आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shubhangi Joshi Article About Women In Their 40s

चिंतन चाळिशीतले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या चाळिशीच्या दशकातील काही वर्षे सरत असताना मनात संमिश्र भावना आहेत. रिले रेसमध्ये बॅटन पास करण्याचा क्षण जवळ आल्यानंतर खेळाडूच्या मनात जसे विचार येतात तशी काहीशी अवस्था आहे. चाळिशी ओलांडल्यानंतर जे शारीरिक व मानसिक बदल होऊ लागतात, त्यांची चाहूल लागते आहे. डोळ्यांवर चाळिशी आली आहे. रजोनिवृत्तीच्या काही खुणाही दिसू लागल्यात. उगीचच कधी कधी औदासीन्य येते, काही न करता नुसते बसून राहावे, असे वाटू लागते. अर्थात ही क्षणिक भावावस्था असते. कामाचा रेटा, सहचराची समजूतदार साथ यामुळे हे वैराग्य फारसे टिकत नाही.
चाळिशी ते पन्नाशी ही स्त्रीच्या आयुष्यातली मोठी गंमतशीर स्थिती असते. सांसारिक जबाबदा-या हळूहळू कमी होताहेत, असे वाटू लागते. मुले आपापल्या पायांवर उभी राहण्याच्या प्रयत्नात असतात. थोडंफार स्थैर्य आलंय अशी भावना निर्माण होत असते. घरापलीकडेही एक जग आहे, या जगातही बरीवाईट माणसे आहेत. या माणसांचेही आपण काही देणे लागतो याची मला हल्ली जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्यासाठी काही तरी करण्याचे प्रयत्न यथाशक्ती करू लागले आहे. भोवताली असलेले दारिद्र्य, असहिष्णुता, हल्ली जाणवू व खुपू लागली आहे. त्याच्यावर विचार करण्याची मनाला सवय लागते आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या गृहप्रवेशाने जगाचे संदर्भ बदलत आहेत. मलाला कोण, तिचा नि आपला काय संबंध असे आता वाटत नाही. प्रयत्नपूर्वक टच स्क्रीन फोन, संगणक, आयपॅड यांचा वापर शिकते आहे. जुने मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा नव्याने भेटू लागले आहेत. शाळा-कॉलेजमधल्या इयत्तांच्या पुनर्भेटी व त्यात होणारे स्मरणरंजन व स्वप्नरंजन हवेहवेसे वाटू लागले आहे.


व्यक्तिगत पातळीवर बोलायचे झाले तर वैवाहिक सहजीवनाचा आता पक्का ‘मुरंबा’ झालेला आहे. ‘शब्देविण संवादु, दूजेविण अनुवादु’ ही निव्वळ कविकल्पना नसून व्यावहारिक पातळीवर ही गोष्ट शक्य आहे हे आता जाणवते. पूर्वी फक्त त्याचे दोष दिसायचे आता आपलंही काही चुकतंय का ते मनाशी ताडून पाहिलं जातं आणि त्यामुळे भांडणे अजिबातच लांबत नाहीत. भारतीय कुटुंबव्यवस्था हे एक अजब रसायन आहे. विविध नातेसंबंधांतले कंगोरे न्याहाळणे हा मला लागलेला एक नवीन छंद आहे. माणसात देवत्वाचा अंश असू देत, पण बहुतांशी माणूस हा माणसासारखाच वागणार हे लक्षात ठेवले की ही नातेसंबंधांची सापशिडी फारशी जाचत नाही.
एकंदरीत 40 ते 50 चा हा पट म्हणजे कॅलिडोस्कोप आहे. एखाद्या नक्षीचा कंटाळा आला की आपला दृष्टिकोन थोडासा हलवायचा व तयार झालेला नवीन नक्षीचा आनंद घ्यायचा!


shubhangi.antarnaad@gmail.com