आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य,सचिन आणि सन्मान....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नाचा खडा गळ्यात घातला की गळ्याची शोभा वाढते, तो खडा मुकुटात जडला की रत्नजडित मुकुट ‘शोभतो बरा’ असं म्हणतात. जिथे रत्न असेल, तिथे त्या वास्तूचे मूल्य वाढते. ‘भारतरत्न’ आतापर्यंत 39 मान्यवरांना देण्यात आलं. प्रा. सी. एन. आर. राव आणि सचिन हे चाळीस-एकेचाळिसावे! वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी एकेचाळिसावं भारतरत्न सचिनला मिळालं, हा योगायोग...
नामवंत साहित्यिक-कवी-नाटककार-गायक-लेखक आपल्या गावात एकदा तरी यावे आणि त्यांनी एकाच मांडवात बसावे, हे स्वप्न उराशी बाळगून त्या स्वप्नाचा पाठलाग करून सच्चा रसिक एकदा तरी साहित्य वा संगीत संमेलनाची पताका आपल्या गावात फडकवतो. इथपर्यंत आपण समजू शकतो; परंतु दिग्गज साहित्यिकांची नगरी असावी, असं स्वप्न कोणाला पडावं? परंतु वयाच्या सत्तरीच्या आसपास आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर या द्वयीने हे स्वप्न पाहिलं. प्रचंड जिद्दीने पाठपुरावा करत 1968मध्ये ‘साहित्य सहवास’ नावाच्या कॉलनीची मुंबईतल्या वांद्रे उपनगरात स्थापना करून स्वप्नपूर्ती केली.
काणेकर-अत्रेंनी संयुक्त महाराष्‍ट्राचं स्वप्नदेखील एकत्रच पाहिलं. स्वप्नं पाहायची आणि कोणताही गाजावाजा न करता त्या स्वप्नांचा पाठलाग करून ती स्वप्नं पूर्ण करायची, ही काणेकर-अत्रेंना सवयच होती. कालांतराने सचिन तेंडुलकरने तो वसा जपला. आचार्य अत्रे, काणेकर आणि सचिन तेंडुलकर तिघांनाही पडलेल्या स्वप्नांमध्ये एक समान धागा म्हणजे, ‘साहित्य सहवास’ कॉलनी. खरं म्हणजे सचिन आणि अत्रे-काणेकर यांच्यामध्ये दोन पिढ्यांचं अंतर. प्रा.रमेश तेंडुलकर हे अनंत काणेकरांचे आवडते विद्यार्थी, तर तेंडुलकरांचे आयडॉल काणेकर. सचिन हा काणेकरांना नातवासारखा. काणेकरांचा धाकटा नातू सत्यजित सचिनचा मित्र. दोन पिढ्यांनी पाहिलेल्या स्वप्न्नांचा संगम म्हणजे साहित्य सहवास कॉलनी. एका पिढीने ही वास्तू उभारण्याचं स्वप्न पाहिलं, तर त्याच वास्तूमध्ये राहून सचिनने आयुष्यातील पुढची स्वप्नं पाहिली, ती पूर्णही केली.
असं वाचलं होतं की, एके दिवशी अनंत काणेकर आणि आचार्य अत्रे सचिवालयामध्ये कुठल्या तरी सरकारी कामासाठी गेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणही हजर होते. कामकाज संपल्यावर चहापाणी सुरू असताना अनौपचारिक गप्पा सुरू होत्या. तेव्हा अनंत काणेकर मुख्यमंत्र्यांना सहज बोलून गेले, ‘तुम्हाला आम्ही लेखक मंडळी श्रीमंत आहोत, असं वाटलं की काय! तुम्ही कलावंतांना जागा दिलीत आणि आम्हा साहित्यिकांना मात्र दिली नाहीत.’ त्यावर लगेच यशवंतराव चव्हाण त्यांच्या नेहमीच्या हजरजबाबीपणाने म्हणाले, ‘तुम्ही मागितली कुठे? त्यांनी मागितली म्हणून त्यांना दिली.’ तेव्हा अत्रे-काणेकरांनी तिथलाच एक कागद घेतला आणि वर ‘साहित्य सहवास’ हे नाव लिहून विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, रा. भी. जोशी, गंगाधर गाडगीळ अशी सुचतील तशी दहा-बारा नावं लिहून तो अर्ज मुख्यमंत्र्यांच्या हातात दिला. तेथेच ‘साहित्य सहवास’ची स्थापना झाली. संस्थापक आचार्य अत्रे आणि प्रमोटर म्हणून अनंत काणेकरांच्या सह्या झाल्या. वांद्र्याला कलानगरच्या पुढे सगळी खाडीची दलदल. त्या चिखलात ‘साहित्य सहवास’साठी एक भूखंड मिळाला. सुरुवातीच्या काळात साहित्य सहवासात कोणी सभासद व्हायला तयारच नसत. सचिनने जशी त्याची 100 शतकं देशोदेशी फिरून जमा केली, तशीच काणेकर-अत्रेंनी गावगाव फिरून साहित्यिकांचा पाठलाग करून सभासद गोळा केले!
आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर हे सर्वार्थाने दिग्गज. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, वक्तृत्व, अध्यापन असा चतुरस्र संचार असलेल्या व्यक्ती एखाद्या संस्थेच्या संस्थापक पदावर येतात; त्यांचे गुण आणि संस्कार संस्थेच्या मातीत मुरतात आणि त्या मातीतूनच सचिन तेंडुलकरसारखा सर्वगुणसंपन्न जिगरबाज, धडाडीचा अष्टपैलू खेळाडू जन्माला येतो. हा योगायोग नाही, तर नियतीची किमया म्हणावी लागेल. प्रा. रमेश तेंडुलकर हे अनंत काणेकरांचे आवडते विद्यार्थी. काणेकरांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप तेंडुलकरांवर असणं, हे ओघानेच आलं. अनंत काणेकर साहित्य सहवासात 1969मध्ये ‘झपूर्झा’मध्ये राहायला आले आणि गुरूंचा पाठलाग करत मागोमाग तेंडुलकरही साहित्य सहवासात ‘उष:काल’मध्ये राहायला आले.
सुरुवातीच्या काळात अगदी 70-80च्या दरम्यान ‘साहित्य सहवास’ म्हणजे काय आहे, असा प्रश्न परिसरातील लोकांना पडायचा. कुणी ‘साहित्य सहवासचा’ पत्ता विचारत आलाच, तर ‘ये क्या चीज है!’ असं लोक विचारायचे. परंतु साहित्य सहवासची सर्वसामान्यांना खरी ओळख पटली, ती 1990मध्ये. सचिन तेंडुलकर क्रिकेटर म्हणून उदयास आला तेव्हा. साहित्य सहवासचं नाव वांद्र्यात किंवा मुंबईतच नव्हे तर जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकू लागलं. सुरुवातीच्या काळात सकाळी निघालेला अभिनंदनाचा पुष्पगुच्छ ‘साहित्य सहवास’चा पत्ता शोधत-शोधत दुपारपर्यंत येऊन धडकायचा. परंतु आता पिनकोडशिवाय नुसतं ‘साहित्य सहवास’ लिहिलेलं पत्रदेखील कॉलनीत येऊन पोहोचू लागलं. 2007मध्ये विंदांना ज्ञानपीठ पारितोषक मिळालं तेव्हा पत्रकार, चॅनलवाल्यांना साहित्य सहवासचा पत्ता शोधणं कठीण गेलं नाही. इंच-इंच लढवून बिल्टअपचे जास्तीत जास्त कार्पेट कसं करता येईल, यासाठी हपापलेल्या या जगात काणेकर-अत्रेंनी कॉलनीत त्या वेळी मुलांसाठी खेळायला एक मोकळं मैदानदेखील ठेवलं. याच मैदानात सचिन तेंडुलकरने क्रिकेटची बाराखडी गिरवली. सचिनचा मोठा भाऊ अजित क्रिकेटर व्हायची स्वप्नं पाहू लागला. त्याच्या स्वप्नांची पूर्ती सचिनने केली.
साहित्य सहवासात शंभरावं पुस्तक प्रकाशित करणारे म्हणजेच पुस्तकांचं शतक झळकवणारे बरेच लेखक आहेत. तसंच सचिननेही शतकांचा विक्रम करून पुढे येणा-या भावी पिढीला शंभर शतकांचं स्वप्न पाहायला भाग पाडलंय. सचिनच्या कारकीर्दीमुळे अनेक लेखक असलेल्यांनी आणि नसलेल्यांनी लेखणी हातात घेतली. सचिनने लिहायला साहित्य दिलं; त्यांनी लिहिलं. लेखक घडवणारा क्रिकेटर सचिन, हा लेखकाला लिहायला साहित्य निर्माण करून देणारा साहित्यिक नाही तर अजून दुसरा कोण? सचिनने क्रिकेटर बनून अप्रत्यक्षपणे साहित्याची सेवा केली. प्रा. रमेश तेंडुलकर, कवी नितीन तेंडुलकर आणि अजित तेंडुलकर या तिघांनी जपलेली साहित्य आणि क्रिकेटची परंपरा सचिनने कायम ठेवली. अत्रे-काणेकरांचं स्वप्नही ख-या अर्थाने सचिनने पूर्ण करायचा प्रयत्न केला.
spardhe2002@yahoo.co.in