आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट मुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही गोष्ट तुम्हाला सांगताना मला खूप त्रास होतोय आणि बरंही वाटतंय म्हणूनच ती तुम्हाला सांगितली पाहिजे.
जिल्ह्यातल्या एका नामवंत शाळेत सकाळी 9 वाजता माझा कार्यक्रम होता. पण संस्थेचे अध्यक्ष उशिरा आल्याने हा कार्यक्रम 11 वाजता सुरू झाला. अध्यक्ष उशिरा आले असले तरी मुले मात्र वेळेच्या आधीच आली होती (आणि नसती आली तर त्यांची धुलाईच झाली असती) व मैदानात (नाइलाजाने) शांत बसली होती. सगळी मुले शाळेच्या गणवेशात होती. म्हणजे निळी पँट, पांढरा शर्ट व त्यावर लाल टाय.


कार्यक्रम 11 वाजता सुरू झाला तेव्हा ऊन चांगलंच तापायला लागलं होतं. मग त्यानंतर एक तास अहवाल वाचन, अध्यक्ष स्तुतीचे फवारे. स्टेजवर आम्ही सर्व सावलीत बसलो होतो. माझ्या बाजूला ते अध्यक्ष बसले होते. डोक्यावरची टोपी हातात घेऊन ते वारा घेत होते.


(बिचारी) मुले सकाळी 8 वाजल्यापासूनच मैदानात बसली होती. उन्हाने मुले कावली होती. त्यांचा तहानेने घसा सुकला होता. गळ्यात टाय घातल्याने त्यांचे गळे आवळले गेले होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. डोक्यावर, पाठीवर उन्हाचे चटचटीत चटके बसत होते. बसून-बसून त्यांचे पाय आखडले होते. काही मुले टायनीच घाम पुसत होती. काही मुले ‘पाणी द्या... पाणी द्या...’ अशा खुणा शिक्षकांना करत होती. पण मुलांनी गप्प बसावे व शिस्तीत बसावे म्हणून शिक्षक हातात छड्या घेऊन मुलांच्या रांगांमधून फिरत होते. मुलांनी पाणी मागताच त्यांच्यावर छडी उगारून त्याना दटावत होते. तरीसुद्धा दबक्या आवाजात मुलांचा कलकलाट सुरू होता. सकाळी 8 वाजल्यापासून सतत उन्हात फे-या मारून, मुलांवर वसावसा ओरडून शिक्षकांचे पण घसे सुकले होते. तेही चिडचिडले होते. आम्हा स्टेजवर सावलीत बसलेल्या मंडळींना थंडगार लिंबू सरबत दिलं गेलं.


अध्यक्ष आरामात थंडगार लिंबू सरबत पिऊ लागले. समोर मुले उन्हाने भाजून निघत असताना त्यांच्यासमोर सावलीत बसून थंडगार सरबत पिणे मला शक्य नव्हते. मुलांच्या गळ्याला टाय आवळलेला असल्याने थोड्याच वेळात ही मुले आता उन्हात शिजू लागतील असं मला वाटू लागलं. मी त्या अध्यक्षांना विचारलं, ‘अहो, इथे इतका भयानक उकाडा असताना मुलांनी टाय का घातले आहेत?’


‘अहो, आमची शाळा ग्रामीण भागात आहे पण मुले काही बावळट नाहीत. टाय घातला की मुले कशी स्मार्ट दिसतात पाहा.’ अध्यक्षांचं हे बोलणं ऐकून मी सरबतापेक्षा थंड झालो.
आता त्या थकलेल्या, तहानलेल्या आणि उन्हाने कावलेल्या मुलांसमोर मला भाषण करायचे होते. आधीच उशीर झालेला असल्याने मी फक्त 5 मिनिटंच बोलीन असं त्यांना सांगितलं होतं. ‘तुम्ही सगळी मुलं स्मार्ट आहात... कारण तुम्ही टाय घातला आहे. आणि सगळ्या स्मार्ट मुलांना वाटतं की आपले शिक्षक पण स्मार्ट असावेत. आपले अध्यक्ष पण स्मार्ट असावेत. पण छे! यापैकी कुणीच टाय लावलेला नाही. आणि मी तर कधीच टाय लावत नाही.’
‘पण मला सांगा, आपला स्मार्टपणा कशाशी संबंधित आहे. आपल्या टायशी की आपल्या वागण्याशी?’
मुले आनंदाने ओरडली, ‘वागण्याशी.’
मग मी भाषण-बिषण न करता सकारात्मक विचार करण्याच्या पद्धती या विषयावर मुलांशी मस्त गप्पा मारल्या. त्यांना गोष्ट सांगितली.
माझ्यानंतर ते अध्यक्ष बोलायला उठले. क्षणभर माझ्याकडे पाहून म्हणाले, ‘माझ्या उशिरा येण्यामुळे मुलांना उन्हात बसायची शिक्षा झाली याचं मला वाईट वाटतं. आजपासून मी दोन गोष्टींत सुधारणा करणार आहे. एक, कार्यक्रमाची वेळ पाळणार आहे. आणि दुसरी गोष्ट...’
त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मुलांनी टाय सैल करून कडकडून टाळ्या वाजवल्या. टोपीने डोळ्यांच्या कडा हळूच टिपत अध्यक्ष जागेवर बसले. आभार प्रदर्शन करणारा मुलगा म्हणाला, ‘मला सांगताना आनंद होतो की, आता आपण सारेच स्मार्ट आहोत.’
‘सूट-बूट घालून जर अक्कल आली असती तर कशाला कुणी शाळा काढली असती?’ ही चिनी म्हण म्हणूनच महत्त्वाची आहे.