आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतःच स्वतःची माफी मागावी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही गोष्टींमध्ये आपण चुकल्याचं स्वतःलाच नंतर कधीतरी जाणवतं. त्यातून आपण स्वतःलाच माफ करत स्वतःला बरोबर करत जायचं. बर्‍याच वेळा कुणाला सांगावेत असेही प्रसंग नसतात; पण आपलं आपल्याला पक्कं कळलेलं असतं.

समुपदेशक म्हणून मला बर्‍याच जणांच्या बर्‍याच गोष्टी मला ऐकून घ्याव्या लागतात. समोर आलेल्यांचं ऐकणं, त्यांची बाजू तटस्थपणे समजून घेणं, हेच आमचं काम असतं. त्यावरूनच कशा पद्धतीनं समुपदेशन करता येईल, हे आम्हाला पाहावं लागतं. पण कन्फेशनच्या बाबतीत सांगायचं, तर मला माझ्याकडे आलेली एक केस आठवते. ती केस माझ्याकडे आली आणि नंतर त्या जोडप्याचा घटस्फोट झाला. खरं तर कुटुंब मोडणं यापेक्षा ती कशी जोडली जातील, जुळतील, हाच आमचा कायम प्रयत्न असतो.

त्या केसमध्ये घटस्फोट झाला खरा; पण तो व्हायला नको होता, असं आज मला वाटतं. आपण जेव्हा एखादी बाजू ऐकतो, तेव्हा तीच बाजू बरोबर आहे, खरी आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. तसंच या केसमध्येही झालं. या केसमध्ये मुलाने सगळी वस्तुस्थिती सांगितली; पण दुसरी बाजू काय, हे सांगायला मुलगी माझ्याकडे आलीच नाही. संमतीनं घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि फक्त मुलानं मला त्याची बाजू सांगितली होती. खरंच या माणसाचंच बरोबर आहे, असं मला वाटलं. शिवाय त्या मुलीला बोलवूनही ती त्या वेळी आली नाही. त्यामुळं मी त्या मुलाचीच बाजू योग्य मानत न्यायालयात, ‘हा घटस्फोट व्हायला हरकत नाही’, असा माझा शेरा पाठवून दिला. मग नंतर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू राहिली. नंतरच्या प्रक्रियेत ती मुलगी माझ्याकडे आली. त्यांना एक मूलही होतं. तो मुलगा आई-वडिलांच्या प्रेमाअभावी खूप मलूल झाला होता. घटस्फोट झाल्यानंतर त्याची वडिलांशी भेटच होत नव्हती. वडिलांचं प्रेमच त्याला मिळत नव्हतं. घटस्फोट झाल्यानंतरही ती मुलगी माझ्याकडे यायची. सोबत तिचा मुलगाही असायचा. मला त्या दोघांकडे पाहून वाटायचं की, हा घटस्फोट मी टाळू शकले असते. माझी चूक झाली, असं मला कधी कधी वाटायचं. दोन्ही बाजू समजून घेऊन त्याच वेळेला त्यांना योग्य समुपदेशन करायला हवं होतं, असं वाटायला लागलं.

मग त्या मुलीला मी समजावलं, तू एकटी राहू नकोस. दुसर्‍या लग्नासाठी प्रयत्न कर. ती सुरुवातीला तयार होत नव्हती; पण तिचं समुपदेशन करून तिला त्यासाठी तयार केलं. तिचं लग्नंही झालं. आता ती व्यवस्थित राहते आहे. तिच्या मुलाला स्वीकारणारा नवराही तिला मिळाला आहे. हे जेव्हा मला कळलं, तेव्हा आपण त्यांच्या बाबतीत चूक केल्याची बोचणी थोडी कमी झाली. ही गोष्ट मी कधीही कुणाला बोलून दाखवली नाही. त्या वेळी माझा रिपोर्ट न्यायालयात तसा गेला नसता, तर कदाचित त्यांचा घटस्फोट झाला नसता; पण ती चूक माझ्याकडून झाली. माझं समुपदेशन थोडं अपुरं पडलं; पण जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी ती चूक अशा पद्धतीनं सुधारण्याचा प्रयत्न केला.

