हा अखेरचा स्तंभ लिहिताना, लिहायच्या अनेक गोष्टी आणि विषय राहून गेल्याची जाणीव होते आहे. उदाहरणार्थ, ‘दुनियादारी’ आणि सुहास शिरवळकर किंवा चंद्रकांत काकोडकर असे बरेच विषय आहेत. पण अक्षरश: जागतिक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळालेला विषय म्हणजे, ‘मिल्स अँड बून’ प्रकाशनाची पुस्तके! सहसा दुकानात जाऊन वाचक लेख किंवा पुस्तकाच्या नावाने मागणी करतात, पण या पुस्तकांचे वाचक (प्रामुख्याने कॉलेज युवती) दुकानात विचारणार, ‘मिल्स अँड बून है क्या?’
1908पासून जवळजवळ ही पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. पण 1930 पासून बदलत्या स्वरूपात ती प्रसिद्ध होऊ लागली. हा काळ मंदीचा होता, हे लक्षात घ्यायला हवे. आणि पलायनवादी साहित्याची, वास्तव विसरायला लावणा-या साहित्याची गरज अशा काळातच जास्त असते. प्रामुख्याने आधी इंग्लंडमध्ये खपणारी ही पुस्तके पुढे जगभर लोकप्रिय झाली. हे कसे झाले, हे पाहणे उद्बोधक ठरेल. 1950नंतर पुस्तके भाड्याने वाचायला देणारी वाचनालये बंद पडली, तेव्हा न्यूजपेपर स्टॉलवर पुस्तके उपलब्ध करून देण्यात येऊ लागली. 2008मध्ये त्यांचा वार्षिक खप 20 कोटी इतका होता. दरमहा त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध होत आणि ती केवळ महिनाभरच दुकानात, न्यूज पेपर स्टॉलवर उपलब्ध असत. तीन महिने ती थेट मागवता येत. यानंतर सरळ ती नष्ट केली जात.
भारतात ही पुस्तके अधिकृतपणे 2008नंतर प्रकाशित होऊ लागली; पण त्या आधीच ती लोकप्रिय होतीच. इंग्रजी कवयित्री जेन भंडारी सांगतात, ‘मी इंग्लंडमध्ये होते, तेव्हा ही पुस्तके तिथे लोकप्रिय होतीच; पण इथे आल्यावर पाहते, तो इथेही सर्व जण ते वाचत. घरमालकीण ही पुस्तके वाचत असे. या सा-या कादंब-यांचा फॉर्म्युला एकच- पुरुष आणि स्त्री भेटतात, प्रेमात पडतात, समज-गैरसमज होतात; पण शेवटी सारे काही गोड होते...’ अर्थातच, हे सारे लेखन गुदगुल्या करणारे असायचे. रोजच्या आयुष्यात घडणा-या कथा सांगणारे ते लेखन नव्हते. हे कथानक नेहमीच कुठल्या तरी एक्झॉटिक प्रदेशात घडत असे. आजच्या लेखनात कल्पनाशक्तीला वावच नसतो. सारे थेट सांगितलेले असते. हे लेखन तसे नव्हते. प्रेम, नाते, ओढ त्यात तरलपणे रंगवलेले असते.
‘मिल्स अँड बून’ची कुठलीही कादंबरी घेतली, तरीही या गोष्टीचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, 1982मध्ये प्रसिद्ध झालेली ‘अनब्रोकन मॅरेज’ ही कादंबरी घ्या... त्यातील हे वर्णन ‘आत खोलवर कुठेतरी तिला आयुष्याची उचंबळ जाणवली. विरघळून गेल्याची जी भावना तिला आता होत होती, तशी पूर्वी कधीच झाली नाही. तिने सुमनच्या शरीरावरून नजर हटवली आणि थोडे वर पाहिले, तर त्याच्या डोळ्यात तिला आपली प्रतिक्रिया वास्तव आहे, हा भास जाणवला. पोटाच्या तळापासून एक उबदारपणा तिच्या शरीरात पसरू लागला. तोही इतका की, सारे शरीर त्याने व्यापून टाकले. ती थरथरू लागली. तिने दाराचा आधार घ्यायला हात पुढे केला खरा; पण प्रत्यक्ष त्याच्या हातांनी सुमनच्या दंडाचाच आधार घेतला.’ या प्रकारची वर्णने ‘मिल्स अँड बून’मध्ये अनेकदा आढळली; पण पुढे पुढे या कादंब-या अधिक धीट होऊ लागल्या. वर्णने अधिक शारीरिकतेला महत्त्व देऊ लागली. पण आश्चर्य म्हणजे, आजही ‘सिक्स्टी शेड्स ऑफ ग्रे’सारख्या कादंब-या महिलावर्गात लोकप्रिय होत असतानाच, जुन्या धाटणीच्या ‘मिल्स अँड बून’लादेखील प्रचंड मागणी आहे. ई बुकमुळे खरं तर सर्वत्र कागदी पुस्तकांचा खप कमी होतो; पण इथे मात्र दोन्ही खप वाढताना दिसतात. याचे कारण असे, की ‘मिल्स अँड बून’चा टिपिकल वाचक हा एक कादंबरी संपवतो आणि दुसरी वाचायला घेतो. डाऊनलोडिंगमध्ये हे अधिक सोपे होते...
आपल्याकडच्या ना. सी. फडक्यांच्या पूर्वीच्या कादंब-या आणि नंतरच्या नैना आचार्य ते कुमुदिनी रांगणेकर यांच्या कादंब-या, या ‘मिल्स अँड बून’चे अनुकरण करत होत्या. रांगणेकरांनी तर स्वत: काही कादंब-या रूपांतरितही केल्या होत्या. ‘मिल्स अँड बून’च्या लेखिकांमधली राणी होती ती बार्बरा कार्टलँड. तिच्या कादंब-यांमध्ये उच्चभ्रू वर्गातील पुरुष आणि किंवा साध्या वर्गातील स्त्री यांच्या नात्यांचे चित्रण असे.
नंतर पुढे त्या धर्तीवरच्या प्रणयाची हिस्टॉरिकल रोमान्स अशी मालिकाच ‘मिल्स अँड बून’ने काढली. एका मालिकेचे नाव तर ‘डॉक्टर अँड नर्स रोमान्स’ असे होते. आश्चर्य म्हणजे, ‘मिल्स अँड बून’च्या पूर्वीच्या कादंब-यांमध्ये जसा आज चित्रपट मालिकांमध्ये असतो तसा अनेक उत्पादनांची जाहिरात; त्यात प्रामुख्याने हेअर रिमूव्हर, नेलपॉलिश आणि घरगुती उत्पादने यांचा भरणा असे. या उत्पादनांप्रमाणेच ‘मिल्स अँड बून’हेही एक लोकप्रिय उत्पादन होते. त्याची लोकप्रियता काळाच्या ओघात कमी झालेली नाही...
shashibooks@gmail.com