आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्‍या वाटेवरचा कथानुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी मनाचा कधीही न प्रकाशात आलेला कोपरा उजळवून टाकते, ती खरी कथा. चित्र-दृश्यांपलीकडचा अवकाश शब्दांत पकडण्याची, नव्या वाटेवर चालत नवा प्रदेश धुंडाळण्याची अशी ताकद आणि क्षमता प्रकाश जोशींच्या कथांतून प्रकटते. या कथा अद्भुताचा अनुभव देऊन जातात..

कोणतेही पुस्तक असो वा त्यातली एखादी गोष्ट; त्यातील संदर्भ, व्यक्तिरेखा किंवा ठिकाणे हे सारे घटक लेखकाचे मनोगत साकारत असतात. गोष्टींच्या रचनेमध्ये पुढे काय होईल किंवा काय असेल, याचा अंदाज वाचक सहजपणे बांधू शकतो. पण प्रकाश बाळ जोशी यांचा ‘प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा’ या नावाचा कथासंग्रह उपरोल्लेखित विधानाला अपवाद आहे. या संग्रहातील कथा वाचकाला कोड्यात टाकल्याशिवाय राहात नाहीत. कथानकात पुढे काय होईल आणि व्यक्तिरेखांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय, याचा अजिबात थांग लागू न देणारा कथासंग्रह म्हणजे, मराठी वाङ्मयाला लाभलेलं एक आगळंवेगळं वरदानच आहे.
 
१९७३ पासून ते अगदी आत्तापर्यंतच्या काळातल्या, म्हणजे २०१०पर्यंतच्या कथांचा हा व्यापक विस्तार असला, तरी कोणतीही व्यक्तिरेखा कोणत्याही काळात चपखल बसणारी आहे. बऱ्याचशा व्यक्तिरेखांना नावे नसली तरीही त्या आपल्याला ओळखीच्या वाटतात. त्यांच्या मनात येणारे विचार आपल्यालाही विचारप्रवृत्त करतात. शिवाय ती व्यक्तिरेखा आपणही असू शकतो किंवा आपल्याला ती कधी न कधी, कुठे न कुठे तरी भेटलेलीसुद्धा असू शकते. व्यक्तिरेखांच्या मनात क्षणाक्षणाला येणारे विचार हे  किती वेगाने बदलत असतात, याचं प्रत्यंतर प्रकाश बाळ जोशीच देऊ शकतात. किंबहुना त्यामुळेच मानवी मन हा संशोधनाचा विषय कसा होऊ शकतो, हेही पुस्तक वाचताना प्रत्ययास येते. इतकंच नव्हे, तर प्रकाश बाळ जोशींइतकी विचारक्षमतेची उंची आपण गाठू शकणारच नाही, असेही वाटते. उदाहरण द्यायचे झाले तर ‘चिवफड’ गोष्टीतली ‘शिरू’ ही व्यक्तिरेखा. त्यांना काय होत आहे, त्यांचं वय काय आहे, याचा स्पष्ट शब्दांत कोठेही उल्लेख नाही. पण ती व्यक्ती नक्कीच वयोवृद्ध आणि अंथरुणाला खिळलेली असेल, असे वाटते. त्यातही त्या व्यक्तीला कदाचित स्किझोफ्रेनिया किंवा अल्झायमर असणार, किंवा म्हातारपणामुळे मेंदूला रक्तपुरवठा नसल्यावर मनातले विचार क्षणाक्षणाला भूत, वर्तमान आणि भविष्यकाळात भरकटत असणार, याचाच अचूक अंदाज प्रकाश बाळ जोशींनी सहजपणे बांधलेला आहे.
 
