आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smita Kelkar About Education Corner, Divya Education,

एज्यु कॉर्नर: गरज घोकंपट्टीच्या चौकटीतून बाहेर पडण्याची...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मेडिकलमध्ये टॉप आलेल्या विद्यार्थ्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सिलेक्शनसाठी बोलावण्यात आले. सर्वांना एका हॉलमध्ये बसवून त्यांच्यासमोर शस्त्रक्रियेकरिता लागणारे सर्व साहित्य ठेवण्यात आले आणि त्या साहित्यांपैकी शस्त्रक्रियेकरिता न लागणारे साहित्य झटकन ओळखून दाखवण्यास सांगितले गेले. त्या सर्वांपैकी टॉप आलेला मुलगा पटकन उत्तर देईल, असे सर्वांना वाटले, परंतु त्यांच्यापैकी सर्वांत कमी टक्के मिळवलेल्या मुलाने ती कात्री ओळखून दाखवली जी शस्त्रक्रियेकरिता न वापरता रोजच्या कामासाठी वापरली जाते.'
टॉप आलेला विद्यार्थी कात्री ओळखू शकला नाही याला कारणीभूत होते ते त्याचे संकुचित ज्ञान. त्याने केलेला अभ्यास हा परीक्षेपुरता होता. चौकटीच्या बाहेर जाऊन जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा त्यानी प्रयत्नच केला नाही. याउलट दुसर्‍या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण कमी असतील पण त्याने त्या परीक्षेतून, अभ्यासातून अनमोल असे ज्ञान मिळवले, जे त्याला त्याच्या भावी आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणार आहे. आजचा तरुणवर्ग हा पुस्तकीकिडा बनला आहे. त्यांच्याकडे शैक्षणिक पदव्या तर असतात. मात्र त्यांचे ज्ञान हे चाकोरीतले असते. हे खाली नमूद केलेल्या खर्‍या घडलेल्या घटनेवरून तुम्हाला सहजच समजेल.
अमेरिकेमध्ये एक फार जुने हॉटेल होते. हॉटेल जरी जुने असले तरी त्याचा धंदा मात्र तेजीत होता. म्हणून हॉटेल मालकाने ठरवले की त्या हॉटेलवर नवीन मजले वाढवायचे. तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिली की लिफ्ट बांधायची कुठे! कारण जुन्या पद्धतीचे बांधकाम असल्यामुळे हॉटेलमध्ये लिफ्टसाठी जागाच नव्हती. त्या वेळी त्यांनी मोठमोठ्या इंजिनिअर्सना याबाबत तोडगा काढण्यास सांगितले. कोणी सांगितले की खोल्या तोडाव्या लागतील व त्याजागी लिफ्ट बांधावी लागेल. कोणी सांगितले की इमारत तोडूनच पुन्हा नवीन बांधावी लागेल, परंतु मालकाला इमारत न तोडता वर मजले बांधायचे होते. कोणीही समाधानकारक तोडगा शोधून काढू शकत नाही. त्याचवेळी, त्या हॉटेलच्या वेटरनी मालकाला सुचविले. आपण लिफ्ट इमारतीच्या बाहेरून बांधली तर!! आहे ना तर्कशुद्ध विचार.

मित्रांनो, जो विचार इंजिनिअर्स करू शकले नाही तो विचार त्या साध्या वेटरला सुचला. इंजिनिअर्सच्या अपयशाला कारणीभूत त्यांचे संकुचित ज्ञान व संकुचित वृत्ती.
तेव्हा मित्रांनो घोकंपट्टी करून फक्त गुण मिळवायच्या पाठी पडू नका. कारण फक्त गुणच महत्त्वाचे नसतात, तुम्ही अभ्यास करून जे ज्ञान आत्मसात करणार आहात ते मौल्यवान आहे. कारण तेच भावी आयुष्यात तुम्हाला पदोपदी कामी येणार आहे. तुम्ही जे करिअरक्षेत्र निवडणार आहात. त्यात नोकरी मिळण्यापासून ते उच्च पद गाठेपर्यंत प्रत्येक पायरीवर उपयोगी पडणार आहे.

असे असतानाही, बरेचसे विद्यार्थी अर्थ न समजता पाठांतर करत जातात. आश्चर्याची बाब म्हणजे इंग्रजीतील व्याकरणाचेसुद्धा पाठांतर केले जाते यावरून आजचा विद्यार्थी पुस्तकीकिडा बनलेला आहे हे स्पष्ट होते. मित्रांनो, जर व्याकरण हा इंग्रजीचा पाया जर तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला इंग्रजी लिहायला व बोलायला येणार तरी कसे!

तेव्हा प्रत्येक विषयाची चौकटीच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या मार्गांनी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत प्रत्येक मुद्दा, प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. अर्धवट माहिती मिळवू नका. ''Half knowledge is dangerous'' मित्र-मैत्रिणीचे अभ्यासगट बनवा व मित्र-मैत्रिणीबरोबर बसून प्रत्येक विषयातील संकल्पनाविषयी चर्चा करा. तुम्हाला उद््भवणार्‍या समस्येविषयी चर्चा करा. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. वडीलधार्‍या माणसांची मदत घ्या. की जेणेकरून अभ्यासक्रमातील तुम्हाला उद््भवलेल्या प्रत्येक समस्येचे निराकारण होईल आणि घोकंपट्टी न करता, अर्थ नीट समजावून घेऊन प्रत्येक विषयाचा तुम्ही अभ्यास करू शकाल आणि यातूनच मौल्यवान असे ज्ञान तुम्ही आत्मसात करू शकाल.

मित्रांनो तेव्हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे, तुम्हाला रट्टा मारून घोकंपट्टी करून अभ्यासक्रम संपवायचा आहे, की त्या अभ्यासक्रमातून आयुष्यभर उपयोगी पडणारे ज्ञान जास्तीत जास्त आत्मसात करायचे आहे.
(smit.kelkar@gmail.com)