लोककथा, दंतकथा यांचे संस्कृती संवर्धनात मोलाचे स्थान असतेच; परंतु पुरातत्त्वशास्त्र आणि वस्तुनिष्ठ इतिहासातून गवसलेला भूतकाळ कैकपटीने रोमहर्षक असतो, याची जाणीव ‘प्राचीन कोल्हापूर’ हा संशोधनपर ग्रंथ वाचताना होते...हे पुस्तक इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.
कोल्हापूर म्हटले की, सर्वांना महालक्ष्मीचे मंदिर आठवते. पण या मंदिराच्या स्थापनेबद्दल जनमानसात अनेक गैरसमज असल्याचेही जाणवल्यावाचून राहात नाही. अशा वेळी मूळ मंदिर हे शिलाहार राजांनी बांधले, असे प्रचलित असले तरी हे मंदिर त्याहीपेक्षा पुष्कळ प्राचीन आहे. ही मौलिक माहिती तसेच कोल्हापूर व त्याच्या परिसरातून उपलब्ध झालेला समृद्ध व अतिप्राचीन पुरातत्त्वीय वारसा, याबद्दल अत्यंत महत्त्वाची तपशीलवार माहिती दिली आहे, ‘प्राचीन कोल्हापूर’ या छोटेखानी पुस्तकात. पुस्तकाचे लेखक आहेत, आदित्य फडके व दिवंगत पुरातत्त्वज्ञ डॉ. चेतन साळी.
कोल्हापुरास भेट देणाऱ्या पर्यटक-जिज्ञासूंसाठी एक बहुमोल मार्गदर्शिका, अशी या पुस्तकाची ओळख योग्य ठरावी. कोल्हापूरच्या ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वारशाची, या प्रकारची मुबलक माहिती या पुस्तकाद्वारे प्रथमच मराठी वाचकांसमोर येत आहे, हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य. कोल्हापूरच्या मध्ययुगीन इतिहासाबद्दल बरेच लिखाण यापूर्वी झालेले आहे, परंतु या शहराचा व परिसराचा इतिहास पार अश्मयुगापर्यंत मागे जातो, हे या पुस्तकात पुराव्यासकट सिद्ध करण्यात आलेले आहे. यात डॉ. साळी यांनी स्वतः केलेले अन्वेषण, उत्खनन व संशोधन, तसेच पूर्वी या ठिकाणी झालेल्या संशोधनांविषयीची विस्तृत माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे भौगोलिक स्थान व भूपृष्ठीय रचना, डोंगर रांगा, त्यातील मध्ययुगीन किल्ले, नद्या या सर्वांचा कोल्हापूरच्या इतिहासाशी काय संबंध आहे, हे लेखकद्वयीने या पुस्तकात अत्यंत रोचक पद्धतीने उलगडून दाखवले आहे.
ब्रह्मपुरी या कोल्हापूरच्या पश्चिमेस असलेल्या टेकडीवर १४० वर्षांपूर्वी झालेल्या उत्खननातून ‘एन बी पी’ ही इ. स. पूर्व सहाव्या शतकातील अत्युत्कृष्ट मातीची भांडी मिळाली असल्याचे लेखकांनी नमूद केले आहे. हा अतिमहत्त्वाचा पुरावा आहे, कारण या प्रकारच्या भांड्यांची सांगड भारतातच नव्हे तर भारताबाहेरदेखील बौद्धकालीन धम्मप्रसाराशी घालण्यात आलेली आहे, व त्याचा काळ सुनिश्चित आहे. तसेच, चक्रेश्वर येथे एक बृहदाश्म वर्तुळ सापडले असून त्यामुळे या परिसरातील मानवी वास्तव्याचा काळ इ. स. पूर्व १२-१३ शतके इतका जुना असल्याचे आढळून आले आहे.
लेखकांनी उत्खननात सापडलेले वेगवेगळ्या प्रकारचे मणी, नाणी, लज्जागौरीच्या मूर्ती, व शिलालेखांच्या माध्यमातून सातवाहनकालीन इतिहासाचे महत्त्वाचे दुवे जोडून दाखवले आहेत. या परिसरातील फारशी माहिती नसलेली हीनयान पंथाची सुरुवातीच्या काळातली साधीसुधी बौद्ध लेणी, तसेच हिंदू व जैन मंदिरांची तपशीलवार वर्णने या पुस्तकात आली आहेत.
शिलाहार वंशाचे आज सुमारे १९ शिलालेख व ताम्रपट उपलब्ध आहेत. ताम्रपटांच्या अभ्यासातून लेखकांनी तगर (तर) येथील समृद्ध राजवटीशी संबंध असलेल्या स्थानिक शिलाहार वंशाचाच नव्हे, तर दक्षिणेकडे गोवा व कर्नाटक व उत्तरेकडे गुजरातपर्यंतच्या त्यांच्या राज्यातल्या विविध घडामोडींचा साद्यंत इतिहासच साकारला आहे.
कोल्हापूरच्या शिलालेखांमध्ये सतत पण्णालक (पन्हाळा), क्षुल्लकपुर (कोल्हापूर) व वळीवाडे यांचा उल्लेख येतो, याकडे लक्ष वेधले आहे. फारशा माहीत नसलेल्या पोहाळा, पांडवदरा पळसांबे, माळवाडी, चक्रेश्वर इत्यादी स्थळांच्या पुरावशेषांची विस्तृत माहिती आहे. तसेच कोल्हापुरातील टाऊन हॉल या ब्रिटिशकालीन वस्तुसंग्रहालयातील वस्तूंचेही वर्णन आहे. यात Poseidon ही रोमन देवाची उत्कृष्ट मूर्ती, वेगवेगळी शस्त्रास्त्रे, दशावतारांच्या व महिषासुरमर्दिनीच्या सुंदर मूर्ती, बिदरी कलेचे नमुने, दरबारी पंखे व पंचांग, दागिने, खेळणी इत्यादींचा समावेश आहे.
पुस्तकात संग्राह्य नकाशे, रेखाचित्रे व रंगीत छायाचित्रे आहेत. थोडक्यात, कोल्हापूर व आजूबाजूच्या परिसराचे ऐतिहासिकदृष्ट्या एक परिपूर्ण अवलोकन, असे हे पुस्तक इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, ग्रंथपरिचय..