आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर पॉल नर्स 'रॉयल' वैज्ञानिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन येथील रॉयल सोसायटी ही 350 वर्षांची जुनी संस्था. सर ख्रिस्तोफर रेन, सर आयझॅक न्यूटन, अर्नेस्ट रुदरफर्ड असे वैज्ञानिक या संस्थेचे अध्यक्ष होते. ब्रिटिश सरकारच्या वैज्ञानिक धोरणावर प्रभाव असलेली ही संस्था. आज 64 वर्षांचे सर पॉल नर्स या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

ते जनेटिसिस्ट (जनुक वैज्ञानिक) तसेच सेल बायोलॉजिस्ट (पेशींचे जैववैज्ञानिक) आहेत. एक पेशी दुभंगते आणि दोन पेशी तयार होतात. पेशींच्या जीवनाचे चक्र असते. या नैसर्गिक घडामोडींचे नियंत्रण करणारे प्रथिनांचे रेणू पेशीत असतात. या प्रथिनांच्या रेणूचा शोध सर पॉल नर्स यांनी लावला. पेशींवरील पुढच्या संशोधनाचा पाया घालणारे हे संशोधन. या संशोधनाबद्दल 2001 चे वैद्यक नोबेल सर पॉल नर्स यांना देण्यात आले. त्यांच्याबद्दलची माहिती प्रेरणादायी आहे.

एक तरुणी अनौरस मुलाला जन्म देण्यासाठी लंडनहून नॉरिचला आली. नातेवाइकांमध्ये राहिली. तिने एका अनौरस मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव पॉल नर्स. पॉलच्या आजीने त्याच्या आईची भूमिका बजावली. पॉलची आई जीवनभर त्याची मोठी बहीण म्हणून जगली. साल 1957. पानझडीचे दिवस. रात्रीची वेळ. सुईच्या अग्राएवढा प्रकाशाचा ठिपका आकाशातून चालला होता. हे दृश्य पाहण्यासाठी पायजमा घातलेला आठ वर्षांचा एक ब्रिटिश मुलगा घरातून धावत बाहेर आला. प्रकाशाचा तो ठिपका म्हणजे रशियाने सोडलेला ‘स्पुटनिक’ उपग्रह होता. या प्रसंगाने त्या मुलाच्या मेंदूत विज्ञानाची ठिणगी पडली. पुढे विज्ञानच शिकायचे, असे त्याने ठरवले. तो मुलगा हा पॉल नर्स.

पॉल नर्स शिकत असताना विज्ञानातील संशोधनावर केंब्रिज-क्सफर्डचा प्रभाव होता. नोबेल विजेत्यांची मालिका केंब्रिज-क्सफर्डमध्ये तयार होत होती. विज्ञान शिकण्यासाठी, संशोधनासाठी तरुणांची धाव ‘क्सब्रिज’कडे होती. पण पॉल नर्स यांनी र्बमिंगहॅम व ईस्ट अँग्लिया विद्यापीठातून विज्ञानात ‘पीएचडी’ मिळवली व मौलिक संशोधन केले. आजही लंडनच्या ‘कॅन्सर रिसर्च लॅब’मध्ये त्यांचे संशोधन सुरू आहे.

रॉयल सोसायटी ही विज्ञानातील जगभरातील एक अग्रगण्य संस्था. ज्या वैज्ञानिकाला या संस्थेचा ‘फेलो’ होण्याचा मान मिळतो, तो स्वत:ला धन्य समजतो. रॉयल सोसायटीच्या सदस्यांनी गेली 350 वर्षे अथक परिश्रमांनी परंपरा, प्रतिष्ठा व नावलौकिक कमावला आहे. म्हणून तर या संस्थेची प्रभा जगभर फाकलेली दिसते. रॉबर्ट हुक हा रॉयल सोसायटीचा एक संस्थापक. ‘मायक्रोस्कोपी’ (सूक्ष्मदर्शकी) या विज्ञान-तंत्रज्ञान शाखेचा हा मूळ पुरुष. ‘सेल’ हा शब्द 1865 मध्ये रॉबर्ट हुकनी तयार केला. सजीवांचा मूळ एकक म्हणजे ‘सेल’ ही संकल्पना रॉबर्ट हुकनी दृढ केली. तेव्हा या ‘सेल’वर संशोधन करणारे सर पॉल नर्स यांना रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद मिळणे हे उचितच आहे. रॉयल सोसायटीची वैज्ञानिक जबाबदारी पार पाडण्यास ते समर्थ आहेत. विज्ञानाच्या तर्कशुद्ध भूमिकेचे समर्थन करण्यासाठी, ज्यातून काही उत्तम निर्माण होईल, असा वाद सरकारशी, राजकारण्यांशी घालण्यास ते सदैव तयार असतात.

फ्रान्सिस क्रिक (1916-2004) यांना डीएनएच्या रचनेचा शोध लावल्याबद्दल नोबेल मिळाले. हे संशोधन त्यांनी केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत केले. पुढील संशोधनासाठी ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाले. पण इंग्लंड त्यांच्या या नोबेल पुत्राला विसरलेले नाही. 700 मिलियन पौंड खर्चून ‘क्रिक बायोमेडिकल इन्स्टिट्यूट’ लंडन येथील किंग्ज क्रॉस भागात उभी राहत आहे. 2015 मध्ये त्याचं उद्घाटन होईल. या संशोधन संस्थेचे प्रमुख कार्यकारी संचालक म्हणून सर पॉल नर्स यांची नियुक्ती झाली आहे. ‘तरुण मने जास्त निर्मितिक्षम असतात. म्हणून या उमलत्या संशोधकांसाठी ही क्रिक संशोधन संस्था आहे,’ असे सर पॉल नर्स यांनी घोषित केले आहे. मूलभूत संशोधनाचा अनुवाद उपयोजित संशोधनात व्हावा, यासाठी जगभरातील संशोधकांना या संस्थेचे दरवाजे खुले असतील. संशोधनाचेही एक समाजविज्ञान असते, त्याला एक सामाजिक कोन असतो.

या सर्वांची गांभीर्याने तपासणी करण्यासाठी हा काळ योग्य आहे. संशोधनासाठी नवीन नियमावलीची गरज आहे. त्याकरिता सर पॉल नर्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिक संस्था सज्ज होत आहे. ‘ब्रिटिशांकडे संशोधनाची उत्तम क्षमता आहे. योग्य सुविधा व आर्थिक पाठबळ मिळालं तर जागतिक संशोधनाचं नेतृत्व आम्ही करू,’ असा सर पॉल यांचा आशावाद आहे.