लहानपणीचा एक प्रसंग आहे. एका समारंभासाठी आम्ही गेलो होतो. मी तिसरी-चौथीत असेन तेव्हा. आमची आर्थिक परिस्थिती तेव्हा बेताची होती. मला त्या लग्नसमारंभाला जाण्यासाठी खड्यांचे कानातले घ्यायचे होते. मी आईला तसं बोललेही होते; पण आई म्हणाली, ‘आत्ता पैसे नाहीत आपण तुला नंतर घेऊयात.' जेव्हा आम्ही त्या लग्नसमारंभात गेलो, तेव्हा एका खोलीत एकीनं कपडे बदलताना कानातलं काढून ठेवलं होतं. ते छान हिरव्या खड्यांचं, चमचमणारं होतं. मला ते खूप आवडलं होतं. ते पाहून मला खूप मोह झाला, ते कानातलं मी घेतलं आणि खिशात ठेवून दिलं. नंतर मग जेव्हा कपडे बदलायला लोक त्या खोलीत आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ते हिरवं कानातलं कुठंतरी गेलं म्हणून. ते शोधाशोध करायला लागले. कुणी घेतलंय का, ते विचारलं. मलाही विचारलं, पण मी काही बोललेच नाही. माझ्या आईलाही विचारलं, की बघा तुमच्या मुलीनं घेतलंय का ते विचारा. पण माझी आई त्यावर त्यांना म्हणाली, ‘माझी मुलगी तसं काही करणारच नाही. ती मला विचारल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला हात लावणारच नाही. तिच्यावर संस्कार खूप चांगले आहेत.' आईनं असं म्हटल्यावर मला रडू यायला लागलं; पण तरीही मी काही बोलले नाही. कारण ते माझ्याकडे आहेत, असं सांगितलं असतं, तर सगळे लोक आईलाच बोलले असते. मग मी बाहेर गेले आणि ते कानातले फेकून दिले आणि त्याबद्दल कुणाशीच काही बोलले नाही. पण आज या निमित्तानं मी माझी चूक कबूल करते, "आई मी खरंच चुकले होते. तुझ्या संस्कारांपेक्षा मी माझ्या मोहाला बळी पडले होते.' हा प्रसंग खूप मनात राहिला आणि परत अशी चूक करायची नाही, हे ठरवलं. आईचं आणि माझं नातं नंतर खूप मोकळं झालं तरीही आईला आजपर्यंत मी ही गोष्ट सांगितली नाही. आज मला वाटतं की, मी तेव्हा तसं वागायला नको होतं.

माझा स्वभाव आणि आईचा स्वभाव खूप मिळताजुळता आहे. कुणाला दुखवायचं नाही, स्वभावातली मृदूता माझ्यात तिच्यामुळंच आली. प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असतो, कुणाशी ओरडून बोलायचं नाही, हे संस्कार माझ्यावर आईनंच केले. त्याचा फायदा कसा होतो, हे आईच आम्हाला दाखवून द्यायची. "बघा, मी त्या वेळी बोलले असते किंवा चिडले असते, तर काय झालं असतं आज...' असं सांगायची, त्यामुळं ते पटायचं. त्यामुळं हीच एक सवय लागत गेली. त्याचा फायदा मला समुपदेशन करताना होतो. खूप लोकांशी संपर्क येतो. अनेकदा लोक उलटही बोलतात, तुम्ही एकाचीच बाजू घेताय... असंही म्हणतात.

स्वतःच्याच मन:स्तापात असल्यानं काही लोक आधीच खूप चिडलेले असतात. लोक येणार... चिडचिड करणार... हे सुरूच असतं कायम. आपण त्यांना सांगितलं की, ‘तुम्ही लग्न मोडू नका. एकत्र राहा...' तर त्यावर ‘तुम्हाला काय होतंय बोलायला... ज्याचं जळतं त्याला कळतं.' असंही बोलतात. असं बरंच वेगवेगळ्या प्रकारचं ऐकून घ्यावं लागतं. पण त्या वेळी आपण शांत राहिलं की, त्यांच्यावरही तो परिणाम होतो आणि तेही शांत होतात. आपण शांत राहिलं की, आपल्या तोंडातून काही चुकीचे शब्द उच्चारले जात नाहीत. या शांत राहण्यामुळंच कुणाला दुखावल्याचे प्रसंग माझ्याजवळ नाहीत. त्यामुळे थेट माफी मागण्याचीही वेळ फारशी आली नाही. पण काही गोष्टींमध्ये आपण चुकल्याचं स्वतःलाच नंतर कधीतरी जाणवतं. त्यातून आपण स्वतःलाच माफ करत स्वतःला बरोबर करत जायचं. बर्‍याच वेळा कुणाला सांगावेत असेही प्रसंग नसतात; पण आपलं आपल्याला पक्कं कळलेलं असतं, आपण कुठं कमी पडलो... काय चुकलं... अशा वेळी स्वतःच स्वतःपाशी चूक कबूल करून पुन्हा तशी गोष्ट आपल्या हातून होणार नाही, हे मी पाहते.

- स्मिता जोशी
(स्मिता जोशी या प्रसिद्ध समुपदेशक असून कुटुंब न्यायालय, पुणे येथे समुपदेशनाचं काम करतात. ‘अर्थ नात्यांचा' हे त्यांचे समुपदेशावरील पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.)
शब्दांकन : अभिजित सोनवणे
abhi.pratibimb@gmail.com