आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shruti Awate Article About And I Want Something Eternal.

अॅण्ड आय वॉन्ट समथिंग इटर्नल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुद्धा, मला माहीत्येय, तू पाहतोयस
माझा प्रवास. आणि मी तुझ्यापर्यंत पोहोचणार, हे पक्कं! कारण मला माहीत्येय, बाकी
काहीही नित्य नसलं तरी तू नित्य आहेस.

या अशा अनामिक दुःखाच्या क्षणी निव्वळ शांत राहावं. काहीच घडू नये, मनाच्या आत. कसलेच तरंग उमटू नयेत. बस्स, एकटक बघत राहावं नजर पोहोचेल तिथवर नि परत त्या नजरेला मागे आणूच नये मुळी मूळ ठिकाणी. तिनं भरकटत जावं सभोवार. अक्षरशः काहीही बोलू नये कुणाशी, काही व्यक्तू नये, काही लिहू नये, पण डोळ्यातलं पाणी ढळू नये आपल्या… संथ गतीने डोळ्यातलं पाणी येत राहावं बाहेर बाहेर. जणू काही कित्येक वर्षं त्याला बंदिस्त केलं असावं कोठडीत कुठल्याशा. नि क्षण क्षण डोळ्यातून पाणी येताना मी तुला क्षणोक्षणी अनुभवावं. या नीरव शांततेला तुझं नाव बहाल करावं. या माझ्या डोळ्यातल्या पाण्याला तुझं हासू लगडावं. कारण... कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझ्या म्हणण्यावर. मला माहित्येय माझ्या डोळ्यातल्या अश्रूंशिवाय तुझ्या हसण्याचं मोल नाही. या खोलीतल्या अस्वस्थेशिवाय आनंदाच्या दाराचं अस्तित्व नाही. झुरत पडलेल्या अंधाराशिवाय दिवसाला थारा नाही. नि माझ्या आतल्या- खोल खोल आतल्या जखमेशिवाय तुझं लख्ख हसणं नाही.
म्हणूनच या अशा निराकार दुःखाच्या वेळी मला तुझी आठवण येते बुद्धा. कारण तूच तर हा आनंदाचा पासवर्ड दिलायस मला. पण तुला एक सांगू, दुःखात एक अनामिक मजाय… दुःखात एक भीती आहे… दुःखात असुरक्षितता आहे… आणि म्हणूनच दुःखात एक रंगीबेरंगी आशा आहे. काय वाटतंय माहित्येय आत्ता मला? असं वाटतंय की, कित्येक जन्माजन्मांच्या-पिढीजात आलेल्या-परंपरेनं आलेल्या दुःखांचा एक सांगाडा आहे मी. खरोखर तसं आहे का रे, की मी आकर्षिली जातेय दुःखाकडे? माहीत नाही. बट इट इज समथिंग हाँटिंग… बुद्धा, तूच म्हणतोस ना रे, हे सगळं जग दुःखमय आहे. आणि हे दुःख नाहीसं करण्यासाठीच तू काही पायऱ्या सांगतोस नि त्या चढल्या की, निर्वाणाचा रस्ता प्राप्त होणार असतो. निर्वाण… जिथे एक प्रचंड इन्टेन्सिटीची शांतता असेल, कसलेच भावबंध नसतील, अपेक्षा नसतील, पझेसिव्हनेस नसेल, रुसवे-फुगवे नसतील, चूक-बरोबर, योग्य-अयोग्य नसेल; नि मग मी त्या एका दूरच्या टोकावर जाऊन पाहात राहीन घडणाऱ्या घटनांकडे. आणि तू माझ्या शेजारी बसून मला सांगशील, हे जे सगळं घडतंय ना श्रुती, त्या घटना नाहीत; त्याला काही असा आकार नाही. हा फक्त एकसारखा प्रवाह आहे क्षणांचा. ती त्या समोरच्या झोपडीतली ज्योत पाहतेयस? ती ज्योत नाही. प्रवाह आहे तो एक एका ठिणग्यांचा. ती रेषा पाहतेयस, त्या सहावीतल्या पोराच्या गणिताच्या वहीतली? ती रेषा नाही, तो प्रवाह आहे बिंदूंचा. बुद्धा, मी भांबावून जाईन अरे. मी अस्वस्थ होईन