आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या दिवशीची घटना, रेल्वे फलाटावरची! एका पुरुषाने आपल्या मोबाइलने एका महिलेचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या महिलेने थडाथड त्याच्या कानाखाली लगावल्या. नंतर मी त्या संदर्भातला व्हिडिओही पहिला. तो पुरुष ब-यापैकी वृद्ध होता, बारीक, चेह-याने बिचारा वाटणारा. हातात जो फोन होता त्यातही दोन मेगापिक्सेलपेक्षा जास्त क्षमतेचा कॅमेरा नसावा. असो. मुद्दा असा की त्या व्यक्तीवर आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्याला त्या महिलेने मारलं. आणि ते पाहून पहिल्यांदा मनात द्विधा अवस्था निर्माण झाली. हे चूक की बरोबर? दोन टोकांपैकी एकही टोक मनाची सांत्वना करणार नव्हतं.
त्या महिलेची चूक आहे का? नाही! सध्या जे काही होतंय त्याने मनाची ही अवस्था होण साहजिक वाटतं. सतत होणारे बलात्कार, भ्रूणहत्या, कधी प्रसिद्ध माणसांनीच दुय्यम बुद्धिमत्तेने केलेली विधान, त्यात स्त्रियांच्याच चुका काढणा-या बायका - ‘तूच व्यवस्थित वागायचं होतंस ना,’ किंवा ‘तू गेलीसच कशाला तिथे,’ नाही तर अगदीच ‘वेळेत लग्न झालं नाही तर लोक नको त्या शंका घेतात,’ - असं म्हणणा-या मावशा, आत्या आणि आया हे सगळं बळजबरीचं ‘कर्ज’ घेऊन स्त्रिया समाजात वावरतात, त्यात नोकरी करतात, संसार सांभाळतात. आणि या कर्जाचं भांडवल करणारे भांडवलदार हर नुक्कडवर भेटतात. स्त्रियांमध्ये जर नकळतपणे ही भीती मुरली गेलीये की - प्रत्येक पुरुषापासून सावध राहिलं पाहिजे - तर वर मांडलेली परिस्थिती याला कारणीभूत आहे. त्या महिलेचं वागणं कदाचित याच निर्माण झालेल्या भीतीची परिणती असावी. आणि त्या म्हाता-याला मारल्याने तिला वाटलंही असेल की तिने स्वतःचं रक्षण केलंय.

ही झाली सर्वसाधारण काॅन्शसमधून आलेली भीती, पण या व्हिडिओनंतर ब-याच गोष्टी आठवल्या आणि त्यातच सबकॉन्शसमधून जी भीती उफाळून आली ती भयानक होती.
माझे आजोबा, लोकांच्या उपयोगी पडून ब-यापैकी थकलेले, बारीक, तरतरीत, सतत कसला ना कसला तरी विचार करत असतात. त्यात ब्लड प्रेशर आणि छातीचं दुखणं. ते स्वतःच्या सुनेलाही ‘तुम्ही’ म्हणतात. गरीब माणसाला छळणा-या लोकांचा त्यांना भयानक राग येतो, त्यासाठी सिनियर अथॉरिटीशी पंगे घ्यायलाही मागे-पुढे पाहिलं नाही. स्वतःच्या विचारात सतत मश्गुल असतात. तसे चौकस असतात; पण समजा कधी चुकून चालता चालता काही त्रासामुळे तोल वगैरे जाऊन एखाद्या स्त्रीला त्यांचा धक्का लागला आणि तिला वाटलं की हा माणूस हे जाणूनबुजून करतोय. आणि तिने त्यांना असंच काहीसं वागवलं तर? त्या फलाटावरच्या बाईसारखं तिने त्यांना मारमार मारलं तर? माझ्या आजोबांना कळणारही नाही की त्यांनी काय चूक केलीये ते. जमलेली माणसं, पोलिस, ती लाजिरवाणी वागणूक... ते कोसळून जातील, तिथल्या तिथे!

या विचारानेच थंड शहारा आला! कालपर्यंत, बॉम्बस्फोट, दंगल किंवा नैसर्गिक आपत्ती या खरंच भयावह गोष्टींनी थरकाप उडायचा; पण एक गैरसमज इतका भयंकर परिणाम देऊ शकतो हे त्या क्षणी अनुभवलं. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल कधीच काही वाईट विचारही करू शकत नाही. पण या भयंकर वास्तवाने मला हा विचार करण्यास भाग पाडलं. माणूस म्हणून आपण आपल्याला कुठे नेऊन ठेवलंय?

व्यक्तिस्वातंत्र्य या थोतांड सत्यावर किती उड्या मारत असतो आपण! कोणता व्हिडिअो काय बॅन केला किंवा #mychoice म्हणून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार काय केला किंवा तत्सम दहा व्हिडिओ काय बनवले, आपला प्रश्न केवळ स्त्री-पुरुष समानता नाहीये. ते फक्त आवरण आहे. आत गेलो तर कळेल की आपण ऑल्मोस्ट स्किझोफ्रेनिक झालोत. सतत कोणती ना कोणती भीती आपल्या डोक्यात आहे. आणि ही भीती इतकी मोठी आहे की जगातली प्रत्येक गोष्ट आपण चूक किंवा बरोबर या सोप्या परिमाणात मोजतो. आणि वर आपण आपल्या भीतीचा बाजारही करतोच- उदाहरणार्थ ‘आता ती फलाटावरची बाई (किंवा आपण सर्वच स्त्रिया) कदाचित मैत्रिणींना रंगवून सांगेल, ‘कसलं मारलं त्या म्हाता-याला, साला हाडं मसणात गेली तरी चरबी उतरली नाही!’ आपल्यासारखी दहा माणसं तर शोधलीत आपण, मात्र त्या दहा जणांनी एकही उपाय शोधलेला नाही. मिळून विचार करण्यापेक्षा संताप करणं, असंतोष व्यक्त करणं, विरोध करणं यावरच समाधान मानतो आपण!

असो. त्या महिलेची चूक नसेल आणि माझ्या आजोबांचीही चूक नसेल. पण फक्त आपण निर्माण केलेली ही परिस्थिती एकाचं तरी भयंकर नुकसान करेल. आजोबांना मी हे सांगितलं तेव्हा आजोबांना अशा खूप बायका असणा-या जागा आठवल्या आणि आता त्यांनी नेहमीचं चाळीस मिनिटं पार्कात चालायचं सोडून दिलं.
त्या बाईने एक भीती दाखवली, मी ती भीती जपली, तिचा विस्तार केला आणि आजोबांना घाबरवलं. भीती पुन्हा जिंकली. चोराच्या कर्मामुळे संन्यासीचं जास्त घाबरून जगतो आणि मग त्यात सुख देतात त्या बिनबुडाच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या उड्या!
shwetambara89@gmail.com