आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटेंची अभिनयसंपन्न दुनिया...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘एका चोराचा पाठलाग सुरू असतो आणि पाठलाग करणारी व्यक्ती असते एक तरुणी. चोर सायकलस्वार शक्य तितक्या जोरात सायकलवर पाय मारत असतो, मात्र त्याच्या तोडीस तोड सायकल हाकत ती तरुणी त्याला पकडण्याची शिकस्त करत असते. चोराचा पाठलाग ज्या वेगात चालला आहे, त्याच वेगाला अनुसरून असलेले पार्श्वसंगीत त्या पाठलागातील उत्कंठा क्षणाक्षणाला वाढवत जाते. धावणार्‍या कॅमेर्‍यासोबत धावणार्‍या सायकली यांच्यात प्रेक्षक रममाण होतात आणि एक क्षण असा येतो की, ती तरुणी चोराच्या सायकलीपर्यंत पोहोचते. वेगात असलेल्या सायकलीला सावरत त्याची कॉलर धरते आणि त्याच्या हिसड्यासरशी ती सायकलीसह एका बाजूला फेकली जाते.’ चित्रपटातील हा सीन इथेच स्तब्ध झाला. कारण चित्रीकरण करणारे सगळेच त्या तरुणीला सावरण्यासाठी धावले. पाठलाग करणार्‍या त्या तरुणीच्या चेहर्‍याला जबर इजा झाली होती आणि डोळ्यांच्या खालच्या भागाचे मांस चिरत रक्ताची एक चीर उठवत जखम दिसू लागली. सिनेमात काम करणार्‍या तरुणीच्या चेहर्‍याला इजा म्हणजे तिचे करिअर संपले, असा सार्वत्रिक समज; मात्र या तरुणीने त्यानंतर 57 वर्षे सिनेसृष्टीत नुसते कामच नाही केले तर आपल्या नावाचा ठसाही उमटवला. ही तरुणी म्हणजे ल इंडिया सायकलिंग चॅम्प शुभा खोटे!

व्हिलनचा राइट हँड, वाईट प्रवृत्ती, पण काहीसा बुद्धू असा गुंतागुंतीचा रोल करायचा तर माणूस पण तसा ताकदीचा कलावंत लागणार. व्हिलनच्या टोळीत सामील असलेल्या या कलाकाराला विनोदाची झालर असेल, त्यामुळे विनोदनिर्मितीला जागा निर्माण होईल. ‘अब तेरा क्या होगा कालिया?’ ‘सरदार मैंने आपका नमक खाया है’ हे दोन डायलॉग 38 वर्षांनंतरही विस्मरणात जात नाहीत, तसे ते डायलॉग म्हणणारा ‘कालिया’ अर्थात विजू खोटेही स्मृतिपटलावरून अदृश्य होत नाही. शुभा खोटे आणि विजू खोटे या दोन भावंडांनी रुपेरी पडद्यावर एक काळ अक्षरश: गाजवला. या दोन्ही कलाकारांना चित्रपट रसिकांनी मनापासून दाद दिली. सत्तरी गाठलेल्या या दोन्ही कलावंतांना वगळून चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला पूर्णत्व येत नाही. अभिनयासोबतच दिग्दर्शन, निर्मिती अशा पायर्‍यांवर काम करत आपल्यातल्या कलाकाराला खाद्या पुरवले. मात्र तरीही सध्याच्या सो कॉल्ड हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीने त्यांची म्हणावी तशी दखल घेतल्याचे दिसत नाही...‘कलेचे संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच झाले.

मला गाण्याची आवड होती आणि याला वाचनाची. पण लतादीदींचे गाणे ऐकल्यानंतर मात्र मी गाण्यात करिअर करण्याचा विचार सोडूनच दिला होता.’ शुभातार्इंनी गप्पांना सुरुवात केली. ‘मी तर फॅक्टरीत काम करत होतो, पण ते कठीण काम काही मला सहन झालं नाही. तिथून मी सारखा पळ काढायचो. शेवटी मनमोहन देसार्इंनी मला ब्रेक दिला आणि अभिनयाचं अधिकृत कार्ड मला मिळालं.’ ल इंडिया सायकलिंग चॅम्प, स्विमिंग चॅम्पियन म्हणून नावारूपाला आलेली एकेकाळची ‘टॉम बॉय’ शुभा खोटे आणि सायकॉलॉजीत इंटरेस्ट असलेल्या विजू खोटेंचे पाऊल शेवटी इंडस्ट्रीत पडले ते अभिनयात छाप उमटवण्यासाठीच!
तो काळ कॉमेडियन्सचा होता. चित्रपटाच्या गोष्टीत हीरो हीरोइन्ससोबत विनोदी भूमिका करणार्‍यांनाही समांतर महत्त्व होते. त्यामुळे केवळ प्रेक्षकांना हसवणे हा एकच उद्देश न ठेवता, तेव्हाच्या लेखक आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाला साजेशा विनोदी भूमिका सजवल्या आणि शुभा खोटे, मेहमूद, धुमाळ, विजू खोटे, टुनटुन अशा सशक्त कलाकारांनी त्या भूमिकेला योग्य तो न्यायही दिला.

