आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगर लिख सकूँ तो...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवाच फिजिक्स प्रॅक्टिकलवरून आल्यावर आम्हा मित्र-मैत्रिणींची कॉलेजच्या पार्किंगमध्ये काही एक्सपेरिमेंट्सबद्दल चर्चा सुरू होती. जाम टेन्शन आलं होतं. त्यात विषयही फिजिक्ससारखा! रीडिंग घ्यायला जरा चुकलं की, समजा तुमचे वांधे होणार. त्यात हे फिजिक्सचे शास्त्रज्ञ इतके थोर की त्यांनी माहीत नसलेला करंट, त्यातला रेझिस्टन्स काढायची सुविधा ऑलरेडी केलेली. कधी कधी तर मी फुल टू गंडते या सा-यात. असो. तर हे सगळं असं. आणि म्हणूनच नको तेवढा भार माझ्या डोक्यावर होताच. इतक्यात माझ्या एका मैत्रिणीने अनपेक्षितपणे आम्हाला व्हॅलेंटाइन डेची आठवण करून दिली आणि मग आमच्या सगळ्या ग्रुपचा मूडच बदलला. काहीच्या काही बोलणं सुरू झालं. या बोलण्याला ऐकून फिजिक्स कुठच्या कुठे पळून गेला, तो दिसेनासाच झाला. आणि मला मात्र व्हॅलेंटाइन डेचं ग्रॅव्हिटेशन लक्षात आलं. प्रत्येकाची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला काय द्यायचं, कोणाला कसं प्रपोज करायचं याविषयी चर्चा सुरू झाली आणि मी विचारात मग्न झाले…
इतक्यात श्रद्धा म्हणाली,
‘अगं, पण आपण आता व्हॅलेंटाइन डे नाही सेलिब्रेट करू शकत.’
‘का?’
‘अगं, तू वाचलं नाहीस का पेपरमध्ये आलं होतं, की फक्त विवाहित कपल्सच सार्वजनिक ठिकाणी व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करू शकतात?’
मी विचारातच पडले. व्हॅलेंटाइन डे. प्रेमाचा दिवस! मग प्रेमाला अशी बंधनं का? प्रेम फक्त ती आणि तो यांच्यातच असतं का? प्रेमाला वय असतं का? प्रेम म्हणजे काय? आणि प्रत्येक वर्षी प्रेमाची व्याख्या, त्याची डेफिनेशन मॉडिफाय होत राहते. अन्न, वस्त्र, निवा-यानंतर किंवा कदाचित त्याही आधी माणसाला सुंदर जगण्यासाठी आवश्यकता असते ती प्रेमाची. प्रेम… ही अशी कुठली गोष्ट आहे जी दिसत नाही, पण तिच्यातल्या बाँड तर केमिस्ट्रीतल्या रिअॅक्शन्सपेक्षाही घट्ट आहे? ही अशी कुठली गोष्ट आहे की, तिचा प्रत्येक माणूस शोध घेत असतो? ही अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्या जगण्याच्या मुळाशी आहे? नि काही केल्या सुटता सुटत नाही? मला आकळत नाही.
मध्ये एक गोष्ट वाचली- एक कपल बागेत गप्पा मारत बसलेलं. गोड गुलाबी गप्पा मारता मारता त्यांच्यात अचानक वाद निर्माण होतो. भांडण होतं. प्रेयसी चिडून निघून जाते घरी. प्रियकर तिच्या घरी जातो. दरवाजावर टकटक करतो. ती आतून विचारते, कोण आहे?
तो उत्तरतो, मी आहे!
बराच काळ वाट पाहूनही ती दरवाजा उघडत नाही. बिच्चारा प्रियकर निघून जातो. दुस-या दिवशी पुन्हा येतो. दरवाजावर टकटक. तिचा तोच प्रश्न- कोण आहे? त्याचं तेच उत्तर, मी आहे! ती दरवाजा उघडत नाही. तिस-या दिवशी पुन्हा येतो. दरवाजावर टकटक. ती विचारते, कोण आहे? तो म्हणतो, तू आहे. मी ‘मी’ राहिलेलोच नाही मुळी.
दरवाजा उघडला जातो. ती गोष्ट वाचताना मला बा. भ. बोरकरांच्या ओळी आठवत होत्या-
जीवन त्यांना कळले हो
‘मी’पण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो.
आणि मग लगेच आईनं सांगितलेली विंदांची ओळ आठवली- ‘मी’च्या वेलांटीचा सुटो सुटो फास.’
खरंच आपला इगोच आड येतो का प्रेम करताना? मी कशी बोलू? काय सांगू? ‘मी’पण कसं संपणार? मला कळत नाही.
माझ्या डोक्याला शॉटच लागला या सगळ्या विचारांनी.
मैत्रिणींच्या बोलण्यानं मी पुन्हा भानावर आले. विषय पुन्हा फिजिक्सकडे वळला तेव्हा मला वाटलं- यार शास्त्रज्ञांना प्रेमाची व्याख्या करता आली नाही का?
म्हणजे माणूस- ‘मी’पण = प्रेम
किंवा
मी + तू = तू = प्रेम
किंवा न्यूटननं जसा ग्रॅव्हिटेशन लॉ सांगितला तसं काही तरी. दोन व्यक्तींमधलं प्रेम त्यांच्या मनातल्या अंतराच्या डायरेक्टली किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं, असं काहीसं. अशी डेफिनिशन केली किंवा लॉ सांगितला असता तर किती प्रॉब्लेम सुटले असते, नाही का? पण डेफिनिशन किंवा लॉ म्हटलं, की प्रेमपण चौकटीतच अडकणार ना. आणि मग असं होणार असेल तर कशाला हवी व्याख्या? कशाला हवा लॉ? हे म्हणजे सगळीकडे मनसोक्त पसरणा-या सुगंधाला तू फक्त इथेच वाहा, असं सांगण्यासारखं आहे. असं कसं शक्य आहे? पक्ष्याला तू आकाशात नको उडूस, पिंज-यातच उड, असं म्हणण्यासारखं आहे. माझं प्रेम या संकल्पनेवरच प्रेम आहे. ‘दिल तो बच्चा है जी’सारखं आपलं मन असं लहान मुलासारखं असावं. पुन्हा पुन्हा क्षणाक्षणाला प्रेमात पडणारं. कुणी तरी म्हटलंय ना- अगर लिख सकूँ तो एक शब्द लिखना चाहती हूँ - प्यार; पण तो लििहण्यासाठी पेनमध्ये एवढी शाई कुठून आणणार?