आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधीपर्व!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा म्हटले की ज्ञान, यमुना म्हटले की भक्ती आणि प्रेम, आणि सिंधू म्हटले की सरस्वती आणि संस्कृती, या गोष्टी पटकन आपल्या मनात होतात. मानवी संस्कृतीच्या प्रथम प्रकटीकरणाचा पहिला शब्द ‘वेद’ मानला जातो आणि त्याचा उच्चार सिंधूच्या प्रवाहाबरोबर निनादत राहतो. सिंधूने सिंध भूमी आणि हिंद माणूस दिला आणि जपला, असे आपण म्हणतो. भारताच्या ऐतिहासिक आणि भौगौलिक पटलावर त्याचेच पहिले नाव दिसते.
भगवान शिवाच्या दैवतकथा, त्यातून पुढे आलेली मिथके, रामायण, महाभारतापासून आजपर्यंतच्या मानवजीवनाच्या किती घडामोडी या सिंधूच्या साक्षीने घडल्या आहेत. केवळ हिंदूच नव्हे तर इजिप्त, ग्रीक, अरब, पठाण, मोगल आणि ब्रिटिश, रोम, अलेक्झांडर, सिकंदर, बुद्ध, जैन अशा अनेकांच्या पाऊलखुणा या मातीवर उमटल्या आहेत. ही भूमी फकीर, पीर, दर्गे आणि सुफी संतांची आणि कवींचीसुद्धा आहे.
हजारो वर्षांच्या या मानवी संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट घडली, 1947 या वर्षाच्या अखेरच्या काळात. स्वातंत्र्याच्या आनंदात फाळणीचे विष पेरले गेले. हजारो सिंधी-हिंद अखंड भारतातून स्वतंत्र भारतात स्थलांतरित झाले. त्यांनी पाकिस्तान नाकारला आणि स्वतंत्र भारत स्वीकारला. ते येथे आले. त्यांना आपण निर्वासित म्हणतो, पण ते अतिशय चुकीचे आहे. आपलेच, आपल्या भूमीतले, आपल्या संस्कृतीचे ते अविभाज्य घटक आहेत. स्थलांतरित म्हणून आपण त्यांची नोंद करतो, पण तेही अर्धसत्य आहे. केरळचा माणूस मुंबईला आला किंवा दिल्लीला आला तर आपण त्यास निर्वासित म्हणतो का? असो.
महात्मा गांधींनी 27 मे 1947 रोजी प्रार्थनेच्या वेळी बोलताना सांगितले, ‘मी सिंधी आहे. (आय युज्ड टु कॉल मायसेल्फ सिंधी) सिंधी हिंदूंनी आपल्या मनातली भीती आणि अस्वस्थता काढून टाकावी.’ गांधीजींनी यापूर्वी सिंध प्रांताला भेट दिली होती. 1916, 1917, 1920, 1921, 1929, 1931 आणि 1934 असे सात वेळा ते सिंधला गेले होते आणि ते पुन्हा जाणार होते, पण त्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. गांधींना ‘मी सिंधी आहे’, म्हणताना आपण सगळेच सिंधी आहोत, हेच अभिप्रेत होते.
फाळणीचे दु:ख, त्या घडामोडी, आपली भूमी, वतन सोडून येणारे समूह व त्यांचे शल्य यांची चर्चा येथे नाही. तो सगळा काळ, इतिहास, त्या वेळच्या कथा, व्यथा सांगणा-या कथा-कादंब-या, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि त्या काळाविषयी व घटनांविषयी उलटसुलट चर्चा आपण पाहत व ऐकत आलो. हे सगळे टाळून आपण चर्चा करणार आहोत, त्या सिंधी समाजाची. येथे सिंधी समाजदर्शन आहे. सिंधी समाज, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली व जीवनव्यवहार, परंपरा आणि चालीरीती यांची चर्चा आपण येथे करणार आहोत.
फाळणीनंतर त्वरित सिंधी समाजाचे काही लोक जयपूर आणि अजमेर येथे आले. त्यांना वाटले की, पाकिस्तान फार काळ अस्तित्वात राहणार नाही आणि आपण परत आपल्या गावाकडे, घराकडे, जमिनीकडे जाऊ. मुंबई हे खूप मोठे शहर आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, या भीतीने ते प्रारंभी तिथेच थांबले. काही दिवसांनी त्यांना खात्री झाली की, आता पाकिस्तान हे स्वतंत्र राष्टÑ राहणार आहे. तेव्हा काही लोकांनी कांडला बंदर जवळ केले. जेथे सिंधू पुनर्वसन महामंडळाने ‘गांधीधाम’ शहर वसवण्यासाठी त्यांना जागा दिली. पण हे शहर इतक्या लवकर उभे राहणे शक्य नव्हते, त्यामुळे बरेच मोठे समूह मुंबईकडे आले. मुंबईजवळ उल्हासनगर आर्थिकदृष्ट्या परवडणे शक्य होते आणि कष्ट करण्याची व दोन पैसे मिळवण्याची संधी मुंबईत मिळू शकेल, अशी शक्यता होती.
