‘पोरी तू इचारतीस म्हणून सांगते, ह्ये बघ, मी सकाळी चारला उटते. साडेपाचला कामावर जावं लागतं. तोपर मी घरातली कामं उरकून घेते. कामावर गेलं की कसं, अकराला सुट्टी असती. मग घरी येते. पोराबाळांचं आवरून देते. परत कामावर जाते. उन्हातानात काम करायचं. ते घरी रातच्या टायमालाच यायचं. मंग परत घरी आल्यावर सैपाक करावं लागतोय. जेवायचं. परत घरचं सगळं काम. तरी आमची गुड्डी जरा मदत करत्येय बघ. आता घरची कामं तरी काय थोडी असत्याती का ! तू बी पोर हाय. तुला कळत असलंच. बरं एव्हढं काम करायचं ते करायचं आन पैसा काय मिळतो.’ बांधकामाच्या साइटवरच्या कामगार बाईशी मी बोलत होते.
‘बरं. मग जो काही पैसा येतो, तो मिळाला की तो तुमच्याकडेच
असतो की…’
‘कितीबी कमवा आन काय बी करा, स्वतःच्या कष्टानं कमवा पन बाईच्या हातात कधी तरी पैसा असतो का बाय!’
तिच्या या वाक्यातून बाईच्या हातात पैसा नसतोच, जणू काही तसा नियमच आहे असं वाटत होतं.
नंतर माझ्या ओळखीतल्या एका पोळ्या करणाऱ्या, धुणंभांडी करणाऱ्या मावशींना भेटले. ‘मी पैसा कमवला तरी मी स्वतंत्र नाहीये. माझा येणारा पगार मला ह्यांना द्यावा लागतो. त्यामुळे कुठलीही वस्तू घ्यायची की नाही याचे सगळे अधिकार ह्यांच्याचकडे.’
‘तुम्हाला नाही वाटत की, तुमच्या पैशावर तुमचा अधिकार
असायला हवा?’
‘वाटतं गं कधी कधी; पण परत वाटतं जाऊदे. बाकी व्यवहारातलं
आपल्याला नाही ना बघावं लागतं. मग गेलं स्वातंत्र्य चुलीत. शेवटी चूल आपल्यावरच चालते ना!’
त्यांचं साधं-सोप्पं गणित ठरलेलं होतं. मी यावर काय बोलणार होते! कष्ट तिनेच उपसायचे, पैसा तिनेच घरी आणायचा, चुलीवर रांधायचंदेखील तिनेच पण त्या चुलीवर असणारी भांडी मात्र तिच्या चॉइसची नाहीत, तिला हवी तशी नाहीत, घरातल्या भितींवरच्या रंगाशी आणि तिचं कसलंच नातं नाही. तिने फक्त चुलीसमोर बसून फुंकत राहायचं फंुकणीने आणि त्या येणाऱ्या धुराशीच बनवायचं
जन्मोजन्मीचं नातं!
माझ्या घरापासून इतक्या जवळ असलेल्या एका कन्स्ट्रक्शन साइटवर काम करणाऱ्या महिलेचं जीवन समजून घेताना मला जाणवलं की मी किती दूर राहते! जणू माझं नि तिचं जगच वेगळं आहे. मॅक्डी, केफसीवाल्या आपण कशा राहतो नि ही बाई! कामगार दिनाच्या निमित्तानं मी तिच्याशी बोलायला गेले; पण मी स्वतःहून माझा कम्फर्ट झोन सोडून तिच्या विश्वात जायचा का प्रयत्न करत नाही? त्या मावशींना भेटून आले नि मग काही लेख वाचले तर आणखी धक्कादायक माहिती मिळाली, ती अशी-
इंटरनॅशनल लेबर ऑरगनायझेशन असं सांगतं की,जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. आणि त्यातल्ं ३० टक्के श्रमिक बळ कामगार महिलांचं आहे. हाइट म्हणजे, कामाच्या एकूण तासांपैकी ६० टक्के तास महिला काम करतात. आणि तरीही त्यांना निव्वळ १० टक्के पैसा मिळतो. जगातील एकूण प्रॉपर्टीच्या अवघी १ टक्के प्रॉपर्टी महिलांच्या नावे आहे.
तुमच्या कामाच्या मोबदल्यात तुम्हाला त्याचा पुरेपूर मोबदला न मिळणं हे किती दुर्दैवी आहे. आता हेच बघा ना, आपल्या घरात येणारी मोलकरीण जेव्हा ठरलेल्या दिवसांपेक्षा जास्त सुट्या घेते तेव्हा आपणही तिचे तेवढ्या दिवसाचे पैसे कट करतो. तिने थोडे पैसे वाढवून मागितले तर पण तिच्यावर आवाज चढवतो.