आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्र्यांना अनावृत्तपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिय विनोदसर,
आत्ताच माझे बाबा म्हणाले, “अगं ‘विनोदसर’ काय म्हणतेस त्यांना, शिक्षणमंत्री आहेत ते आपले. अशा वेळी आदरार्थी शब्द वापरावेत.” पण खरं सांगू सर, आमच्या पिढीला हे झेपतच नाही. ‘विनोदसर’ म्हणताना बोलण्यात अचानक एक मोकळीक येते आणि तरीदेखील त्यात तुमच्याविषयीचा नितांत आदर आहे. तर हे सगळं असं; पण मला सांगायचाय
वेगळा मुद्दा. सर, परवा एका साहित्य संमेलनाचं उद्घाटन करून मी घरी आले आणि तुमचं पत्र हातात पडलं. मला विश्वास बसत नव्हता कितीतरी वेळ! म्हणजे, आपण एखादं छोटंसं पुस्तक लिहावं आणि त्याचं डायरेक्ट शिक्षणमंत्र्यांनीच कौतुक करावं, भारीच वाटलं मला! तुम्ही ‘लॉगआउट’ची दखल घेतलीत, मला प्रचंड आनंद होतोय! खरं तर, तसं तुमच्याशी बोलण्याचा कधी मुहूर्त येईल, असं यत्किंचितही वाटलं नव्हतं. पण आज तुम्ही स्वतःहून पत्र पाठवलंय तर
मलाही माझे काही मुद्दे तुमच्याशी सविस्तर बोलावेसे वाटताहेत. म्हणून हे पत्र!
सर, खरं सांगू, लोक ‘लॉगआउट’चं कौतुक करतायत. तुमच्यासारखे मोठे लोक मला पुढच्या लिखाणासाठी प्रोत्साहित करतायत. ब-याच जणांना मी इतक्या लहान वयात, सोळाव्या वर्षी कादंबरी लिहिली, याचं अप्रूप आहे; पण मला खरंच आकळत नाहीये, की माझ्यापेक्षाही लहान असणा-या कोणाला याअगोदर खरंच वाटलं नसेल का, की आपलं जग आपण लिखाणाच्या स्वरूपात मांडावं किंवा आपली अस्वस्थता, अडचणी, कोलाहल आपण मांडावा? मला याचं उत्तर ‘नाही’ असं वाटतंय. म्हणजे, सर, अशा कित्येक ‘श्रुती आवटे’ असतील ज्यांना त्यांचं जग, त्यांच्या खिडकीतून दिसणारं आभाळ मांडायचं असेल. अशी कितीतरी मुलं असतील ज्यांना त्यांच्या मनातला गोंधळ व्यक्त करायचा असेल. पण सर एक प्रॉब्लेम आहे. तो असा, की आम्हाला मोकळं वातावरणच मिळत नाहीये. आम्हाला ती स्पेसच हे मोठे लोक, ही
समाजव्यवस्था मिळू देत नाहीये आणि मग जेव्हा माझी कादंबरी येते तेव्हा लोकांना प्रचंड आश्चर्य वाटतं; पण जेव्हा ‘लॉगआउट’ शीर्षकाच्या खाली श्रुती आवटे असं लिहिलेलं असतं, तेव्हा त्या श्रुतीमधे कितीतरी व्यक्ती दडलेल्या असतात सर. हे सगळं फक्त मी नाही बोलत. माझ्यात समाविष्ट असणा-या सगळ्या व्यक्ती मला व्यक्तण्यास भाग पाडतात. ही
समाजव्यवस्था मला बोलायला भाग पाडते. कारण मला माझं त्या क्षणाचं व्यक्तण्याचं माध्यम गवसलेलं असतं. पण मग सर, बाकी मुलामुलींचं काय? ज्यांना आपण ती स्पेसच नाही देऊ शकलोय? ज्यांना आपण ती-ती माध्यमं हाताळून बघायला वावच नाही देत आहोत?
आणि म्हणून सर, कुटुंब कितपत बदलू शकेल, याचा मला अंदाज येत नाहीये; पण शाळा हे काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडू शकेल असं वाटतंय. शाळेनं मुलांना अधिकाधिक मोकळं केलं पाहिजे. आम्ही पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट होऊ; पण आमची अस्वस्थता, आमचं आतलं म्हणणं, मनाच्या तळाशी असलेले सगळे विचार मांडता यायला
हवेत, म्हणून शाळेनंच आम्हाला प्रत्येक माध्यमं हाताळायला द्यावीत, नाही का? आणि म्हणून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड रिलेशनशिप यापासून लैंगिक शिक्षणापर्यंत, सुंदर दिसण्यापासून मनाच्या सौंदर्याचा शोध घेण्यापर्यंत, बुद्ध–कबीर-गांधींपासून आजच्या राजकारणापर्यंत, घरातल्या प्रॉब्लेम्सपासून पुस्तकी अभ्यासापर्यंतचा सगळा ‘अभ्यास’ ही शाळा घेऊ शकते.
सर, आज कितीतरी ‘नितीन आगे’ मारले जातायत, कितीतरी ‘निर्भयां’वर बलात्कार होतोय आणि तरीही ‘बलात्कार’ या शब्दाचं विडंबन ‘चमत्कार’ करून त्यावर हसणारे आपण!
आपण नक्की कुठून कुठे चाललोय?
कुठे हरवलीये आपली संवेदनशीलता?
काय घडतंय असं की जे आपली संवेदनशीलतेची मुळं छाटून टाकतंय.
का पिंपरीतला मुलगा त्याला जर्किन घेऊन दिलं नाही म्हणून आत्महत्या करतोय?
इतकं इन्स्टंट झालंय का आयुष्य, की हवं तेव्हा सुख-दुःख आपण ऑर्डर करू लागलो आहोत?
आणि ते नाही मिळालं की आत्महत्येशिवाय आपल्याला कुठला दुसरा पर्याय मिळत नाहीये. आयुष्य इतकं स्वस्त झालंय
का? काहीतरी बेसिकमध्ये झोल झालाय सर!
आणि म्हणून माणसाच्या ‘जडणघडणी’च्या काळात त्याला खरं तर माणूसपणाची व्याख्या शिकवली गेली पाहिजे. स्त्री
किंवा पुरुष होण्यापेक्षा, अमुक एका जाती-धर्माचे होण्यापेक्षा माणूस होणं काय चीज आहे, हे समजावून सांगितलं पाहिजे,
असं मला मनोमन वाटतंय. आणि मग हे जेव्हा समजेल, प्रत्येक व्यक्तीला आपापली व्यक्तण्याची स्पेस मिळेल तेव्हा अशा
लाखो ‘लॉगआउट-लॉगइन’ येतील. प्रत्येक जण रिक्त होऊ शकेल पुन्हापुन्हा! आणि तुमच्यासारखी सजग व्यक्ती
शिक्षणमंत्री म्हणून लॉगइन झालेली असताना हे सहज शक्य होईल, अशी आशा वाटते सर. सरकारने त्यासाठी
रचनात्मक पातळीवर काही करायला हवं, असं वाटतं.
इतकंच काय ते माझं म्हणणं.
काहीही असो सर; पण तुमची पाठीवर असलेली शाबासकीची थाप प्रचंड बळ देणारी आहे आणि इथल्या प्रत्येक श्रुतीला
ही शाबासकी तुमच्याकडून मिळेल, अशी खात्री वाटते.
इथेच थांबते.
तुमची,
श्रुती आवटे, पुणे