या व्यतिरिक्त, लेखक या नात्याने प्रकाश बाळ जोशी लेखनाच्या पातळीवर धाडसी प्रयोगही करतात. यात अशा अनेक कथा आहेत की, ज्यांना सुरुवात किंवा अंत नाहीये. वातावरण निर्मिती तर दूरचीच बाब. त्यांच्या कथा एखाद्या घटनेपासून सुरू होतात आणि शेवट अर्धवट न सोडता वाचकाला चिंतन-मननाचा विषय देऊन जातात. काही कथांच्या नावाची निर्मितीसुद्धा आगळी आहे. एकाच वेळेला बघताना बोलणारी आणि बोलताना बघणारी माणसं याच्या मिश्रणाने तयार झालेलं “बोलबघ’ हे एका कथेचं नाव आहे. तर चिमण्यांचा होणारा चिवचिवाट आणि त्यांच्या पंखांची होणारी फडफड, यांच्या मिश्रणाने तयार झालेलं अजून एक नाव म्हणजे, “चिवफड’.  लेखकाने कथांच्या संवादाची रचनासुद्धा अशा प्रकारे केलेली आहे, की संवाद कोण बोलतंय, हे न लिहितासुद्धा वाचकाला कळल्याशिवाय राहात नाही. कथेतला कोणी एक “तो’ बोलतोय की ‘ती’ बोलतेय, की पुढचे वाक्य कुणाच्या मनातील आहे, हेही समजतं. ‘हातात हात’मधल्या म्हातारीच्या हाताची आणि प्रेयसीच्या हाताची तुलना करताना, त्या म्हातारीशी झालेले संवाद आणि प्रेयसीची आठवण येणारे विचार, त्याचबरोबर आपला बॉस काय म्हणेल, याचे विचार, हे एका खालोखाल असले तरी सगळ्यांमधला फरक दृश्य स्वरूपात न दिसता तो वाचताना जाणवतो.
 
‘मैत्रिणीची गोष्ट’मध्ये तरुण मुलामुलींचे विश्व तयार केलेलं आहे, तरी आजची तरुण पिढी आत्मविश्वासाने, पारंपरिकरीत्या चालत आलेल्या काऊ-चिऊच्या गोष्टीलासुद्धा कलाटणी देऊ शकते, हा या कथेचा एक भाग आहे. खरं तर कलाटणी प्रकाश जोशींनीच दिलेली असते. आजच्या तरुण पिढीचे विचार असे असतात हे त्यांनी जाणून घेतलंय, असंही दिसून येतं. त्यांच्या कथांना ठिकाणाचंही बंधन नाहीये. काल्पनिक जरी असलं तरी असं वाटतं की, ते ठिकाण आपल्या जवळचंही असू शकतं, सातासमुद्रापलीकडलंसुद्धा असू शकतं किंवा स्वप्नातलंसुद्धा.
 
‘वडील आणि मुलाखत’, ही एका कायमस्वरूपी हॉस्टेलवर राहिलेल्या मुलाची कथा आहे. उच्च अधिकारी पदावर पोहोचलेल्या वडिलांविषयी विशेष माहिती तो मुलगा देऊ शकत नाही, कारण वडिलांकडे आपल्या मुलासाठी नसलेला वेळ, त्यामुळे त्या मुलाच्या मनातली घालमेल, ही बाब  फक्त त्याच्या वावरण्यातून किंवा कृतींमधून दिसून येते. गोष्ट वाचून झाल्यावर मन सुन्न झाल्यावाचून राहात नाही. लेखक नावाजलेले चित्रकार आहेत. चित्रकाराच्या या कथा रोजच्या जीवनातल्या विविध छटा उमटवून माणसाचं सुरेख चित्र रेखाटतात. मग ते ‘तिच्या मुंग्यांची रांगच रांग’मधले प्रेत नेण्याचे दृश्य असो किंवा पाणथळ रानाचं असो. ‘हात हातात’मधल्या बेफाम वाहणाऱ्या आवाहनांचे असो किंवा ‘त्याचा दुसरा चश्मा’मधल्या ऑफिसचं खेळकर वातावरण असो.
 
कथासंग्रहातील कथा कोठेही न भरकटता विशिष्ट उंची गाठते. वरून साधी दिसणारी ही कथा प्रसंगी एखादा गहन विषयही मांडून जाते. भावना आणि वास्तवाचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यातून व्यक्तिरेखेची निर्माण होणारी मानसिकता मोजक्याच शब्दांत मांडण्यात लेखक यशस्वी होतोच, पण त्यातून अनेक सामाजिक प्रश्नही आपल्या पुढ्यात उभे ठाकतात. सामान्यांतला सामान्य माणूसही असामान्य असतो, ही बाब बऱ्याचशा कथांमधून विस्तारित होते. ‘त्याचा दुसरा चश्मा’मधला नाव नसलेला, कोणी एक “तो’ जरी अबोल, भिडस्त आणि बुजरा असला, तरी लोकांनी आपल्या नव्या चश्म्याला दाद द्यावी, चौकशी करावी, असं त्याला मनापासून वाटत असतं. लोकांनी चौकशी केल्यावर मिळालेला आत्मिक आनंद आणि त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास आपल्याला खूप काही सांगून जातो. एकूणच, वाचक-समीक्षकांची दाद लाभलेल्या या कथासंग्रहाला शासनाचा २०१५चा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार लाभलेला आहे. विचार करायला लावणाऱ्या या वेगळ्या वळणाने जाणाऱ्या कथा आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...