वडील नंदू खोटे यांचा चित्रपट वारसा लाभलेले शुभा आणि विजू लहान वयात रुपेरी पडद्यावर चमकले आणि तेव्हापासून आजतागायत त्या पडद्याने त्यांची साथ सोडली नाही. 1955 मध्ये ‘सीमा’ चित्रपटातून ‘कॉमेडी प्लस सीरियस’ अशी मिश्र भूमिका शुभा खोटेंच्या वाट्याला आली आणि त्यानंतर विनोदी किनार असलेल्या अनेक उत्तमोत्तम भूमिका शुभातार्इंनी गाजवल्या. ‘छोटी बहन’ या चित्रपटाने तर शुभा खोटेंच्या विनोदी अभिनयाला अधिक उभारी मिळाली. ‘त्या वेळी स्त्री विनोदी भूमिका करू शकते, हेच मुळी हिंदी चित्रपटसृष्टीला नव्याने कळले, त्यामुळे चित्रपटात शुभा खोटे आणि मेहमूद ही जोडगोळी असली की सगळा चित्रपट ही विनोदी जोडी गिळंकृत करेल की काय, या भावनेने भलेभले स्टार्स घाबरायचे.’ बहिणीचे कौतुक करताना विजू खोटे सांगत होते. एकीकडे कॉमेडियन म्हणून करिअर बहरात असतानाच ‘एक दूजे के लिये’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांच्या अभिनयाला एक वेगळा आयाम मिळवून दिला. ती भूमिका पाहिल्यानंतर ‘ललिता पवार हिचा जहालपणा, शुभा खोटेंच्या अभिनयापुढे काहीच वाटत नाही,’ अशा शब्दांत त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. शुभा खोटे विनोदी आणि चरित्र अशा भूमिकांमध्ये रममाण झाल्या असताना, दुसरीकडे ‘कोणीही यावं आणि टपली मारून जावं’ अशा भूमिका मिळाल्याने हमखास विनोदनिर्मिती करू शकणारे विजू खोटे यांच्या खजिन्यात तर प्रत्येक पिढीसोबत काम केल्याचा साठा आहे.

1964ला आलेल्या ‘या मालक’पासून अगदी 2010 मधील ‘गोलमाल 3’ या चित्रपटामध्ये छोटेखानी भूमिकाही संस्मरणीय करू शकणारे विजू खोटे ‘शोले’ चित्रपटाद्वारे घरोघरी पोहोचले. ‘अंदाज अपना अपना’मधील ‘गलती से मिस्टेक हो गया’ हा रॉबर्टचा डायलॉग त्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर नेला होता.

‘चित्रपटाच्या नायकानेच कॉमेडी करायची, असा ट्रेंड आला आणि तिथून कॉमेडियन्सचा उतरता काळ सुरू झाला. अमिताभ बच्चन याने सर्वप्रथम ही प्रथा आणली असे म्हणतात. आता कोणालाही कॉमेडियन म्हणून घेतात आणि त्याला वाट्टेल ते करायला लावतात, म्हणजे तो नसला तरी चित्रपटाचे काहीच नुकसान होत नाही.’ दोन दशकांहून अधिक काळ विनोदी भूमिका करण्याचा अनुभव गाठीशी असणारे विजू खोटे सांगत होते. ‘व्हिलनचा लेफ्ट हँड’ असा लौकिक पसरेल, इतक्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही मुख्य व्हिलनचे काम मात्र विजू खोटेंच्या वाट्याला आले नाही. अनेक मराठी चित्रपटांमध्ये विजू खोटे यांनी काम केले, मात्र ते फारसे वाखाणले गेले नाही. शुभा खोटे यांना तर हिंदीत काम करतात म्हणून मराठीवाल्यांनी विचारलेच नाही. मात्र त्याचा राग न ठेवता शुभातार्इंनी ‘चिमुकला पाहुणा’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित करून मराठीचे पांग फेडले. मोठ्या पडद्यावर गाजणारी ही जोडी छोट्या पडद्यावरही तुफान लोकप्रिय ठरली.

