आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आणि मी पास झाले'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी एक साधारण कुटुंबात जन्मलेली श्वेता. माझी आई अभ्यासाच्या बाबतीत एकदम कडक. पण माझं काही जास्त मन नाही लागायचं अभ्यासात. तशी ठीकठाकच होते मी. बारावीनंतर आई-वडिलांनी पुण्याला शिकायला ठेवलं. त्यांचंसुद्धा स्वप्न, मुलगी शिकून काहीतरी बनेल, आपलं नाव कमवेल. पण तसं काही झालं नाही. या एवढ्या स्पर्धेच्या जगात मी त्यांचे स्वप्न पूर्ण नाही करू शकले, कारण मी खूप हुशार नव्हते आणि वयाच्या १९व्या वर्षी माझे लग्न होऊन मी सासरी गेले. मी तेव्हा TYBComलाच होते. एक खूप चांगलं स्थळ आलं. मुलगा स्मार्ट, सासू-सासरे, घर परिवार सगळंच एकदम चांगलं. झालं लग्न.

परंतु एवढ्या मोठ्या संयुक्त कुटुंबात मला सगळ्यांनी पुढे शिकायचा आग्रह केला आणि मी शेवटच्या वर्षाची परीक्षा देण्याचे ठरवले. सुरू झाला अभ्यास. कॉलेज पुण्याला. अभ्यास जालन्याला. पण माझ्याकडून होईल तसा अभ्यास केला आणि परीक्षा दिली. पेपर चांगले गेले असे मला वाटले, पण तसे काही झाले नाही. रिझल्ट आला आणि मी १५ पैकी ११च विषयात पास झाले. बापरे, ४ विषय लटकले. ‘कोई बात नही श्वेता, अगली बार दे देना,’ माझ्या सासूने आणि सर्वांनी दिलेला दिलासा माझ्या मनाला हलके करून गेला. मी पुन्हा परीक्षा दिली आणि मी एकाच विषयात पास झाले. माझा आत्मविश्वास संपला. आता मी ग्रॅज्युएट नाही होणार, असं वाटायला लागलं. चार वर्षे निघून गेली. मला दोन मुली झाल्या. पण खूपदा मी निराश व्हायचे. आता मला शिकावंसं वाटत होतं. लग्नानंतर पाच वर्षांनीसुद्धा माझी अडकलेली बीकॉम डिग्री मला हवी होती.

माझ्या नवऱ्याने मला काहीही करण्यास कधीच नकार नाही दिला. त्यांचा होकार आणि संपूर्ण परिवाराच्या साथीमुळेच मी पाच वर्षांनंतर पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला. खूप अडथळे आले. मी तर विसरलेसुद्धा होते की, मी कोणत्या विषयात नापास झाले. पण केले मी प्रयत्न. हॉल तिकीट आले आणि मी परीक्षा दिली. बापरे, आता रिझल्ट येणार आणि आपले काय होणार? आणि आला तो दिवस. मी चक्क पास झाले होते. विश्वासच होत नव्हता. लग्नानंतर सहा वर्षांनी मी ग्रॅज्युएट झाले.

मी पुढे शिकणार आहे, वकील होणार आहे, पुण्यातल्या एका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाही आहे. काही तरी खूप मोठं करायचा विचार आहे. सहा वर्षांनंतर दिलेली परीक्षासुद्धा मला खूप काही शिकवून गेली. जर आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. हवी इच्छा आणि लढण्याची तयारी. येईन लवकरच तुम्हाला भेटायला वकील झाल्यावर. स्वप्नं तर खूप मोठी बघितली आहेत, ती पूर्ण होतील याची खात्री पण आहे. परंतु त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची खूप गरज आहे.

sasethiya@gmail.com