आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shyamkant Patil Article About Child Adopt System

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दत्तक प्रक्रिया काल आणि आज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमामधील ‘ऑनलाइन दत्तकाचे कंगोरे’ हा लेख वाचला व मी दत्तक प्रक्रियेबाबत केलेल्या कामाच्या आठवणी जागृत झाल्या. मी जवळपास ८० मुलं आतापर्यंत दत्तक दिली आहेत.

ज्यांना मूलबाळ नाही ते कायदा येण्यापूर्वी काय करत, ते पाहू. पूर्वी आपल्या भाऊबंदकीतील मुलगा ‘उसना मुलगा’ म्हणून घेतला जायचा. शक्यतो हे मूल भावाचं, चुलतभावाचं, क्वचित बहिणीचंही घेतलं जात असे. त्या वेळच्या सामाजिक बंधनात बांधण्यासाठी विधिवत हे मूल निपुत्रिक कुटुंब आपल्या घरात घेत असे. हा विधी फार पूर्वीच्या काळापासून ‘दत्तक विधान’ म्हणून प्रचलित आहे. या मुलास त्या कुटुंबाची सर्व मालमत्ता मिळत असते. या वेळी विधिवत पूजाअर्चा करून, मंत्रोपचार म्हटले जात. मुलाला दत्तक पालकांच्या मांडीवर बसवला जायचे. तसा फोटो काढला जायचा व त्या दिवसानंतर तो त्याचे जन्मदाते आईवडील सोडून दत्तक आईवडिलांकडे राहायला यायचा.

आज दत्तक प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. डिजिटल स्वरूपात ही प्रक्रिया त्वरित होते व काही दिवसांतच मूल कायदेशीररीत्या दत्तक पालकांना विनाअडथळ्याचे मिळते. पण ‘कारा’ गाइडलाइन्स येण्यापूर्वी काय स्थिती होती?
अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलं, पोलिसांकडून ऑब्झर्वेशन होम (रिमांड होम) संस्थेत आणली जायची. त्याच वेळेस ज्यांना मूलबाळ होत नाही व शक्यताच नाही, असे चाळिशीपुढचे या संस्थांकडे मूल दत्तक पाहिजे, अशा आशयाचा अर्ज करायचे. रिमांड होम अगर अनाथाश्रमाचा अधीक्षक-परिविक्षा अधिकारी त्या दत्तक मागणार्‍या कुटुंबाची माहिती, गृहभेट अहवाल तयार करून अवघ्या दोन दिवसांत बालन्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सादर केला जायचा व ते नवजात अर्भक परिविक्षा अधिकार्‍याच्या शिफारशीनुसार तीन अगर सहा महिन्यांसाठी ‘वॉर्ड‌्स अ‍ॅण्ड गार्डियनशिप’ कायद्यातील तरतुदीनुसार सांभाळण्यासाठी दिले जायचे. या काळात परिविक्षा अधिकारी त्या कुटुंबाला भेट देऊन पालक बाळाला कसं सांभाळतात, हे पाहून तसा अहवाल कोर्टाला देत असत.

क्वचित असेही घडायचे की, पालक व्यवस्थित सांभाळत नसत, बाळ आणि त्यांच्यात भावनिक एकरूपता होत नसे, अगर दुखावलेले नातेवाईक अडचणी निर्माण करत. अशा वेळी या तीन महिन्यांच्या काळात पालक हे मूल संस्थेकडे परत करायला येत. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाई. मूल व आईवडिलांमधल्या भावनिक नात्यांचे किस्से सांगितले तर २०० पानांचं पुस्तकच तयार होईल.

नव्या नियमानुसार वरकरणी ही प्रक्रिया या नियमामुळे सोपीही झाली. काही लोभी संस्थांना चापही बसेल व दत्तक प्रक्रियेतील गैरप्रकार कमी होतील. पण दुसरी बाजू तपासली तर ‘मधुरिमा’मधील मुद्दे विचार करायला लावणारे आहेत. स्क्रीनवर बाळाचा फोटो पाहून बाळाच्या स्पर्शात केवढी जादू आहे, हे कसे कळणार. बाळाच्या संगतीत अल्पकाळ राहिल्यावर दत्तक पालकांना फुटणारा पाझर कसा अनुभवणार, या गोष्टी अनुत्तरित राहतात. याबाबत मी स्वत: अनुभवलेला एक किस्सा असा.

आमच्याकडे मुलगा दत्तक घेण्यासाठी एक जोडपे आले. कागदपत्रांची पूर्तता झाली. चारच दिवसांत पोलिसांनी एक तीन दिवसांचे बाळ आणून दाखल केले. मी त्या जोडप्याला बोलावले. त्यांच्यासोबत कोर्टात चहाच्या सुटीत जाऊन न्यायाधीशांना तीन महिन्यांसाठी मूल सांभाळण्यास देण्याबाबत विनंती केली. अहवाल वाचून त्या पालकांशी जुजबी संवाद साधून महिन्यासाठी मूल सांभाळण्याचे आदेश त्यांनी दिले. मी त्या कुटुंबासोबत संस्थेत आलो व मूल त्यांच्या ताब्यात देण्याची तयारी करू लागलो. तेवढ्यात ते कुटुंब मला सांगू लागले की, मूल आम्हास आवडले आहेच, आम्ही नेणारच आहोत; पण चार दिवसांत माझ्या सख्ख्या भावाचे लग्न गुजरातेत आहे, ते साजरं करून येऊन मूल ताब्यात घेतो. हवं तर ते आठ दिवसांसाठी एखाद्या नर्सिंग होममध्ये ठेवू. त्याचा खर्च आम्ही देतो. पण आमची एवढी अडचण लक्षात घ्या. त्यांची अडचण रास्त होती, पण माझं मन विचलित झालं. आम्ही जवळच्याच एका नर्सिंग होममध्ये त्या बाळाची सोय करायचं ठरवलं. मी तुम्हाला बाळाचा ताबा देतो, तुम्हीच स्वहस्ते त्याला नर्सिंग होममध्ये ठेवा, असं मी त्यांना सांगितलं. ते कुटुंब तयार झाले. मी बाळ त्या आईच्या ताब्यात दिले. त्यांनी सर्वांच्या हातावर पेढे ठेवले व आमची वरात नर्सिंग होमकडे निघाली. बाळ त्या आईच्या कुशीतच होतं. थोडं अंतर गेल्यावर त्या थबकल्या. मला जवळ बोलावून घेत म्हणाल्या, नाही, नाही. मी माझ्या बाळाला नर्सिंग होममध्ये नाही ठेवणार. मी लग्नाला नाही जाणार. मी माझं बाळ सांभाळणार... आणि आम्ही नर्सिंग होममधून परत फिरलो. सिव्हिल हॉस्पिटलमधून नर्सिंग होमपर्यंत फक्त १५ मिनिटं, ते बाळ त्यांच्या कुशीत होतं. यावरून तुमच्या लक्षात येईल की, आॅनलाइन प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक असली तरी त्यात हा मानवी पैलू कदाचित येऊ शकणार नाही.
श्यामकांत पाटील, मालेगाव
(संस्थापक - आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था, मालेगाव, नाशिक)