आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमा वर्तमानपत्रासारखा नव्हे, कादंबरीसारखा असावा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमा हा वर्तमानपत्रासारखा नसून कादंबरीसारखा असावा; जिच्या प्रत्येक पानामागे उत्सुकता असावी. कारण त्या माध्यमातून लेखक हा वाचकाशी बोलत असतो. त्याचप्रमाणे दिग्दर्शक हा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी बोलला पाहिजे. सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. आजचा प्रेक्षक प्रगल्भ आहे. उत्तम कलाकृतीला तो उत्स्फूर्त दाद देतो. त्यामुळे दिग्दर्शकांनी आपल्या हातात असलेल्या प्रभावी माध्यमाचा गांभीर्याने विचार करायला हवा. मनोरंजनाबरोबर आपण विशिष्ट विचारही समाजासमोर ठेवत आहोत, याची जाणीव दिग्दर्शकाला हवी. समाजात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी सिनेमा हे एक प्रभावी माध्यम आहे, असे मला वाटते. तसा त्याचा उपयोगही व्हायला हवा. नव्या पिढीतील काही दिग्दर्शक तसा प्रयत्न करत आहेत. डेढ इश्किया, बर्फी यांसारखे सिनेमे हे त्याचेच उदाहरण आहे.

या सिनेमांना प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाददेखील प्रेक्षकांना असे चित्रपट आवडतात, हे सिद्ध करतो. पानसिंग तोमर आणि विशाल भारद्वाजचा ‘ओंकारा’ हे सिनेमेदेखील वेगळ्या धाटणीचे आहेत, असे मला वाटते. देशात दरवर्षी 800 ते 900 चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र, प्रत्येक चित्रपटात मोठी स्टारकास्ट असतेच असे नाही. खर्चिक कलाकृतींकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोठी स्टारकास्ट हवी असते. ते मॅग्नेटचे काम करतात. त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. मात्र, हा ट्रेंड बदलतो आहे. स्टारकास्ट नसलेले सिनेमेदेखील आता प्रेक्षक पाहायला लागले आहेत. दमदार संहिता आणि योग्य दिग्दर्शन असल्यास उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. भरमसाट पैसे खर्च करून जास्त पैसे मिळवण्यापेक्षा उत्तम कलाकृती कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर ठेवता येईल, याचा विचार होणे म्हणूनच आवश्यक ठरत आहे.
शब्दांकन : मंदार जोशी


‘संविधान’ निर्मितीचा पट
श्याम बेनेगल यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारित ‘भारत एक खोज’ ही 53 भागांची मालिका दूरदर्शनच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती. आता संविधान निर्मितीचा इतिहास उलगडणारी ‘संविधान’ ही दहा भागांची मालिका श्याम बेनेगल दिग्दर्शित करत आहेत. 1947 ते 1949 या कालखंडात घडलेल्या घटना या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आठ- नऊ महिने अगोदर या कथेला सुरुवात होते. या काळातच भारत आणि पाकिस्तानची फाळणी होते. या सगळ्या अस्थिर परिस्थितीतदेखील पारदर्शी आणि सर्वधर्मसमभाव असलेली घटना या देशाला देण्यासाठी अनेक विचारवंतांनी काम केले आहे. त्याची कथा म्हणजे संविधान! 146 पात्रे असलेल्या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, मोहंमद अली जिना यांचा समावेश असणार आहे.

विशेष म्हणजे, यात सचिन खेडेकर यांनी आंबेडकरांची, दलीप ताहील यांनी जवाहरलाल नेहरू, तर स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या तसेच संविधान निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पूर्णिमा बॅनर्जींची भूमिका दिव्या दत्ता यांनी केली आहे. स्वरा भास्करचीदेखील प्रमुख भूमिका आहे. ‘संविधान’ दहा भागांत दूरदर्शनच्या ‘राज्यसभा’ वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. ज्याच्या आधारावर भारताची लोकशाही टिकून आहे, प्रत्येक नागरिक बंधमुक्त जीवन जगतो आहे, त्या संविधानाची कथा तरुण पिढीसमोर येणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने सदर मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.