आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इट्स रेड! सेम पिंच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवाच माझ्या एका मैत्रिणीच्या घराचं शिफ्टिंग सुरू होतं. मी तिथे तिच्या मदतीला गेले होते. बोलता बोलता तिनं मला सांगितलं, “अगं तुला माहितेय, मुंबईत म्हणे एका मुलीला ती मुस्लिम होती म्हणून फ्लॅट दिला नाही रेंटवर.”

मी काही अशा पद्धतीची गोष्ट पहिल्यांदा ऐकली होती असं नव्हतं; पण आपल्या विचारांना त्या त्या दिशेने पुढे जाण्याकरिता एक ट्रिगर पॉइंट लागतो. तोच तो पॉइंट, जेव्हा तिनं मला हे सांगितलं.
मी एकदम फ्लॅशबॅकमधे गेले. माझा एक मित्र होता युसूफ म्हणून. तो जेव्हा जेव्हा रूम पाहायला जायचा तेव्हा तेव्हा त्याला त्याचं नाव बदलावं लागे. अर्थात अनुभवांमुळेच. युसूफचा अथर्व, कैवल्य, अभिजित कधी आणि कसा झाला हे कोणालादेखील कळलं नाही.

खरं सांगू, मी जेव्हा असं काही ऐकते, अनुभवते तेव्हा मला काहीच बोलावं वाटत नाही. सुन्न व्हायला होतं अगदी. पण माझं सुन्न होणं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असं मला वाटतं. काय सांगावं, तुमची आणि माझी सुन्नता एकाच ‘धरती’वरची असेल कदाचित! आपण कुठे चाललोय हेच कळेनासं होतं मला कधी कधी माहितेय?
आम्ही एकदा विकत घेण्यासाठी फ्लॅट पाहायला गेलो तेव्हा त्या एजंटने या फ्लॅट्चे प्लस पॉइंट म्हणजे, “गॅलरी मोठी आहे, कार्पेट एरिया मोठा आहे. सातव्या मजल्यावर असल्याने कुठलीच बिल्डिंग आड येत नाही गॅलरीतून, व्ह्यू एकदम सुंदर दिसतो आणि या एरियात कुठे मशीद वगैरे पण नाहीये,” असं सांगितलं.

मी अवाक््च! इथेच किती तरी गोष्टी आड आल्या होत्या. व्ह्यू एकदमच ढासळला होता, हे त्याला कसं कळलं नाही ‘देव’ आणि ‘अल्लाह’च जाणे! कुठलं मंदिर असणं, मशीद असणं यानं असा काय फरक पडणार आहे तुम्हाला-आम्हाला? फरक पडतो का? त्यानं आम्हाला असं सांगितलं म्हणजे कोणाला तरी आपल्या घराजवळ मशीद असल्यानं फरक पडतो. दुर्दैवाने का होईना, पण कोणाला तरी फरक पडतो.

मुंबईतली मिसबाह मुस्लिम असते म्हणून तिला रेंटवर घर मिळत नाही, युसूफला कित्येकदा राहण्यासाठी जागा असावी यासाठी अभिजित व्हावं लागतं, ‘कांबळें’ना फ्लॅट हवा असेल तर त्यांची किती तरी चौकशी केली जाते, एखाद्या मुस्लिम मुलाच्या नोकरीच्या अर्जाला सरळ उत्तर येतं -“We are not interested in muslims,” आणि आपल्याला घर घ्यायचं असेल तर शेजारी मशीद नको असते. या सार्‍याचा काय निष्कर्ष निघतो? आपण कोण आहोत कोण? मी श्रुती? मी अमुक अमुक जातीची? की मी हिंदू? मी नेमकी कोण? फिलॉसॉफिकल बोलत नाहीये हं मी. एक साधा प्रश्नय माझा- ‘आपण कोण आहोत?’ त्याचा धर्म वेगळा आहे म्हणून का त्याला त्याची देशभक्ती प्रूव्ह करून दाखवायला लागते? नि आपण हिंदू असतो म्हणून आपण देशप्रेमी असतोच? जणू काही ते गृहीतच आहे.

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा नेमका अर्थ गवसलेला असतो का खरंच? धर्मनिरपेक्ष म्हणजे या भारत देशाचा कुठलाही धर्म नाहीये. ज्या ज्या वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे राहतात त्या सर्वांचा आदर केला पाहिजे. आणि जर भारताचा कुठला धर्म असेलच तर ते आहे- भारताचं संविधान! माझ्या घरात गीता श्रेष्ठ असेल तर तुमच्या कुरान किंवा त्याच्या बायबल ऑर व्हाइस व्हर्सा. पण आपण जेव्हा रस्त्यावरती येतो, सार्वजनिक ठिकाणी असतो तेव्हा मात्र भारताचं संविधान हाच धर्म आहे. म्हणूनच भारताचं संविधान काय सांगतं नेमकं, हे आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. ते जाणून घेतलं पाहिजे. त्याचा अंगीकार केला पाहिजे.

माझं नाव क्ष आहे आणि तुमचं य, इतकीच क्षुल्लक गोष्ट असते तुम्ही हिंदू असणं आणि मी मुस्लिम किंवा तुम्ही जैन असणं आणि मी ख्रिश्चन किंवा कसंही. ही सगळी आवरणं आहेत माहीत्येय का? फुकटची आवरणं! आणि ती आवरणं आहेत हेच समजायला आपल्या आयुष्याचा किती तरी काळ लोटतो. पण या आवरणांवरच किती काळ बढाया मारणार आहोत आपण? आणि किती काळ ‘माझाच ड्रेस छान तुझ्यापेक्षा’ इतक्या बालिश गोष्टींवर भांडत बसणार आहोत.

तुमच्या-माझ्या कपड्यांच्या आत असणारी कातडी म्हणजे आपण असणं आणि कपडे म्हणजे तुमची माझी जात-धर्म वगैरे वगैरे! मग कातडी आहे ना सारखी आपली. खरंच! जरा निरखून पाहा. आपण माणूस आहोत. बाकी शून्य! बाकी काहीही उरत नाही. पूर्वीच्या काळी पाडले गेलेले जात-धर्म, मग किती काळ म्हणायचं की ‘जुनं ते सोनं.’ आपल्याला आपले काही विचार आहेत की नाही? आपण आपल्या विचारांना मॉडिफाय करू शकणार आहोत की नाही? आपण दररोज जिम करतो आणि शरीर फ्लेक्जिबल बनवतो खरे पण आपल्या विचारांत फ्लेक्झिबिलिटी आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार की नाही? उत्तरं शोधावी लागतील. त्याशिवाय पर्याय नाही!

ते एक गाणं आहे ना-
ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा!
हिंदूचं रक्त वेगळं नि मुसलमानांचं वेगळं असं काही असतं का? सारीच तर माणसं!
आपलं रक्त? ओह इट्स रेड यार! सेम पिंच!
श्रुती आवटे, पुणे
dancershrutu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...