आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणि मी नाचू लागले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला आठवतं, मी आठवी-नववीत असेन तेव्हा एका सांस्कृतिक, नृत्य-गायनाच्या कार्यक्रमाला गेले होते. आणि तिथे कथक नृत्य सादर होणार होतं. मीही नुकतंच कथक शिकायला सुरुवात केली होती. त्यामुळे जो कार्यक्रम सादर होणार होता त्यासाठी मी खूप प्रचंड उत्सुक होते. मला खूप लहानपणापासून नाचाची आवड! आई तर म्हणते, हिच्या अंगातच आहे नाच! आहे की नाही ते माहीत नाही. पण मी ना डान्स एन्जॉय करते. म्हणजे कुठलीही आनंदाची गोष्ट घडो, माझ्यासाठी तो आनंद व्यक्त करण्याचं पहिलं माध्यम म्हणजे डान्स! आणि दुःख वाटत असेल किंवा अस्वस्थता असेल तर ती हमखास लिखाणातून येते. प्रत्येक कलेचं आपआपलं स्थान असतं नै आपल्या आयुष्यात. आनंद असो वा दुःख, काही काळानंतर का होईना पण ते व्यक्तण्याची गरज असते. तरच आपण रिक्त होऊ शकू पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा नवं नवं शोषून घेण्यासाठी! आणि म्हणूनच व्यक्त होण्यासाठी आपआपली हक्काची माध्यमं असणं, अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नाचाने खूप काही दिलंय मला, हे मला प्रत्येक क्षण सांगतो. कारण मी उभी असते तेव्हाही नाचतच असते. कारण मी अभ्यास करत असते तेव्हाही नाचतच असते पुस्तकाच्या तालावर. कारण मी गाडी चालवते तेव्हाही माझे डोळे नाचतच असतात अॅक्सलरेटरच्या संगतीनं. कारण मी झोपलेली असते तेव्हाही नाचतच असते हृदयाच्या ठोक्यांवर. कारण... कारण, मी आनंद शोधत असते दुःखाच्या मानगुटीवर बसून! दुःखच देतं प्रेरणा नव्या आनंदाची.

माझ्या आयुष्यात डान्स आहे जगण्याचं बायप्रॉडक्ट, जे क्षणोक्षणी साथ देतं मला. घुंगरांच्या बोलातून जगण्याचे बोल शिकवतं जातं ते मला. शरीराच्या मोहक हालचालीतून जगणं मोहक बनवत जातं ते माझं. डोळ्यातल्या भावांनी जगण्याकडे आकर्षून घेत जातं ते मला. आणि तेच अधिक महत्त्वाचं ठरतं माझ्या जगण्यासाठी. कुणाच्याही जगण्यासाठी आनंदाशिवाय आणखी काय हवं असतं माणसाला? आणि तेच देतात मला हे घुंगरांचे बोल. आणि या शरीराच्या हालचाली, हे गाण्याचे लयबध्द स्वर. आनंदात कुठला इगो पॉइंट नसतो, की भिडस्त स्वभाव की कोणाच्या पुढे जाण्याची इच्छा किंवा कुणाला तरी मागे खेचण्याची आकांक्षा. आनंद हा निखळ आनंद असतो. त्यात स्पर्धा नसते. आणि केली तरी ती स्पर्धा होऊच शकत नाही. कारण तराजूच्या पारड्यामधे आनंद तोलता येत नाहीत. There is always a difference between pleasure and happiness. Pleasure belongs to materialistic things and happiness is pure happiness, by heart, from soul!

तर मी सांगत हे होते की, मी तो कार्यक्रम पाहण्यास प्रचंड उत्सुक होते. गायन-वादनाचा कार्यक्रम काही काळ चालू राहिला. आणि त्यानंतर नाचाचा-कथकचा कार्यक्रम सुरू झाला. आणि माझे डोळे विस्फारत गेले. मी नेमकं काय पाहत होते तेच मला कळत नव्हतं. कदाचित तेच माझ्या आनंदाचं परमोच्च टोक होतं, जे माझ्यासमोर असलेल्या स्टेजवरच्या माणसाने कमावलं होतं. अं हं… नाही नाही. ‘आनंद कमावणे’ ही टर्म योग्य नसावी. आनंद आपण अनुभवत असतो. आनंदाला कुठलंच गणित नसतं अन् म्हणूनच कुठला फॉर्म्युलादेखील नसतो. मला एकदम आठवलं, संक्रातीत काहीतरी प्रोग्रॅम असतो ना कुठली तरी वस्तू लुटायची वगैरे. तसं माझ्या आईने ना एकदा ‘आनंद लुटूया’ अशी कन्सेप्ट ठेवून त्यावर कार्यक्रम घेतले होते. हां, तर आनंद आपण लुटू शकतो. कमावणे, गमावणेसारखे व्यवहारात्मक शब्द नकोत आनंदासारख्या निखळ गोष्टीला. हाच तो निखळ आनंद. केवळ आनंद ती समोरची व्यक्ती मला देत होती. त्यांच्या नाच करण्यात केवळ नाच नव्हता. ते त्यांचं जगणं होतं हे काही वेगळं सांगायची गरजच नव्हती. ते लख्ख दिसत होतं त्याच्या एका एका गिरकीतून. पन्नास चक्कर घेऊन ते थांबले तरी मी मात्र अजून त्यांच्या गिरकीतच होते. पायाला बांधलेल्या दोनशे घुंगरांपैकी फक्त आणि फक्त एका घुंगराचा आवाज करत तो जो काही बॅलन्स आणि घुंगरांच्या आवाजावर असलेला त्यांचा कन्ट्रोल, त्यांचा त्यांच्या जगण्यावर किती ताबा आहे हे सांगत होतं. पायाचा आवाज करत करत हळू हळू तो अगदी धीमा करून त्याला नष्ट करून त्या आवाजाला परत आणेपर्यंतचा प्रवास जणू काही शोधयात्रा होती. ती जगण्याची होती की फक्त नाचाची होती? माझी खात्री आहे, हे फक्त कला जेव्हा जगण्यात समर्पित होत असेल तेव्हाच घडू शकतं.
आणि इतक्यात आजूबाजूला चाललेली चर्चा माझ्या कानावर पडली- “अरे यांच्या पायात रॉड आहेत.” मी अवाक् झाले होते. अ…वा…क्! याला काय म्हणावं? हे डान्सवरचं प्रेम आहे? की पॅशन? की अॅम्बिशन? की आणखी काही? डान्सवरचं त्यांचं निस्सीम प्रेम, स्टेजला उत्फुल्ल करत होतं आणि प्रेक्षकांनादेखील! नाच साधना आहे. कुठलीही कला ही तुमच्यासाठी साधना बनली की, काम सोप्पं होऊन जातं. मग तुम्ही त्यावर आवर्जून, त्रासाने कष्ट घेत नसता तर तुमचं त्यावर प्रेम असतं, अपार श्रध्दा असते म्हणून करत असता. तेच होतं त्यांचं. ते ऑडियन्ससाठी नाचत नव्हते, स्वतःसाठी नाचत होते. आणि तिथेच खरी मजा होती. मी बघत होते त्यांच्यात चमकणाऱ्या विजा, ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम धार, आणि अचानक कोसळणारा मुसळधार पाऊस! मी अनुभवत होते. मी चिंब भिजत होते. आणि... मी माझ्या बॅगमधले घुंगरू पायाला बांधून नाचू लागले… स्वतःसाठी!
बातम्या आणखी आहेत...