आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार सियाचीनचा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल्टी भाषेत ‘सिया’ या शब्दाचा अर्थ गुलाबाचे फूल असा होतो; तर ‘चेन’ म्हणजे समुच्चय. अशा या निसर्गाचा अनुपम्य आविष्कार असलेल्या सियाचीन येथे पर्वतारोहणाची संधी मिळणे ही एक स्वप्नवत गोष्ट असते. दरवर्षी भारतीय संरक्षण दलाच्या वतीने सियाचीन गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन केले जाते. सियाचीन ग्लेशियर मोहिमेची सर्वात पहिली नागरी बॅच 2007मध्ये गेली होती. आजवर केवळ 100 ते 150 भारतीय नागरिकांनाच या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले आहे. एकंदरीत 76.4 कि.मी.चा सियाचीनचा परिसर आहे. त्यापैकी 60 कि.मी. अंतर पायी कापायचे असते.

अतिशय कठीण निकषांच्या आधारे संपूर्ण भारतातून केवळ 25 ते 30 जणांचीच या मोहिमेसाठी निवड केली जाते. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणा-याने पूर्वी हिमालयातील मोहिमा पूर्ण केल्याचे दाखले तसेच स्वत:च्या जबाबदारीवर या मोहिमेवर जात असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आणि शारीरिक क्षमता तपासणी संदर्भातील शिफारस पत्र अशी कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते. 26 ऑगस्ट 2012 रोजी आम्ही जळगावहून दिल्ली-श्रीनगर-द्रास अशा प्रवासाला निघालो. या सफरीदरम्यान दोनदा लष्कराच्या ट्रान्झिट कॅम्पमधील दृष्टिकोन बदलणारा मुक्काम अनुभवता आला. भारतीय सैन्याच्या थरारक आयुष्याचे कंगोरे जवळून न्याहाळता आले. आपल्या आर्मीला जगातील सर्वात कणखर आर्मी का म्हणतात याची प्रचिती आली. भारत-पाकिस्तान विभागणा-या नियंत्रण रेषेवर उणे 40 अंश से. तापमान असते. या जीवघेण्या वातावरणात सलग आठ महिने हे जवान मोठ्या कष्टाने आपले संरक्षण करत जगतात. त्याच त्या व्यक्तींचा सहवास, पिण्यास योग्य पाण्याचा व विजेचा अभाव - हे सगळे किती भयंकर आहे, याची तीव्रता आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर लक्षात येऊ शकते. त्यांच्या सामर्थ्य आणि शौर्याला सलाम करत आम्ही 30 ऑगस्ट रोजी सकाळी द्रास सोडले ते लेह गाठण्यासाठी.

निसर्गाचे चमत्कार अनुभवत आमचा प्रवास सुरू झाला. वाटेमध्ये निमूमार्गे लेहला येताना मॅग्नेटिक हिलवर थांबून गुुरुत्वाकर्षण शक्तीचा चमत्कारिक अनुभव घेतला. या ठिकाणी एखादे वाहन उभे केले तर ते 7-8 फूट आपोआप मागे ओढले जाते, हा अनुभव विलक्षण वाटला. कारगिल, मूलबैक, नमकिला पास, फोटुला पास, लामायूर, सासपोल, खालसी, निमू असे करत जळगाव ते लेह-लडाख हा 2520 कि.मी.चा मोठा टप्पा पूर्ण झाला होता. मोहिमेसाठी विविध भागांतून आलेल्या एकूण 21 सदस्यांनी (त्यात तीन महिलांचाही समावेश होता.) यात भाग घेतला होता.

लडाख म्हणजे हिमालय आणि काराकोरममधले घरटेच. समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर असलेले. जगभरातल्या छायाचित्रकारांना संमोहित करणारे जादुई सौंदर्यस्थळ. सहा दिवसांच्या इथल्या सक्तीच्या आरामदायी मुक्कामात दररोज सकाळी रक्तदाब, पल्स रेट, ऑक्सिजन लेव्हल अशा विविध शारीरिक वैद्यकीय चाचण्या केल्या जायच्या. तिथे येणा-या प्रत्येकाला या पद्धतीचा शास्त्रीय आराम करणे बंधनकारक असते.अन्यथा थोडाही हलगर्जीपणा त्रासदायक ठरू शकतो. मोहिमेत सहभागी झालेले मिझोरामस्थित लालरेम डिका यांना असाच त्रास उद्भवल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. शेवटी मोहिमेत सहभागी होण्यास मज्जावही करण्यात आला. 7 सप्टेंबर रोजी सकाळी सियाचीनकडे निघण्यापूर्वी ‘फ्लॅग ऑफ सेरेमनी’ झाला. कोणतीही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास सैन्यदलाचे जवान व तिथे सदैव तैनात असलेले चिता हेलिकॉप्टर तुम्हाला सुखरूप बाहेर काढतील, असा विश्वास आम्हाला दिला गेला. जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटररोड अशी ख्याती असलेले खारदुंगला, नुब्रा नदी, सेसरकांगडीच्या उंचच उंच पर्वतरांगा, असा नजारा बघत आम्ही चालत राहिलो. निर्जन आणि अतिशय ओसाड असा हा प्रांत. अभावानेच आढळणारी झाडी. सर्वदूर केवळ बर्फच बर्फ. रात्री 8.30च्या सुमारास आम्ही सियाचीन बेसकॅम्पमध्ये पोहोचलो. माऊंटन सिकनेस, चिलब्लेन्स, मेन्टल डिसऑर्डर, फ्रॉस्ट बाइट, मेटल बाइट या संभाव्य आजाराची आम्हाला स्पष्ट कल्पना दिली गेली. जगप्रसिद्ध पर्वतारोहक मार्क इंग्लिश याला एका मोहिमेदरम्यान फ्रॉस्ट बाइटमुळे दोन्ही पाय गमवावे लागल्याचीही आठवण आम्हाला करून दिली गेली.

