आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुझ पर एक एहसान करना...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिय सल्लूमियां,
तुला पत्र लिहावं असं खूप दिवसापासून डोक्यात होतं खरं तर. पण ते लिहिण्याकरिता आजचाच दिवस उजाडावा लागला. आज मी दुकानात गेले तिथे काही मैत्रिणींमधे चर्चा चालली होती की, बॉयफ्रेंड किंवा नवरा प्रत्येकीला कसा कसा हवा आहे वगैरे. चर्चा सुरू असताना एक मुलगी अचानक म्हणाली, “मला ना, सलमान खानसारखा बॉयफ्रेंड हवाय.” आणि मग “मला पण… मला पण…” आणि “अगं, मग जा ना समलानला प्रपोज कर. तसंही त्यानं लग्न केलं नाहीये,” अशा प्रतिक्रिया येत राहिल्या. आणि मी हलकेच या संवादातून बाहेर पडले; पण त्या क्षणापासून तुझा नि माझा संवाद पुन्हा एकदा सुरू झाला. नेहमी तू बोलतोस पडद्यावरून नि मी ऐकते. आज उलटं झालं. आज मी बोलत होते नि तू फक्त ऐकत होतास.
सल्लूमियां, मला खरं सांग ना, काय झालं होतं त्या रात्री? तुझ्याकडून चूक घडली होती ना रे? तू नशेत होतास म्हणूनच असं झालं ना? सांग ना. तुझं उत्तर ‘नाही’ असंच असावं, असं मलाही वाटतं; पण ते ‘खरं’ असावं. माणूस नशेत जातो काय अन् नशेत गाडी चालवून दुसऱ्यांचा जीव मारून टाकतो काय आणि ही चूक घडली तरी तो बारा-बारा, पंधरा-पंधरा वर्षं मोकाट जगात फिरतो काय, त्याला या गुन्ह्याची शिक्षा मंजूर होण्यादरम्यान त्याला बेल मिळतो काय आणि त्या निमित्ताने त्याचे फॅन्स आणि तो फटाके वाजवून सेलिब्रेशन करतात काय! नाही, मी तुझ्यावर रागवत नाहीये. मी त्या विचित्र माणसावर रागवत्येय जो तुझ्यात लपलाय. बीइंग ह्युमनचे टी-शर्ट बनवून ज्या टी-शर्टच्या आतल्या माणसात खरा ‘ह्युमन’च जाऊ शकला नाही, मी त्या माणसावर रागावत्येय. बेल मिळाला म्हणून कुठलं सेलिब्रेशन केलंत तुम्ही सल्लूमियां? कसला उत्सव होता तो? त्या निरो राजासारखा? रोम जळत असतानाही संगीतात रममाण होणाऱ्या राजासारखा की तू त्या निरोचा पाहुणाच? चूक होणं ठीक आहे रे. पण त्या चुकीची शिक्षाही भोगली पाहिजे ना! आणि म्हणून तुझ्या चुकीची जी काही पाच-सात वर्षं जेलमधे जाण्याची शिक्षा आहे ती तू स्वीकारत नाहीस आणि तिथेच तुझ्यातलं ‘माणूसपण,’ तुझं ‘हीरो’ असणं गळून पडतं. आणि तुझी पडद्यावरची फायटिंग फोल ठरते, निव्वळ अळवावरचं पाणी…
स्वतःच्या फिल्मच्या प्रीमियर शोमध्ये ‘कॅरेक्टर ढीला है असं म्हणत नाचत असताना सल्लूमियां तुला तुझं कॅरेक्टर लूज झालंय हे नाही दिसलं कधी पडद्यावर? तुला नाही दिसली कधी ती तू जखमी केलेली, तुझ्यामुळे मारली गेलेली माणसं पडद्यावर? तुझ्या डोळ्यासमोर कधीच आला नाही का त्यांचा चेहरा? की तू ‘एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता’ असं म्हणतच उभा आहेस अजून नि त्यामुळे तुला तुझ्या आतला आवाज ऐकूच येत नाहीये? सल्लूमियां, एक माणूस मरतो म्हणजे काय होतं माहीत्येय? ते माहीत असण्याकरिता जगणं समजावून घ्यावं लागतं. एक माणूस मरतो म्हणजे त्याबरोबर त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा-आकांक्षा मरतात. तुटून पडतं सगळं. राडा होतो सगळा. त्या माणसाला जोडली गेलेली कित्येक माणसं विस्कटून जातात, त्यांचं जगणं उद्ध्वस्त होतं. तुझ्यासारख्या बंगल्यात राहणाऱ्या, चोवीस तास एसीमध्ये राहणाऱ्या, जरा ऊन लागलं की अम्ब्रेला डोक्यावर धरली जाणाऱ्या, चुटकीसरशी एक लाख रुपये खर्च करणाऱ्या माणसाला हे कितपत कळू शकेल, मला माहीत नाही; पण तू इतका लाडका आहेस माझ्या मित्रमैत्रिणींचा आणि तुला साधं स्वतःच्या आरशातून स्वतःकडे नीट पाहता येत नाही, हे विशेष वाटतंय मला. मेकअपमनने खूपच मेकअप केलाय का रे तुझ्या चेहऱ्यावर की तुला तुझा ओरिजनल चेहराच पाहता येऊ नये?