पुन्हा एकदा. हे क्षणाक्षणांचं कॉम्बिनेशन होऊन माझ्या मनात मी निर्मिलेल्या संकल्पनांची गळचेपी होईल मग. माझ्या डोळ्यात पाणी येईल आणि तू खळखळून हसशील माझ्याकडे पाहून. मी प्रश्नचिन्हांकित असेन नि तू मला पुन्हा एकदा माझ्या इनिशिअल पॉइंटची आठवण करून देशील, जिथून मी तुझा म्हणजे निर्वाणाकडे जाण्याचा रस्ता पकडला होता. तोच तो-दुःखाचा पॉइंट! आपण एक टप्पा जिंकलोय, असं वाटत असताना तू मला पुन्हा माझ्या इनिशिअल पॉइंटला जायला लावणं, हे पुन्हा एकदा प्रचंड वेदनादायक असेल माझ्यासाठी. नि ही माझ्या मनाच्या आत खोलवर रुजलेली वेदनाच असेल माझ्या ‘अपयशा’चा पुरावा! त्या निर्वाणाच्या टोकाला गेल्यावर मला वेदना होणं, दुःख होणं मना आहे, हे मला उमजणार नाही बुद्धा… खरंच! उमजलं तरी जगण्यात येणं मुश्कील आहे. तू प्लीज सांगू नकोस अंगुलीमालाला झाडाचं पान तोडून पुन्हा जोडायला, तू सांगू नकोस मला हे कसं सारं क्षणिक आहे म्हणून, तू सांगू नकोस रे अष्टांग मार्ग निर्वाणाच्या टोकाला पोहोचण्यासाठीचा, तू सांगू नकोस सारं काही अनित्य आहे म्हणून, तू प्लीज असा तिथे बसून हासू नकोस माझ्याकडे पाहून. आकर्षिली जाते मी तुझ्या हसण्याकडे पाहून… तुझे अष्टांग मार्ग मोहात पाडतात मला… तू सांगितलेल्या आर्यसत्यांनी अस्वस्थ होते मी नि तुझ्या जगण्याविषयीची थिअरी आपलीशी करावीशी वाटते मला. माझा विश्वास नाहीये स्वतःवर, तू दिलेल्या रस्त्यावरून चालण्याकरिता! मी खेचली जाते तुझ्याकडे, पण पण… पण तरीही मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हा ‘पण’ का येतो रे वाक्या-वाक्यात!
मला तुला एक विचारायचं आहे बुद्धा, तू ज्या एका सुंदर आनंदाच्या-शांतीच्या अनुभूतीची फेज सांगतोस, जिथे सगळी दुःखं धूळ माखत पडतात, ती तरी नित्य आहे का रे? ती तरी परमनन्ट आहे का? सांग ना… की तोही एका क्षणासारखाच… फुलपाखरू बनून खांद्यावर बसणारा नि झटक्यात उडून जाणारा? की त्या क्षणाचं अस्तित्व लाँग टर्म आहे? की तो क्षण आयुष्यभरासाठी नसला तरी तो एक छोटा क्षण काही प्रचंड, काहीतरी मौल्यवान देऊन जाणार आहे मला? नक्की काय होणार आहे? मी मेल्यानंतरही माझे जे गुणधर्म पुन्हा रिस्टोअर होणार आहेत, ते कुठले आहेत? म्हणजे मी नित्य आहे का? मी अमर आहे का बुद्धा? मला ना सगळी दुःखं विरून गेलीयेत आणि आपण एक नीरव शांततेतला आनंद अनुभवतोय, असा क्षण असणं हे एकदम हायपोथेटिकल वाटतंय बुद्धा… हासू नकोस. उत्तरं हवीयेत मला. मला उत्तरं हवीयेत. तुझाकडे ती आहेत, पण तू ती देणार नाहीस डायरेक्ट. दिशा देत राहशील. स्पून फीडिंग करणं तुझ्या स्वभावात नाही. आणि मलाही अनुभूती मिळवण्यात कमालीचा रस आहे. तू ऐकतोयस? स्मितहास्य करू नकोस एका प्रचंड प्रगल्भ चेहऱ्यानं. मला माहीत्येय, तू पाहतोयस माझा प्रवास. आणि मी तुझ्यापर्यंत पोहोचणार, हे पक्कं! कारण मला माहीत्येय, बाकी काहीही नित्य नसलं तरी तू नित्य आहेस… & I want something eternal.

(dancershrutu@gmail.com)