आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shubha Prabhu Satam Rasik Article About Women\'s Care

सेकंड स्किन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंतर्वस्त्र, त्यातही स्त्रियांची अंतर्वस्त्र हा खासगीहूनही खासगीतला मामला असतो. त्याची जाहीर वाच्यता करणे सभ्यपणाचे लक्षण मानले जात नाही. मात्र अंतर्वस्त्राच्या वापरामुळे गेल्या शतकभरात ग्रामीण असो वा शहरी; असंख्य बाया-बापड्यांच्या जीवनशैलीत आत्मविश्वास आला आहे, प्रसंगी सुरक्षिततेची, बंधनमुक्तीची भावनादेखील रुजली आहे. संस्कृती-परंपरांचे संदर्भ बदलून टाकणाऱ्या महिलांच्या खासगी विश्वातल्या या क्रांतिकारी बदलाची प्रक्रिया उलगडून सांगणारा हा लेख...

मागच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये ‘नो ब्रा डे’ साजरा झाला. म्हणजे जसा रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे तसा हा दिवस. आपल्याकडे कितपत माहीत नाही, पण मुक्तपणे हात उंचावून हसणाऱ्या स्त्रीचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर चर्चा झाल्या, विनोद झाले. अर्थात, हे सगळं नंतर वाचताना जाणवलं की, आपण बरेच ‘मोकळे’ झालोय. आपण, म्हणजे मी ढोबळ मानाने आजूबाजूचा समाज म्हणतेय, चक्क नो ब्रा डे... ग्रेट!

ज्या कपड्याचा उल्लेखही, काही वर्षांपूर्वी कुजबुजत व्हायचा... खरेदी केली जायची, तीही काही आक्षेपार्ह बेकायदा वस्तू घेतल्यागत. त्या अंतर्वस्त्राने एवढी प्रगती केली की, ते घालणार नाही... हे सांगणंसुद्धा जाहीरपणे साजरं होतंय. आपण बरेच मोकळेढाकळे झालोय, हेच खरं. सत्तरच्या सुमारास फेमिनिस्टवाद्यांनी जाहीरपणे ब्रेसियर्स जाळल्या होत्या. तसं पाहता बाई आणि स्तन ही अतूट जोडीच आहे. पण स्तन्य देण्यासाठी असणाऱ्या या अवयवाचा कामचेतनेशी कधी संबंध जोडला गेला, हे पाहण्यासाठी मात्र हजारो वर्षे मागे जावं लागतं. ते असो. पण हे स्तन, उरोज, जे काही आहे ते, ते झाकून ठेवण्यासाठी वा उठावदार दिसण्यासाठी आज नाही, तर अगदी प्राचीन काळापासून वस्त्र बनत आलेली आहेत. अगदी एक उत्तरीय आणि एक अधरीय वापरण्याच्या वेळेपासून आपल्याकडे कंचुकी, चोळी असायची. युरोपात पाश्चात्त्य देशात कॉॅर्सेट नामक वस्त्र. तिथपासून आजच्या या ब्रेसियरचा प्रदीर्घ असा प्रवास झाला आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हरमिनी कॉडेल (Hermine Codulle कॉडेल लाँगिरी हाऊसची प्रर्वतक) नामक महिलेने टू पिस अंडरगारमेंट म्हणता येईल असा le bien-etre (The Well Being असा अर्थ असलेला) प्रकार शोधला. कॉर्सेटच्या जाचक जोखडातून स्तनांना मुक्त केले. पुढच्या पिढ्यांना मोकळा श्वास घ्यायला दिला. तरीही आपल्याकडे हे लोण हल्लीच आलं. ब्रेसियर किंवा बोलीभाषेत बॉडिज/ ब्वाडी या अगदी प्राथमिक अवस्थेत होत्या. अगदी बेसिक. चालताना स्तन हिंदकळू नयेत म्हणून, पकडून ठेवणारे वस्त्र. विषय संपला. चॉइस-बिइस नाही.

एकदा खरेदी केली की, मध्यमवर्गीय वृत्तीनुसार त्याचा झोळणा होईतोवर वापरायची. ग्रामीण भागात तर ब्रेसियर ही संकल्पनाच नव्हती. अर्ध्या कापलेल्या बनियनसारखं काहीतरी असायचं, ते वापरलं जायचं.

या ब्रेसियरमध्येही प्रकार असतात आणि आकारही असतात, हे साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वी उमगू लागलं. आणि या वस्त्राच्या दुनियेत आमूलाग्र क्रांती झाली. दुकानाच्या एखाद्या कोपऱ्यात अंधाऱ्या काउंटरवर विकली जाणारी ही ब्रेसियर आता अगदी उघडपणे मिळू लागली आहे. पोशाखाला उठाव येण्यासाठी आधी ब्रेसियर असायची, ती आता प्रचंड महाग आणि ब्रँडेडही झाली आहे. यातली फॅशन कुणाला पटो ना पटो, पण या वस्त्राला असणारं एक उगाचच गूढ आणि खासगी रूप जाऊन एक मोकळेपणा आला आहे, हे मान्य करावं लागेल.

