आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मँगोचा फोन येतो..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या सुटीत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वत:च्याच जगण्याकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळाली, त्याची गोष्ट जाणून घेऊयात श्रुती आवटे यांच्या या सदरात...
ही अशी संध्याकाळ अवतरली ना की मला खूप कसंसं होतं. ट्रॅफिकमध्ये गाड्यांच्या प्रकाशात अडकते मी. न्हाऊन निघते या प्रकाशात पण कुठलीच दिशा मिळत नाही. पण मुळात ‘दिशा’ नावाचा काही प्रकार असतो का? मला वाटतं कधी कधी की, उगाच अधिक संकल्पनांच्या गुंत्यात फेकले जातो, जगणं सुरळीत व्हावं म्हणून कदाचित! आणि म्हणूनच एकच एक दिशा आणि अधिकाधिक ‘फोकस्ड’ व्हायचा प्रयत्न करत राहतो. पण या अशा संध्याकाळी मी अजिबातच फोकस्ड राहू शकत नाही. म्हणूनच सोडून दिलंय मी अॅक्सलरेटरला. काय व्हायचं ते होऊदे या भावनेने. अन् तरीही मला माहित्येय की, मी असं बेभानपणे नाही ओलांडू शकत कुठलाही ब्रिज. सबकॉन्शस लेव्हलला मी भान बाळगतेच बहुधा. तू म्हणशील, किती सराईतपणे शिकलीस भान बाळगायला. तूच तर शिकवलं आहेस की! विसरलास इतक्यात? मला माहीत आहे, तू विसरभोळा आहेस खूप किंवा तू सिलेक्टिव्ह ते विसरतोस!

हो, मला माहीत आहे की, तू मला म्हणणार आहेस, ही अशी कातर संध्याकाळ नको ना घेऊन येत जाऊ! पण तुला खरं सांगू, संध्याकाळ एकच असते. आपणच त्या संध्याकाळच्या चित्रात कुठलेसे वेडेवाकडे रंग भरतो नि बिघडवून टाकतो सारं चित्र. हे संध्याकाळीविषयी बोलू लागले ना मी की मला त्या माझ्या मित्रांची आठवण येते. तेच ज्यांना डोळे नाहीत, पण तरीही त्यांना डोळे आहेत. किती सजगपणे पाहू शकतात ते त्यांच्या जगण्याकडे डोळे नसतानादेखील किंवा कदाचित डोळे नाहीत म्हणूनच. कारण आपल्याकडे एखादी गोष्ट असेपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही. म्हणूनच आपण तिचा व्यवस्थित वापर करत नाही. तसंच काहीसं! तुला खरं सांगू, डोळे असणं, ते दिसणं आणि दृष्टी या भिन्न गोष्टी आहेत. डोळे हा अवयव आहे. आणि या मित्रांनी मात्र तो अवयव त्यांच्याकडे नसताना तो आजमवलाय! जेव्हा जेव्हा मला माझा वेडेपणा आठवतो तेव्हा तेव्हा हे मित्रच माझी प्रेरणा ठरतात. त्यांच्यासाठी कशी असेल रे ही संध्याकाळ? त्यांना कळत असतील का संध्याकाळीलाही किती निरनिराळे रंग असतात ते? बस, त्यांना मी पंधरा-एक दिवस शिकवलं सुटीत… इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे! पण त्याच्या बदल्यात किती मोलाचं गिफ्ट केलंय त्यांनी मला. डोळे नसताना रस्त्यावरून आत्मविश्वासाने चालणं शिकवत होते ते मला, डोळ्यांनी वाचायला येत नसलं तरी हातांचा वापर करून वाचायला शिकवत होते ते मला, कँटीनमध्ये जाऊन मिळून मिसळून कसं खायचं-मजा करायची- कुठलाच अहम किंवा न्यूनगंड न बाळगता ते दाखवून देत होते ते मला. डोळे हा शरीराचा सुंदर अवयव असला तरी डोळ्यांविना असलेल्या अनोख्या सौंदर्याचा डेमो दाखवत होते ते मला. एक प्रचंड उत्साहाची देन होती ती, प्रेमाची होती!
