आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध घ्यावा अज्ञाताचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नद्या स्वच्छ करणे, शहरे-गावे स्वच्छ करणे, भ्रष्टाचार संपवणे, रहदारी सुरळीत करणे, असे भौतिक प्रश्न सोडवण्याची धार्मिक पद्धत साधत नाहीय की बिनधार्मिक पद्धतही सापडत नाहीय, अशी भारतीय समाजाची करुण स्थिती होत आहे. मग प्रतीकात्मक किंवा प्रबोधनात्मक मार्ग हाताळले जात आहेत. पद्धत शोधणे, हे घडत नाहीय. शोध घेणे, हे वळण भारतीय सभ्यतेत रुजलेले नाही. भारतीय सभ्यतेत पुनर्शोध घेणे, रिसर्च हे कित्येक वर्षांपासून चालू आहे. जगात जे ज्ञात आहे, ते पुनर्शोधत चालत राहायचे, असे चाललेले आहे. तंत्रज्ञानापासून ते तत्त्वज्ञानापर्यंत ते साहित्यापर्यंत. शोध घेणे, म्हणजे कशाचा शोध घ्यायचा? उत्तर सोपे आहे. अज्ञाताचा. आणि अज्ञात म्हणजे एखाद्या व्यक्तीचे अज्ञात नव्हे, मानवजातीचे अज्ञात. माणूस जातीला अजून माहीत नाही, त्याचा शोध घ्यायचा आणि नुसते शोध घेत राहायचे नाही, शोध लावायचा. नुसते अज्ञात असे म्हटले की, हरवून जायला होते. अज्ञात कशाशी निगडित आहे? माणसाशी, विश्वाशी आणि जीवनाशी.

माणूस अजून सगळा समजलेला नाही. विश्व अजून पूर्णपणे समजलेले नाही. जीवनाचा अर्थ अजून पूर्णपणे समजलेला नाही. माणूस काय आहे? जीवनाचा अर्थ काय? यातले खूप अज्ञात आहे. मानवजातीलाच अज्ञात आहे. या अज्ञातातले शोधणे. भारतीय सभ्यतेत अज्ञातातले शोधणे घडते आहे काय? नाही, हे उत्तर. कल्पनादारिद्र्य हे एक कारण सांगितले जाते. दैनंदिन जीवनक्रम प्रमुख उरतो आणि शोध घेणे त्यातून केले जाते, ते शोध घेणे म्हणजे पुनर्शोध होय. शोध घेणे हेच प्रमुख ठरून त्यानुसार दैनंदिन जीवनक्रम घडतो, शोध घेणे चोवीस तासांचे होते, तेव्हा तो पुनर्शोध नसतो, तर शोध घेणे असते. पुनर्शोध बाह्य मनाचा व्यवहार असतो. शोध घेणे, हा अंतर्मनाचा व्यवहार असतो.

अंतर्मनात अज्ञातातल्या एखाद्या पैलूचा सुगावा लागतो. सुगावा लागणे, ही प्रक्रिया इंट्युशनने- अंतर्ज्ञानाने घडते. हा सुगावा नुसताच व्यक्त झाला, तर त्याला दर्शन साक्षात्कार म्हणता येते. सुगावा घेऊन तो सत्य म्हणून सिद्ध करावा लागतो. ही सिद्धता करण्यासाठी विवेक ‘रिझन’ वापरावा लागतो. अंतर्ज्ञान व विवेक यांनी अज्ञातातले शोधलेले ज्ञानशाखा निर्माण करते. भारतीय समाजात असे अज्ञातातले शोधणे घडत नाही का? उत्तर आहे, नाही घडत. अज्ञात असे काही नाहीच, अशी भारतीय समाजाची धारणा आहे का? धर्माने सर्व सांगितलेले, शोधलेले आहे, अशी प्रत्येक धर्मातल्या माणसाची समजूत असते. उदाहरण द्यायचे तर, मृत्यू काय आहे? याचे उत्तर प्रत्येक धर्माने दिलेले आहे. तसे असले तरी प्रत्येक माणसाच्या हयातीत असे पाच-सात तरी प्रसंग येतात, की त्याला मृत्यू काय आहे? हा प्रश्न नव्याने, ताजेपणाने पडतो. माणसाला नव्याने उत्तर हवे असते.