किशोरवयात पदार्पण करताना आमच्या पिढीला कॅनव्हासच्या ब्रेजर(हा शब्द त्या दुकानदाराचा)मध्ये बंदिस्त व्हावं लागलेलं आणि काही वर्षांनी त्याची सवयही झालेली. स्वतंत्र झाल्यावर मग जरा त्यातल्या त्यात बऱ्या घेतल्या गेल्या. आता मात्र मुलींना ट्रेनर्स... म्हणजे ब्राच्या शिशू अवस्थेपासून सुरुवात होते ती पार लाँजिरीपर्यंत.

म्हणजेच, अत्यावश्यक वस्त्र ते लक्झरी आयटेम हा प्रवास आहे. आधीचं त्याचं रुक्ष रूप जाऊन खूप छान ग्लॅमर त्याला आलंय. अर्थात त्यातही प्रतवारी आहेच, पण पुन्हा व्यक्तीगणिक आवडी. मुख्य म्हणजे, कम्फर्ट विथ एस्थेस्टिक सेन्स, म्हणजे आरामदायी सौंदर्य हा या ब्रेसियर्सचा सध्याचा युएसपी आहे. फक्त ब्रा विकणारी दुकाने जागोजागी आहेत.

ऑनलाइन तर विचारू नका. ट्रेनर्स, स्पोर्ट‌्स, साडी, सलवार, टी शर्ट, ऑफशोल्डर, अंडर वायर, पुश-अप्स... मिनीमायझर... अनेक प्रकार आलेले आहेत. ज्यांचा उद्देशच हा आहे, की ब्रेसियर घालणारीला ती घातली आहे, हे जाणवू नये... इट शूड फिट लाइक सेकंड स्किन. शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातली सुस्थितीत असणारी बाई थोडी जागरूक झाली आहे.

आणि आता यातही फेमिनिस्ट प्रकार आलाय. बाई ब्रेसियर वापरते, ती आम्हाला चाळवण्यासाठी, किंबहुना बाई आणि तिची वस्त्र-अंतर्वस्त्र ही फक्त पुरुषाच्या कामचेतना उद्दिपीत करण्यासाठीच आहेत, असं मानणारे अनेक जण आहेत. (जे ब्रेसियर्सच्या दुकानाबाहेरघोटाळताना आढळतील) म्हणजे, बाई जर छान महाग दिमाखदार ब्रेसियर घेत असेल, तर ती फक्त आम्हाला रिझवायला किंवा चेतवायला, ही परंपरागत पुरुषी मानसिकता आजही आढळते. किंबहुना, याच मानसिकतेमुळे ब्रिसियर्स अगदी साध्या ठेवल्या जायच्या.
बेसिकली, ही मानसिकता बदलली नाही, प्रमाण कमी झाले असेलही कदाचित; पण आजची बाई ब्रेसियरकडे एक फॅशन स्टेटमेंट म्हणून पाहतेय, हे महत्त्वाचं. माझ्या शरीराचा हा अवयव मला हवा तसा मी झाकणार किंवा त्याचा उठाव करणार... माय बॉडी माय चॉइस, ही विचारसरणी इथे महत्त्वाची ठरली आहे.

बलात्कारासाठी बाईला आणि तिच्या पोशाखाला जबाबदार धरणाऱ्यांना हे पटणार नाही. कारण, जर पोशाखामुळे बलात्कार होत असेल तर सहा महिन्यांच्या मुलीपासून ते बुरख्यात अवगुंठीत असलेल्या बाईपर्यंतच्या बळी ठरल्या नसत्या.

असो. बाईलाच जबाबदार धरणाऱ्यांना न जुमानता हे वस्त्र, ही कंचुकी, ही ब्रेसियर आज वस्त्रप्रावरणांच्या जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून आहे. बाईच्या या अवयवाला दिमाखदार उठाव देत जपणाऱ्या त्या वस्त्राला...
थ्री चिअर्स!
(shubhaprabhusatam@gmail.com)
पुढील स्लाइडमध्ये,
>> स्तन ‘झाकण्या’चा हक्क,
>> ग्रीक-रोमन काळ,
>> धातूची कंचुकी-१५ ते १८ वे शतक,
>> जग अंतर्वस्त्रांचे

(चौकटीतल्या मजकुराचे भाषांतर- प्रेरणा मयेकर)