आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नि पिक्चर अजून संपला नाहीये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी मीरेचा तो अवतार पहिल्यांदाच पाहत होते. हातात बंदूक आणि अंगभर रक्ताच्या शिंतोड्यांनी माखलेली ती. खरं तर मीरा प्रेमाचं प्रतीक! मीरा म्हणते ‘हा री मै प्रेमदिवानी… मेरो दर्द न जानै कोय’ कृष्णाच्या प्रेमात अगदी वेडी झालेली मीरा… मग ही माझ्या डोळ्यासमोरची, पडद्यावरची मीरा कोण होती? ती काय करत होती? हे असं तिचं भयावह रूप मी आजवर कधीच पाहिलं नव्हतं.‘NH-10’ने मीरेचं हेही रूप दाखवलं.
फिल्ममधला तो सारा आक्रोश-संताप माझ्या कानात घुमत होता. ही कहाणी चित्रण करते एका ऑनर किलिंगच्या घटनेचं. पेपरमध्ये नुसत्या बातम्या वाचणं आणि त्या साऱ्या घटनांच्या वास्तवाचं केलेलं चित्रीकरण पाहणं, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. NH-10 या हायवेच्या बरोबर दोन ते तीन किलोमीटर्स आत घडणाऱ्या घटनेचं वास्तव ही फिल्म दाखवते. हायवेवरून जाताना मीरा आणि अर्जुन हे जोडपं एका ढाब्यावर थांबतं. आणि तिथून सुरू होते ती कहाणी माणसातलं माणूसपण नष्ट होत चालल्याची साक्ष देणारी!
हायवेपासून काही अंतरावर डोंगराळ भागात पिंकीचा भाऊ पिंकी आणि मुकेश यांचा निर्दयी खून करतो कारण असते, पिंकी आणि मुकेश यांचे एकमेकांवर असणारे गोडगुलाबी प्रेम! आणि या साऱ्यात अडकतात ते मीरा आणि अर्जुन. मीरा जेव्हा व्याकूळ होऊन मारेकरी लोकांना “भैया, हमे माफ करो. प्लीज हमे छोड दो. हम किसी को कुछ नही बतायेंगे.” असं म्हणते. तेव्हा पिंकीचा भाऊ तिला म्हणतो, “ए देख, वैसे भी बेहनों के लिए आज का दिन ठीक नही है.” तसा कुठला दिवस होता गं तुझ्यासाठी चांगला, तूच सांग. जळगावातल्या मुलीने प्रेमविवाह केला तेव्हा तिच्या बाळाला आणि तिला ट्रकखाली मारलं गेलं. तेव्हा होता चांगला दिवस तुझ्यासाठी? आशा शिंदेने आपल्या वडिलांना आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं तेव्हाही कुठे होता चांगला दिवस तिच्यासाठी? आणि मग तरीही आपल्याकडचे बुवा-बापू लोक म्हणतात “अगर वह लडकी रेप होते समय बोलती की, भैया, मुझे छोड दो. अगर वह गायत्री मंत्र पढती तो रेप नही होता” अशी वाक्यं आणि मी पाहत असलेलं आणि प्रत्यक्ष घडत असलेलं किती तरी भयावह, निर्घृण. निव्वळ गायत्री मंत्र म्हणून आणि ‘भैया’, ‘दादा’ म्हणून जर बलात्कार टळले असते तर मग आणखी काय हवं होतं! “women or girls are more precious than a gem or a diamond. It’s up to you how you want to keep that diamond in your hand. If you put your diamond on the street, certainly a dog will take it out.You can’t stop it.” असं म्हणणारा एक वकील आहे.
तर माझ्या मुलीचं कोणा मुलावर प्रेम असेल तर मी तिला मारून टाकीन, असं म्हणणाराही दुसरा वकील आहे. ही अशी वाक्यं जेव्हा सुप्रीम कोर्टमधले वकील दिल्लीच्या गँगरेपनंतर म्हणतात तेव्हा काय बोलावे? कुठली लिंक जोडेल माणसाला नि त्या सुप्रीम कोर्टातील वकिलाच्या प्रवॄत्तीला? हीच माणसं जर आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये असतील तर नेमके कुठे जाणार आहोत आपण याचा अंदाज घेणंही खतरनाक आहे… आणि म्हणूनच खरा भारत जागतिकीकरणानंतर वसलेल्या हायवेजवर नसून, तो आहे हायवेपासून २-३ किलोमीटर दूर!
माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मला माहीत नाही ‘पुरुषांना’ कितपत छळेल त्यांचं ‘पुरुष’ असणं? मला माहीत नाही, त्यांना छळलं तर कितपत बदलू शकतील ते स्वतःला? मला माहीत नाही येईल का त्यांना त्यांचं पुरुषपण डिकोड करता? पण हे मात्र निश्चित बदलावं लागेल तुला-मला! आरशात स्वतःकडे पाहताना या समाजाने बनवलेली ही आपली पुरुषी नजर बदलावी लागेल आपल्याला आणि स्वतःकडेच माणूस म्हणून पाहण्याची नितळ दृष्टी प्राप्त करावी लागेल आपल्याला. ‘छत्तीस-चोवीस-छत्तीस’ असण्याला कितपत महत्त्व द्यायचं हे ठरवावं लागेल आपल्याला.
आपल्या स्तनांना आणि योनीला दिलं जाणारं अनन्यसाधारण महत्त्व कितपत झुगारायचं हे निश्चित करावं लागेल पहिल्यांदा. रिलेशनशिपमधे जावं. भरभरून प्रेम करावं त्याच्यावर. प्रेमाने किस करावं त्याला. आवेगात सेक्स झाला तरी चारित्र्याने खराब झालो आहोत आपण असं स्वतःतल्या पुरुषी वृत्तीला म्हणू देशील तर खबरदार! कोण ठरवत तुझं चारित्र्य? हे कमरेखालचं शरीर? जर तेच ठरवत असेल तुझं चारित्र्य, तर कुठं जातं त्याचं चारित्र्य? की त्याला मुभाच असते या साऱ्या गोष्टींची? लक्षात ठेव प्रेम केलंस तरी चूक वाटणाऱ्या गोष्टीतून बाहेर पडण्याची शक्ती, ते सामंजस्य- शहाणपणही तुझ्यातच आहे, मला ठाऊक आहे. नाही तरी तू बाहेर पडतेस तेव्हाच तुला कळतं त्याचं असणं, कारण तो तेव्हाही सोळा वर्षांच्या पोरासारखाच असतो गं. त्याला तू हवी असतेस म्हणजे नेमकं काय हवं असतं याचा विचार केलायस कधी? तो विचार भयावह असला तरीही कर, नाही तरी माणूसपण विसरून जाऊ आपण! तो म्हणतो तुझ्यासाठी प्रेमाची गाणी… तो म्हणतो, “नैन हम लडायेंगे बेबी डॉल से” आणि तूही चक्क स्वतःला ‘बेबी डॉल’ म्हणून स्वीकारतेस !
आश्चर्य वाटतं मला तुझं. हे असं स्वतःचं माणूसपण सोडून देण्याची आणि स्वतःचं वस्तुकरण करून घेण्याची तू केवढी मोठी किंमत मोजत असतेस, माहित्येय तुला! शेवटी तो हेच म्हणणार आहे गं की ‘मै हूं आदत से मजबूर’. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, तू स्वतःला ‘नमकीन’ बनवू नकोस. तू स्वतःला ‘चकना’ बनवू नकोस. कारण तू ती नाहीस ना तू पुरुषी अल्कोहोलसोबत गटकन खाण्याची तंदूरी मुर्गी आहेस. तू फक्त इतकं समजून घे तुझं ‘तुझं’ जगण्याचा अधिकार तुला आहे.
तो तमाम ‘पिंकींच्या भावांपैकी’ कोणीही ओरबाडू शकत नाही. तुझ्या जगण्याचे, स्वातंत्र्याच्या अधिकाराचे धागेदोरे स्वतःच्याच हातात ठेव आणि दाखव तर तुझी सृजनशीलता स्वतःलाच अन् सिद्ध कर तर हे तुझं माणूसपण क्षणोक्षणी! अजूनही मीरा तशीच दिसतेय मला, तिच्या डोळ्यातली ती रिक्तता सहन होत नाहीये मला. थिएटरमध्ये तर काळोख झालाय केव्हाचा नि पिक्चर अजून संपलाच नाहीये…
dancershrutu@gmail.com