विकार अंतर्मनात गेले, तर माणूस विकृत होतो. अज्ञाताविषयीचे कुतूहल अंतर्मनात गेले, तर माणूस सर्जनशील होतो. प्रश्न अंतर्मनात घ्यायला माणूस भितो. कारण प्रश्न अंतर्मनात राहणे, हे अतिशय वेदनादायक असते. शारीरिक कष्ट, शारीरिक वेदना, बाह्य मनाच्या वेदना यापेक्षा प्रश्न अंतर्मनात राहण्याच्या वेदना तीव्र असतात. अशा वेदना भारतीय माणूस टाळू पाहतो का? याला आणखी एक आयाम आहेच. भारतीय सभ्यतेत अशी एक धारणा झालेली आहे की, आर्थिक स्थिती नीट झाल्याशिवाय शोध घेणे, अज्ञातातले शोधणे करता येणार नाही. शोधांचा इतिहास पाहिला, तर हे प्रमेय चुकीचे ठरते. भारतीय स्थिती अजून तरी असा अज्ञाताचा शोध घेण्याला अनुकूल नाहीय. ज्याला घ्यायच्याय त्याने स्वतःच्या हिमतीवर घ्यायच्याय. अज्ञातातले समजून घ्यायचा समाज सामूहिकपणे प्रयत्न करतो असे नसते. अज्ञातातले जाणून घ्यायला समाज उत्सुक असतो आणि अज्ञातातले शोधायचे असते व्यक्तीनेच. हे व्यक्तिवाद, समूहवाद असे द्वंद्व नसते. व्यक्तीचे काम आणि समूहाचे काम अशीही समज असते. व्यक्तीने शोधायचे आणि समाजाला द्यायचे. अज्ञातातले शोधण्याने संस्कृती निर्माण होते. संस्कृतीने जगण्याची पद्धती, सभ्यता, परंपरा सुधारतात. परंपरा जपायच्या नसतात. मुद्दाम मोडायच्या नसतात. अज्ञातातले शोधून सुधारायच्या असतात.

कथात्म साहित्यानेही मानवजातीला अज्ञात असलेले शोधायचे असते. नवीन धर्म स्थापना होणे कधीपासून थांबलेले आहे. जुने धर्म आहेत, तरी माणसाला स्वधर्म हवाय. साहित्याने व्यक्तीला स्वधर्म स्थापायला साहाय्य करायचे आहे. किंबहुना, माणसाला स्वधर्म स्थापायची गरज असते, ही साहित्याची प्रेरणा आहे, असेही म्हणता येईल. अशी यातायात वाङ‌्मयाचे तत्त्वज्ञान निर्माण करते. वाङ‌्मयाचे तत्त्वज्ञान निर्माण होत राहणे प्रगत संस्कृतीसाठी आवश्यक असते. प्रत्येकाने हे आव्हान घ्यावे. मीही घेत आहे. आणि अखेरीस आता मी धरून सगळ्या साहित्यकारांसाठी चिंतन करतो. जगातले मार्खेज, पामुक, सारामागो आणिक कोण कोण बाजूला सारा. मराठीतले नेमाडे, श्याम मनोहर, बाजूला ठेवा. तेंडुलकर, आळेकर बाजूला ठेवा. अरुण कोलटकर, सलिल वाघ बाजूला ठेवा. कादंबरी, कथा, कविता, नाटक हे वाङ‌्मय प्रकार बाजूला ठेवा. सभ्यतेतल्या भाषांसह सर्व खाणाखुणा वापरा आणि मानवजातीच्या अज्ञातातल्या एखाद्या पैलूचा शोध लावा. शोध घेणेही थांबवू नका. शोधच लावा. शोधच लावायचा आहे, ही तुमची जबाबदारी आहे, हे समजून घ्या.

अध्यात्म बाजूला ठेवा आणि मीपणा घालवायचा कसा, याची चक्क प्रक्रिया शोधा. आणि हां, हे सगळे अंतर्मनात घडले पाहिजे. प्रश्न अंतर्मनात जाणे हे नैसर्गिकच असते. अंतर्मनात जगरहाटी असेल तर प्रश्न अंतर्मनात जायला अडथळा होतो. जगरहाटी बाह्यमनात राहू द्यावी, म्हणजे प्रश्न अंतर्मनात आपोआप जातो. प्रश्न अंतर्मनात राहू द्यावा. त्याच्या वेदना सोसाव्यात. मग निर्मितीचा सुगावा लागतो. सुगाव्याने उत्तर सिद्ध करावे. सिद्ध करणे महत्त्वाचे. यासाठी विवेक वापरावा. विवेक वापरणे, तसे यांत्रिक असते, शारीरिक कष्टाचे असते. अशा प्रकारे निर्माण झालेले साहित्य ओरिजिनल असते. या साहित्याला संगीतकार चाल लावतील, दिग्दर्शक रंगमंचावर वा पडद्यावर आणतील, समीक्षक साहित्याचे प्रकार पुन्हा करतील.
(प्रतिक्रियेसाठी ०२०-२४२२४६०२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
(उत्तरार्ध)