9 सप्टेंबर हा ख-या अर्थाने प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता. बर्फातील बूट घालण्यापासून ते चालण्यापर्यंत सगळा अनुभव अतिशय वेगळा होता. पायातील बुटांचे वजन सुमारे 5 किलोपर्यंत होते; पण सरावाने अशक्य वाटणा-या ब-याच गोष्टी सोप्या होत गेल्या. नंतरच्या सरावात दोरीचा वापर करताना थंब नॉट, फिशरमन नॉट, रिफ नॉट, मिडलमन नॉट अशा वेगवेगळ्या प्रकारे गाठी बांधायला शिकवले गेले. 600 फुटांपर्यंत चढणे-उतरणे, पर्वतावर पायी चालणे इ. सरावांवर भर देण्यात आला. 12 सप्टेंबर रोजी सुमारे एक हजार फूट पायी जायचे ठरले. पाठीवर सॅक होतीच. वाटेत प्रचंड मोठे दगड, क्रॉवास म्हणजे दोन छोट्या डोंगरांच्या मध्ये असलेली अरुंद दरी, अरुंद रस्ते आणि सोसाट्याचा वारा स्वागताला होता.

ग्लेशियरमधून पायी वाट काढताना प्रचंड दमछाक होत होती. ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीला परस्परांशी दोराने बांधण्यात आले होते. मोहिमेमध्ये उपयुक्त ठरणा-या सर्व प्रकारांचा कसून सराव करण्यामध्ये आम्ही सगळेच एकरूप झालो होतो.
रविवार, 16 सप्टेंबर रोजी पहाटे 3.45 वाजता आम्हाला उठवण्यात आले. न्याहारीनंतर एका वाहनाने आम्हाला ओपी बाबा मंदिराजवळ नेण्यात आले. हे सर्वधर्मस्थळ असल्याने त्या ठिकाणी सर्व देवतांची पूजा करण्यात येते. ओपी बाबांच्या अनुमतीशिवाय पुढे गेल्यास अनुचित प्रकार घडतात, अशी प्रत्येक सैनिकाची श्रद्धा असल्याचे दिसून आले. पुढील 14 कि.मी.चा प्रवास पायी करायचा होता. मोहिमेत चालण्याचा वेग ताशी सरासरी 3 किलोमीटर होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक वेळी 5-6 जवानांची टीम आमच्या आधी पुढील ठिकाणांवर जाऊन थांबत असे. त्या वेळी प्रत्येकाला सनगॉगल्स घालणे सक्तीचे होते, कारण दोनच दिवसांपूर्वी काही पोर्टर्सना सनब्लाइंडनेसमुळे दृष्टी गमवावी लागली होती.

प्रचंड थकवा येत असला तरीही आमची मार्गक्रमणा सुरू होती. केलेल्या सरावाचे चीज होत असले, तरी प्रत्यक्ष येणारे अनुभव हे नित्यनूतन ठरत होते. संघर्ष आणि आव्हानांचा सामना करताना आपण स्वत:च्याच अधिक जवळ जात असल्याचे जाणवत होते. जळगावपासून हजारो किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर मी कुठे पोहोचलो, तर स्वत:जवळ; ही एक आध्यात्मिक अनुभूतीच होती.

त्या रात्रीचे भोजन साडेसात वाजता आटोपले. प्रचंड थंडी, घोंघावणारा वारा, पावसाची चाहूल यामुळे वातावरण क्षणाक्षणाला बदलत राहिले. काही जणांचा रक्तदाबही वाढला होता. परिणामी सगळ्यांना प्रचंड थंडीतही पाणी पिण्यास सुचवण्यात आले. बर्फावर जेमतेम लाकडी फळ्या, त्यावर स्लिपिंग मॅट आणि स्लिपिंग बॅग झोपण्यासाठी देण्यात आल्या. नैसर्गिक विधींसाठी एकट्याने जाऊ नये, असे बजावण्यात आले. पूर्वी काही सैनिक सोसाट्याच्या वा-यामुळे उडाल्याने त्यांना जीव गमवावा लागल्याचे कळले. वातावरण झपाट्याने बदलत होते. त्यामुळे सकाळी 5.30 वा. मेजरसाहेबांनी आम्हास पुढे न जाण्यासंबंधी सूचना केली. अशा वातावरणात ब्रेन स्ट्रोक, कार्डिअल अ‍ॅटॅक, पॅरालिसिस यापैकी कोणतेही आजार अचानक उद्भवू शकतात, याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली. त्यांचा निर्णय ऐकून आम्ही सुन्न झालो; पण तुम्ही आयुष्याला प्राधान्य द्या, असे सांगितल्यावर आमच्यापैकी केवळ लष्कराची पार्श्वभूमी असलेल्या व काही पूर्वानुभवी लोकांनाच पुढील मोहिमेस पाठवण्यात आले. परतीच्या प्रवासात लष्कराच्या वतीने सियाचीन ग्लेशियर एक्सपिडिशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्हाला स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

शेवटच्या पोस्टपर्यंत जाण्याची आमची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, याची हळहळ पुढे दोन दिवस मनाला छळत होती. विचारांती हे लक्षात आले की, जेथवर आम्ही पोहोचलो ते स्वप्नवतच तर होते!

deshmukhsameer2003@gmail.com