‘जबान संभाल के’ या गाजलेल्या मालिकेत शुभा आणि विजू खोटे यांनी घातलेला धुमाकूळ आठवला तरी हसून हसून लोटपोट होणारे अनेक जण आहेत. सशक्त अभिनय आणि विविध भाषांची सरमिसळ करणारी सशक्त संहिता यामुळे ही मालिका टेलिव्हिजन विश्वात मैलाचा दगड ठरली. आगळेवेगळे अंगविक्षेप न करता विनोदाच्या रथावर आरूढ झालेल्या आणि चित्रपटसृष्टीत एक मानाचे स्थान मिळवलेल्या शुभा आणि विजू यांच्या अभिनयाच्या सावलीपर्यंतही आजचे कोणी कलाकार पोहोचू शकलेले नाहीत, याची खंतही वाटते. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र अशा चित्रपटातील मुख्य पात्रांनी विनोदनिर्मिती करण्याची सुरुवात झाली आणि कॉमेडियन्सच्या विश्वाला सुरुंग लागला. त्यानंतर जॉनी लिव्हर, राजपाल यादव यांसारखे कलाकार आले. मात्र जॉनी वॉकर, मेहमूद, असरानी, केस्टो मुखर्जी अशा कॉमेडियन्सबरोबरच सकस विनोदही आपण हरवून बसलो .

‘चित्रपटसृष्टीत 50 ते 57 वर्षांचे करिअर असताना, विविध भूमिकांचा गाजावाजा झाला असतानाही शुभा खोटे आणि विजू खोटे कोणत्याही पुरस्कार सोहळ्यांचा भाग झाले नाहीत, असे का?’ असे विचारल्यावर शुभा खोटे यांनी सांगितलेली आठवण फारच बोलकी आहे. ‘1962 मध्ये ‘घराना’ आणि ‘ससुराल’ या दोन चित्रपटांचे नामांकन मला होते आणि स्पर्धक निरुपा रॉय होती. पुरस्काराच्या दोन दिवस आधी हा पुरस्कार मिळवण्यासाठी पंचवीस हजारांची मागणी करणारा फोन मला आला आणि मी नाकारल्यामुळे तो पुरस्कार निरुपा रॉय यांना दिला गेला.’ साठाव्या दशकातही पुरस्कार सोहळ्याचे ‘मोठं घर पोकळ वासा’ हे स्वरूप पाहिले तरी आज डझनावारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यांचे गणित पटकन समजून येते.

‘प्रत्येक पिढीतले लोक आम्हाला ओळखतात आणि हेच आमचे पुरस्कार,’ असे सांगताना खोटे बंधू-भगिनीच्या चेहर्‍यावर समाधान झळकत होते. आज वयाच्या 77व्या वर्षीही शुभा खोटे इंग्रजी थिएटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘बॅचलर्स वाइफ’, ‘लेट्स डू इट’ ही इंग्रजी नाटके तसेच ‘हेराफेरी’, ‘मेरा नाम जोकर’, अशी हिंदी नाटके लिहिली आणि दिग्दर्शितही केली आहेत. विजू खोटे हेसुद्धा नाटकांबरोबरच मराठी सिनेमांमध्येही सक्रिय आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमसूत्र’ चित्रपटात शुभा खोटे त्यांच्या सहजसुंदर अभिनयासोबत छोटेखानी भूमिकेत लक्षात राहतात आणि प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या ‘फेकमफाक’ या सिनेमात भरत जाधवबरोबर विजू खोटे यांनी अत्यंत संवेदनशील भूमिका केली आहे. शुभा आणि विजू ही भावंडे कलाक्षेत्रात रमली असतानाच, त्यांची पुढची पिढीदेखील मनोरंजन क्षेत्रातच कार्यरत आहे. नंदू खोटेंपासून सुरू झालेला प्रवास दुर्गा खोटे, शुभा खोटे, विजू खोटे यांनी पुढच्या पायरीवर नेला आणि प्रत्येक पिढी आपल्या अभिनयकौशल्याने खोटेंचे खरे सोने ठरली...