “एकदम चांगला वॉच ठेवलास की खिडकीवर, मी स्वप्नात सांगितल्यासारखा. आणि एकदम सुंदर गोष्टी पाठवल्यास आत खिडकीतून,” असं म्हणत मी खिडकी पुन्हा उघडली. नि आई काही काही कळल्या न कळल्यासारखी उभी राह्यली.
dancershrutu@gmail.com