आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

. ..आणि मी गर्दीच्‍या मध्‍यभागी उभी होते !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा प्रचंड गर्दीतून बाहेर पडून मी डेक्कनला थांबले. खरं तर डेक्कन हा माझ्या प्रवासाचा नेहमीचा पॉइंट; पण का कोण जाणे, मला आज डेक्कन वेगळं भासत होतं. म्हणजे, मेमरी लॉसमधून रिकव्हर झाल्यावर काही गोष्टी पूर्णपणे आठवाव्यात… काही अर्धवट…अन् काहींची निव्वळ चाहूल लागावी, तसं काहीतरी! आज काहीतरी मिसिंग होतं. तसं मला डेक्कनला नेहमीच विसावायला खूप आवडतं. विसावायला आवडावं असं डेक्कनला काय आहे, असं कोणीही विचारू शकतं; पण याचं उत्तर माझ्याहीकडे नाहीये. मलाही आमची नाळ कधी जोडली गेली, याचा थांगपत्ता लागत नाही. माझी आणि ‘त्याची’ भेटही तिथे झाली होती म्हणून कदाचित; पण त्याही अगोदर डेक्कनचं आणि माझं काहीतरी वेगळं नात होतं. आम्ही जोडले गेलो होतो, एका प्रचंड शक्तीने!

डेक्कनशी म्हणजे नेमकं कोणाशी? कदाचित त्या चौकातल्या गर्दीशी. खरं सांगू, मला त्या गर्दीत राहायला, चौकातून चारही वाटांचा अंदाज घ्यायला खूप आवडतं. या गर्दीच्या मध्यभागी उभं राहिलं की समोर जाणारा रस्ता म्हणजे जे. एम. रोड. वनवे. इकडून येता येतं, जाता नाही येतं. त्याच्या शेजारी फर्ग्युसन रोड. हाही वनवे. इकडून जाता येतं; पण परत येता येत नाही. एकदा ‘तो’ बरोबर असताना गाडीवर सुसाट वेगाने या रस्त्याने गेले होते मी; पण वाट चुकली हे खूप उशिरा कळलं. सुदैवाने आपल्याला पाय आहेत, याची जाणीव झाली. आणि मग रस्ता वन-वे असला तरी त्याला टु-वे बनवलं आणि पुन्हा माघारी फिरले. गाडीऐवजी पायाने मुक्कामी पोहोचावं लागलं, पावलांच्या ठशासकट! या वेळी मला समजलं की पावलांची वाट धिमी असते; पण ती व्यवस्थित पचनी पडते. प्रत्येक गोष्ट मनसोक्त अनुभवू देते. तसं गाड्यांचं नसतं. गाडीला तिच्यावर बसलेल्या व्यक्तीचं मन-भावना समजत नाहीत. म्हणूनच डेक्कनची गर्दी मला परवडणारी वाटते; पण तिची भीतीही तितकीच वाटते. कारण गर्दीतलं एकटेपण भयानक असतं. सगळी गर्दी आपल्याबरोबर आहे, असा समज निर्माण होतो; पण वास्तवात सारं काही हरवलेलं असतं. मग असुरक्षित वाटायला लागतं. अन् तरीही मला त्या असुरक्षिततेत राहायला आवडतं. कारण आपल्या मनातल्या गर्दीपेक्षा ही गर्दी कितीतरी पटीने सुसह्य असते. ही गर्दी जरी आपल्याबरोबर असण्याचे भास निर्माण करत असली तरी ती आपल्याला धोका देत नाही. मनातल्या गर्दीचा मात्र काही भरवसा नसतो. माणसाचं मन काहीही करू शकतं. इन जनरल माणसाचं की माझं? काहीही असो. जे आहे ते असं आहे.

…. तर मी डेक्कनला पोहोचले. आणि चौकात येऊन सिग्नलला थांबले. सारं रान ओकंबोकं पडावं किंवा नवऱ्या मुलीने सजून धजून तयार व्हावं; पण तिच्या चेहऱ्यावर हसूच नसावं, असं काहीतरी वाटलं. अनेक दिवसांपासून मी या गर्दीचा हसरा चेहरा पाहत होते; पण आज हसरा नव्हे, तर गर्दीला चेहराच नव्हता. म्हणजे माझ्या गर्दीचा चेहरा रिप्लेस झाला होता. मला वाटलं, कदाचित मी दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी आले असेन. म्हणून मी पुन्हा एकदा न्याहाळून पाहिलं डेक्कनकडे. होय, ते डेक्कनच होतं. मग असं काय बदललं होतं? आज हे सारं मला का छळत होतं? समोर तीच टपरी होती. येणारी-जाणारी माणसं होती. गोंगाट होता. आणि मीदेखील तिथेच होते. मग असं काय बदललं होतं? कोणती गोष्ट होती, जी मला डेक्कनचा सोल-आत्मा वाटत होती? मला आठवलं… कालच्याइतकी ही गर्दी मला कधीच सुंदर दिसली नव्हती. काल मला कॉलेजवरून बसच मिळेना, म्हणून मी चालत डेक्कनला निघाले. आपण एकटे चालत असलो की आपल्याला स्वतःशी संवाद साधणं कम्पल्सरी असतं. आणि अशा काळात तर मी स्वतःला अनेक गुंत्यांत फेकत राहते. भंडावून सोडतो मला हा स्वसंवाद. विचार करता करताच मी डेक्कनला पोहोचले होते. तेव्हा गर्दीच्या मध्यभागी किती सुंदर पोस्टर दिसलं होतं मला! त्या पोस्टरने माझ्या कपाळावरच्या आठ्या, तिथली गर्दी कमी केली होती. किती सुंदर पोस्टर होतं ते! संध्याकाळच्या प्रकाशात ते चमकत नव्हतं; पण सूर्योदयाइतकं सुरेख होतं ते. त्यावर दोन दुसरी-तिसरीच्या वयाची फाटकी-मळलेली पोरं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून निखळ हसत होती. त्यांचा काळा रंग किती देखणा दिसत होता.

त्यांच्या हसण्याकडे पाहून जणू काही मी त्या मुलांना ओळखत असावी, असं स्मितहास्य केलं होतं. आणि माझ्या लक्षात आलं की, कित्येक दिवसांत मी असं निखळ, निरागस हसलेच नव्हते. आपण कितीही मळके असू, कितीही फाटके असू, स्वतःच्या हसण्याची ताकद आपल्यालाच नाही कळली तर ती आणखी कोणाला कळू शकेल? फेअर अँड लव्हली वापरणारी यामी असो वा लक्स साबण वापरणारी दीपिका असो, या मुलांच्या सौंदर्यापुढे त्या नक्की फिक्या पडल्या असत्या. हसणं हेच खरं सौंदर्य आहे. त्या मुलांच्या बॅकग्राउंडला अंधाराचं चित्र होतं. येस, अंधाराच्या बॅकग्राउंडवर हसणं उठून दिसतं, हे मात्र निश्चित! आणि आज तर ते पोस्टरच तिथे नव्हतं; पण तरीही कालची इमेज माझ्या मनात रेंगाळत होती. आता मला पुन्हा एकदा माझ्या गर्दीचा मनात कॅप्चर केलेला चेहरा आठवला आणि मी कातरवेळच्या बॅकग्राउंडवर पुन्हा एकदा खळखळून हसले. मला माहीत होतं, मी गर्दीच्या मध्यभागी उभी होते!