आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवचिकता वाढविणारे स्केटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अापले शरीर लवचिक राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच एक खेळ म्हणजे स्केटिंग. मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच स्केटिंगचे अाकर्षण असते. पायाला चाकं लावून भन्नाट वेगाने पुढे जाणे असे त्यांना वाटत असते. पण, त्याचेही एक शास्त्र अाहे, काही नियम अाहेत हे त्यांना माहिती नसते. रोलर स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे. यामध्ये मान, हात, पाय लवचिक होतात. त्यामुळे शरीराचा सर्वांग व्यायाम होतो.

स्केटिंगचा खेळाडू हा ताशी ३० किलोमीटरच्या वेगाने सराव करत असतो. त्यामुळे एका तासात त्याच्या शरीरातील सहाशे कॅलरीज कमी होतात, फॅट कमी होतात. ३० मिनिटे स्केटिंग केल्यास हृदयाच्या ठोक्याचा दर एका मिनिटाला १४८ एवढा होतो. शरीरातील सर्व स्नायू बळकट होतात, शक्ती वाढते. धावण्यापेक्षा स्केटिंग केल्यास शरीराच्या हाडातील जाइंट‌्सवरील ताण कमी होतो. नियमित सरावामुळे गुडघे व पायाची हाडे मजबूत होतात. पोटाचा व पाठीचाही व्यायाम होतो. स्केटिंग सराव करणाऱ्याचा दिवस आनंदित व चेतनाक्षम राहतो. संधिवात तसेच अन्य आजार असलेला व्यक्तीही स्केटिंगमुळे निरोगी व प्रफुल्लित होतो. लहान मुलांबरोबरच वयोवृद्ध हा खेळ खेळू शकतो. हा खेळ खेळण्यास अगदी सोपा आहे. त्यामुळे लोकप्रिय आहे. स्केटर्स हा लांबचा पल्ला कमी वेळात गाठू शकतो. चढ किंवा उतार अगदी व्यवस्थित तोल सांभाळून पार करू शकतो.

स्केटिंगचे प्रकार
रिंग, स्पीड, आर्टिस्टिक, फिगर स्केटिंग असे प्रकार या खेळात आहेत. रोलर स्केटिंगमध्ये आइस स्केटिंग, आइस हॉकी, आइस फिंगर, आइस स्किलिंग, आइस स्केट बोर्ड, रोलर हॉकी, रोलर स्केटिंग, रिंग स्केट, इन लाइन स्केटिंग, इन लाइन हॉकी असे प्रकार समाविष्ट आहेत. आर्टिस्टिक म्हणजे संगीताच्या तालबद्ध ठेक्यावर उड्या मारणे, उलट-सुलट फिरकी घेणे. फिगर स्केटिंग म्हणजे संगीताच्या तालावर जोडीने जिम्नॅस्टिकची कौशल्ये दाखविणारा चित्तथरारक प्रकार आहे.

सरावाच्या टीप्स : स्केटिंगच्या सरावासाठी दोनशे मीटरचा ट्रॅक लागतो. सरावाअगोदार फिटनेससाठी योगा, लेग स्टेचिंग, स्कीपिंग असे तणावमुक्त व्यायाम करावेत. स्केटिंगच्या स्टेप्स व्यवस्थित न केल्यास शरीराच्या मणक्यास इजा होण्याची शक्यता आहे. स्केटिंगची गती वाढविण्यासाठी हाताची व पायाची हालचाल योग्य करावी. त्यासाठी आत्मविश्वास व चपळता या बाबी अंगीकारल्या पाहिजेत. हा सराव करताना हेल्मेट घालणे अत्यावश्यक आहे. आहारात सर्वप्रकारची फळे किंवा फळाचा रस सरावादरम्यान अथवा सरावानंतर घ्यावा. आहारात सलाडही असावे.

केदार बदामीकर, सोलापूर
(लेखक स्केटिंगचे प्रशिक्षक आहेत.)
शब्दांकन : अजित संगवे)
बातम्या आणखी आहेत...