आपल्या आयुष्यात कित्येक प्रेमाचे फ्लेवर्स असतात ना रे! किती वेगवेगळी सुतं प्रेमाची! आणि आता हे असे अॅबनॉर्मल म्हणवणारे पण स्मार्ट-हुशार असणारे मित्र भेटले की ते काही तरी वेगळंच देऊन जातात. त्यांची हुशारी ही पुस्तकी अभ्यासातली नसली तरी ती हुशारी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होतेय, हे महत्त्वाचं. त्यांच्यातल्या आणि माझ्यातल्या प्रेमाला नाव नाही देता येणार. कदाचित शब्दातही व्यक्त होऊ शकणार नाही ते. आणि ते पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही, तिथेच खरी मजा आहे. या माझ्या मित्रांची ना इंग्रजीमधे जरा अडचण येत होती. अर्थात, त्यात चूक त्यांची नव्हतीच. एकाने येऊन मला विचारलं, “ताई, बघणेला इंग्रजीत शब्द कुठला?”
“see/watch,” मी म्हटलं.
“पण मग सी म्हणजे तर समुद्र आणि बोल असं पण आहे ना?”
आणि मी क्षणभर ब्लँक झाले. मला कळेच ना की, मी याला स्पेलिंगमधला, उच्चारांमधला फरक कसा समजवून देऊ! sea म्हणजे समुद्र. See म्हणजे बघणे आणि say म्हणजे बोल. माझ्या शिकवण्याच्या कित्येक मर्यादा होत्या. मला हे असं स्पर्श करून अभ्यास नव्हता करता येत. अन् त्यांनाही मी तसं नव्हते शिकवू शकणार. माझ्या अभ्यासाला तो ‘टच’च नाहीये, याची मला पुरेपूर जाणीव झाली ती याच काळात! तुला कळेल का रे स्पर्शातून माझ्या आतली मी? मला परवाच एका राष्ट्र सेवा दलाच्या मानगावच्या शिबिरात बोलावलं होतं. तिथलं सेशन झालं की, मी तिथल्याच अंध मुलांच्या शिबिराला भेट दिली. किती हाइट असावी, त्या पोरांनी पाण्याची टाकी बांधली होती. नक्कीच की, त्यांची त्यांची एक वेगळी स्पेस आहे. त्यांची अशी एक वेगळी जागा आहे जिथे त्यांचं अख्खं असणं रिफ्लेक्ट होऊ शकतं. आपण किती तरी काळ आपल्याच स्पेसमधे, आपल्याच पार्किंगमधे उगाच घुटमळतो राहतो. खरंतर, सोप्प्या असणाऱ्या गोष्टीच किती भयानक अवघड करून टाकतो आपण. तुला नाही असं वाटत? जसं की, मला आत्ता भयानक अस्वस्थ होतंय. आणि कारणंच सापडत नाहीत किंवा कदाचित कारणं माहीत असतात, पण ती स्वीकारायला नको वाटतात. किंवा कधी कधी त्या अस्वस्थतेच्या कांद्याचा पापुद्राच काढता येत नाही नीटसा आणि मग गोंधळ उडतो. पण हे मात्र निश्चित की, आपण ना स्वतःला सहानुभूती मिळावी असं वागत राहातो. ठरवून नाही, आपल्याही नकळत! आपण आपल्या चुकाच पाहू शकत नाही मग, असं होऊन जातं. पण या मुलांना कधीच सहानुभूती नको असते. रस्ता क्रॉस करतानासुध्दा ते किती सेल्फ डिपेंडंट असतात! तरीही मला भयानक अस्वस्थ होऊ लागतं. इतक्यात माझा फोन वाजतो. संतोष एस.पी. असं नाव फोनवर उमटतं. मी फोन उचलते.
“हॅलो ताई, मँगो बोलतोय…”
आमचा मँगो!
“मी आंबा खातो, असं इंग्रजीमध्ये म्हण,” असं सांगितल्यावर “आय एम मँगो,” असं म्हणणारा… मग मी त्याला मँगोच म्हणू लागले.
“हॅलो ताई, ओळखलं ना? मँगो बोलतोय गं…”
“हॅलो मँगो… बोल…”
आणि क्षणात मी माझ्या अस्वस्थतेला दूर लोटलं होतं.

(dancershrutu@gmail.com)