तुझे फॅन्स, तुझे मित्र तुला सपोर्ट करतात. तुझी चूक नाहीये असं सांगतात. का माहीत्येय? कारण त्यांचं तुझ्यावर नाही, तू जी तुझी इमेज बनवलीयेस ना पडद्यावर त्याच्यावर प्रेम आहे. तोच ‘हम आप के हैं कौन’मध्ये गोड दिसणारा, ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये चॉकलेट बॉय म्हणून समोर आलेला, ‘दबंग’मधे फायटिंग करणारा, अँग्री यंग मॅन! पण खरा ‘तू’, नशेत असताना वेडवाकडी गाडी चालवून माणसांना चिरडून टाकणारा तू कधी पडद्यासमोर आलाच नाहीस. माणसाचं प्रेम आंधळं असतं, इतकं तर माहीतच असेल तुला! आणि म्हणूनच प्रचंड प्रेमाने ‘भाईजान’ म्हणतात तुला लोक. तुझ्याकडून झालेल्या चुकीला पडद्याआड घालण्यासाठी लोक इतके असंवेदनशील होतात की, फुटपाथवर लोकांनी झोपावंच कशाला, इतकी जागा असताना? मुंबईत माझ्याजवळ पैसे नसतानादेखील मी फुटपाथवर झोपलो नाही. त्यामुळे जे लोक फुटपाथवर झोपतात त्यांचीच चूक आहे, असंही तुझ्या एका मित्राने म्हणून टाकलंय. नाही नाही! तुझ्यावरचं प्रेम म्हणून नसतील करत तुला सपोर्ट तुझे मित्र. ते पण चालाख आहेत रे. तू जेलमधे गेलास तर पैशाची, त्यांच्या अर्थव्यवस्थेची किती बोंब होईल हे माहीत्येय ना त्यांना! म्हणूनच ते तुझा वापर करून घेत आहेत. आणि अजून तू या लोकांचंच डिरेक्शन स्वीकारलं आहेस. तुला हाच चित्रपट हवाय. कारण तुला स्वतःचं स्क्रिप्ट रायटिंग करता येत नाही ना डिरेक्शन. तू फक्त डिरेक्टरच्या तालावर नाचू शकतोयस दुर्दैवाने आणि तुझ्या डिरेक्टरने तुला तुझ्या आत पाहायची संधी कधी देऊच केली नाही.
...आणि तरीही मी पत्राची सुरुवात ‘प्रिय’ या शब्दाने केलीये. खूप काळजीपूर्वक वापरलाय हं मी हा शब्द अजूनही तुझ्यात काही बदलाची अपेक्षा करत. माणूसपणाच्या दिशेने वाटचाल करावीस याकरिता. स्वतःसाठी नाही किमान तुझ्या फॅन्ससाठी तरी कारण कित्येक लोकांचा ‘हीरो’ आहेस तू! तरी मला त्या मुलींना सांगायचं होतं आज की, तुमचा सल्लूमियां म्हणतो, ‘फरक पडता है क्या बाहों मे मुन्नी है या शीला है’ त्यामुळे जरा सांभाळूनच; पण नाही सांगितलं कारण मला अजूनही असं वाटतं, तू मात्र आमच्यावर एक एहसान करू शकशील, ‘ह्युमन’ होण्याचा!
- तुझी फॅन नसणारी, श्रुती आवटे
dancershrutu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...