केशर, गेली तीनचार वर्षे नियमाने येणारी माझी पेशंट. पूर्वी ती साध्याशा पंजाबी ड्रेसमध्ये किंवा परकर पोलक्यामध्ये येत असे. आता ती साडी, ब्लाउज, मंगळसूत्र आणि बांगड्या अशी येते. म्हणजे तिचे लग्न झाले आहे म्हणून. लग्नापूर्वी ती आली की रडून जायची आणि आताही ती रडून जाते. फक्त कपड्यांमध्ये फरक पडला आहे, परिस्थितीमध्ये नाही.
जवळच्या एका खेड्यामध्ये राहणारी केशर रंगाने काळी, दिसायला एकदम साधारण. तिची कहाणी मनाला चटका लावून जाणारी. दोन भावांमध्ये एकटी म्हणून आईवडिलांची लाडकी असलेली केशर १९९१ च्या भूकंपानंतर पोरकी झाली. तिचं लहानपणच संपलं. दोन भाऊ आणि ती काकाकाकूंच्या आश्रयाला आले. त्यांना निवारा मिळाला पण आईवडिलांचे प्रेम आणि आधार दोन्हीलाही तिन्ही भावंडे पारखी झाली. काका-काकूंनाही शेतात राबायला दोन तरुण माणसं आणि घरात हरकामाला केशर अनायसेच मिळाली. मुले आहेत त्या परिस्थितीत सामावली, पण केशरचं काय? विशिष्ट तणावग्रस्त परिस्थितीमुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. पाळी उशिरा सुरू झाली, त्यात ती अनियमित येत असे. तिच्याविषयी सहानुभूती बाळगणा-या तिच्या दोन चुलत भावजया अधूनमधून तिला माझ्याकडे घेऊन येत असत. कधी औषधं घेतली तर घेतली, नाही तर नाही. उपचारामध्ये नियमितपणा नाही म्हणून मी तिला एकदा रागावले. तेव्हा रडतरडत तिने सगळी परिस्थिती सांगितली. मी जमेल तसा तिच्यावर इलाज केला. पाळी नियमित झाली. दिसायला अगदी ‘डावी’ असल्यामुळे तिला उजवणे अवघड होते.
एक तर प्रेमाची माणसे म्हणजे तिचे दोन भाऊ तिच्यापेक्षा थोडे वयाने मोठे, ज्यांच्या हातात काहीच अधिकार नाहीत. अशा परिस्थितीत मिळेल तो मुलगा पाहून तिला कसं तरी उजवलं आणि काका-काकूच्या दृष्टीने तिचा विषय संपला; पण केशर आता आगीतून फुफाट्यात पडली आहे. सासरी भयंकर जाच. नवरा दारू पिऊन रोज मारहाण करतो.
एकदा पाळी दोनतीन महिन्यांनी उशिरा आली तेव्हा ‘तूच अॅबॉर्शन करून घेतलं’ म्हणून सासूने तिला खूप त्रास दिला. परवाच ती तिच्या मोठ्या भावाच्या बायकोसोबत आली होती. तोच केविलवाणा चेहरा. भावाची बायको नवी नवरीच. नणंद म्हणजे मागे लागलेली एक कटकट, असा तिचा आविर्भाव होता. भावजयीची तपासणी झाल्यावर ती बाहेर गेली. तेव्हा केशरने सासरची कहाणी सांगितली. आता जगावेसे वाटत नाही, म्हणून खूप रडली. यावर मरण हा उपाय नाही, हे तिला समजावून सांगितले. पण माझे समजावणे तिच्या दु:खापुढे किती तकलादू आहे याची मला आणि तिलाही जाणीव आहे. म्हणूनच केशरच्या येण्याची मी नेहमीच वाट पाहत असते. आयुष्यभर माझ्याकडून मोफत औषोधोपचार घेतला तरी चालेल, पण तिने
आपला जीव एवढा स्वस्त करू नये असं वाटतं.