मुंबई हे भारतात आलेल्या सिंधी समाजाचे मुख्य केंद्र आहे. फाळणीच्या वेळी आणि नंतरच्या काळात ते भारताच्या बहुविध भागांत, विशेषत: शहरी भागांत स्थिरावले. दिल्ली व आजूबाजूचा प्रदेश, मध्यभारत, गुजरात अशा विविध भागांत ते गेले. फाळणीनंतरही ही प्रक्रिया पुढे दोन वर्षे चालू होती. संत व गुरू साधू वासवानी यांनी पाकिस्तानातील हैदराबाद शहरातील आपले वास्तव्य लगेचच भारतात हलवले नाही. पुढे 1948 च्या नोव्हेंबरमध्ये साधू वासवानी जड अंत:करणाने मुंबईत आले. ते आपल्या सहका-यांना म्हणाले, ‘माझे शरीर हे श्रेष्ठ आणि महान भारताचा एक भाग आहे. माझे मन मात्र कोणा एकाच राष्टÑाशी जोडले नाही. माझे हृदय हे वैश्विक चैतन्याच्या एक भाग आहे.’ 1949 च्या फेब्रुवारी महिन्यात साधू वासवानी आपल्या भक्तांसह पुण्यात आले. त्यांचे एक निष्ठावान भक्त भाई फुलचंद उत्तमचंदानी यांनी साधू वासवानींसाठी पद्मजी पार्क-पांडे कॉटेजमध्ये जागा भाड्याने घेऊन ठेवली होती. अशा रीतीने सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर हे आता सिंधी समाजाचेही सांस्कृतिक केंद्र बनले. मुंबई-पुण्याप्रमाणेच कल्याण, उल्हासनगर, पिंपरी, अहमदनगर अशा महाराष्टÑातील इतर शहरांत हा समाज समुदायाने गेला. आपली जिद्द, श्रम करण्याची वृत्ती, नव्या परिस्थितीशी जुळते घेण्याची मानसिक तयारी यांतून तो समाज स्थिर होत गेला. आता येथे जंगम मालमत्ता काहीच नव्हती, त्यामुळे या समाजाने व्यापार-उदीम क्षेत्र जवळ केले. महाराष्टÑाचे आणि सिंध प्रांतातील सिंधी समाजाचे हे अनुबंध अशा रीतीने गेल्या 65 वर्षांचे आहेत. आता सिंधी समाज हा महाराष्टÑाचा आणि भारताचाही अविभाज्य भाग आहे आणि सिंधी समाजाची संस्कृती ही भारतीय संस्कृतीचाच भाग आहे. 1983 मध्ये सिंधी समाजाच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सिंधी समाजाच्या बौद्धिक क्षमतेचे, नवीन नवीन काही करण्याच्या वृत्तीचे आणि आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीचे कौतुक केले होते. खूप पूर्वीच म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातच सिंधी समाजाचे व्यापारीकेंद्र युरोपातील काही शहरांत राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्यात अचानक स्थलांतराला सामोरे जावे लागणे आणि त्या शोकांतिकेतून प्रगतीच्या वाटा शोधणे, आपली व आपल्या समाजाची प्रगती करून घेणे, हे सिंधी समाजाला कसे जमले असेल? या त्यांच्या नाट्यमय प्रवासाचे आणि त्यांच्या यशाचे कोणते कारण असू शकेल? के. आर. मलकानी यांनी ‘दि सिंध स्टोरी’ या पुस्तकात त्याचे उत्तर दिले आहे. ते म्हणतात, दुस-या जागतिक महायुद्धाच्या पराभवानंतर व अणुसंहारात बेचिराख झालेल्या जपान, जर्मनी या राष्टÑांतील लोकांशी स्थलांतरित सिंधी समाजाची तुलना केली, तर याचे उत्तर सापडेल.
जपान-जर्मनीच्या लोकांजवळ असणारी मन:शक्ती आणि इच्छाशक्ती आणि सिंधी समाजाची इच्छाशक्ती फार वेगळी नाही. माणसे राखेतून सोने बनवू शकतात, हाच याचा अर्थ आहे. स्थिर होणे, पैसे मिळवणे आणि धर्मादाय काम करणे, शैक्षणिक संस्था उभ्या करणे याकडे या समाजाने लक्ष दिले आहे. यासाठी शासकीय मदतीचा आग्रह त्यांनी धरला नाही. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार या भावनेने ते कार्यरत राहिले. अशा सिंधी समाजाचा आणि संस्कृतीचा अभ्यास हा मानवशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील लेखांतून आपण त्याविषयी अधिक जाणून घेऊया.
arunjakhade@padmagandha.com