आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smita Kelkar About Farmers Problems, Rasik, Divya Marathi

शेतकर्‍यांच्या समस्यांचे वास्तववादी आकलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शेतकर्‍याच्या आत्महत्येमुळे जणू त्याचे अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त होते. शेतकरी दारिद्र्याच्या फेर्‍यातच अडकून राहतो. राज्यकर्त्यांनी यावर शोधून काढलेला उपाय म्हणजे कर्जमाफी किंवा कर्जपुरवठा. परंतु त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण थांबणार आहे का? शेतकर्‍याला विकासाची नवीन दिशा मिळणार आहे का?'

दिवसभर कष्ट करून सुखाचा अन्नाचा एक घास जेव्हा आपल्या पोटात जातो, तेव्हा आपल्याला आपल्या कष्टाचे चीज झाले, असे वाटते. परंतु ज्या शेतकर्‍याच्या या मेहनतीमुळे अन्नाचा हा सुखाचा घास आपणास मिळतो, त्याच्या नशिबात सुखाचा घास आहे की नाही? त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळते की नाही? याचा आपण अगदी बारकाईने विचार करतो का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल, चिमणदादा पाटील या योद्धा शेतकर्‍याने लिहिलेल्या बळीराजाचा जागल्या・या पुस्तकात.
राज्यकर्ते, नोकरशाहीपासून व्यापारी ते दलालांपर्यंतची साखळी शेतकर्‍यांच्या व्यथेला कशी कारणीभूत ठरलेली आहे, याचा अनुभव आपल्याला या पुस्तकातून मिळतो. बालपणापासून स्वातंत्र्यसैनिकांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या चिमणदादा पाटील यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा कालावधी शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आंदोलने करण्यात घालवला. त्यामुळे कृषी क्षेत्र किंवा शेतकर्‍यांची व्यथा या विषयावरील लेखनाला चिमणदादा पाटील हे योग्य न्याय देऊ शकतात.
लेखकाने कृषी क्षेत्रातील वास्तव परिस्थिती व सरकारची अयोग्य कृषी धोरणे याचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येपाठचे कटू सत्यही उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आपल्यासाठी कदाचित ही फक्त आकडेवारी असू शकते; परंतु शेतकर्‍याच्या आत्महत्येमुळे जणू त्याचे अख्खे कुटुंबच उद््ध्वस्त होते. शेतकरी दारिद्र्याच्या फेर्‍यातच अडकून राहतो. राज्यकर्त्यांनी यावर शोधून काढलेला उपाय म्हणजे कर्जमाफी किंवा कर्जपुरवठा. परंतु त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण थांबणार आहे का? शेतकर्‍याला विकासाची नवीन दिशा मिळणार आहे का? यावर लेखकाचे स्पष्ट उत्तर नाही・असे आहे. कर्जपुरवठा करण्याऐवजी शेतकर्‍याची कर्ज परतफेड करण्याची ताकद म्हणजेच आर्थिक क्रयशक्ती कशी वाढेल, यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला लेखकाने सरकारला दिलेला आहे. लेखकाच्या मते, ही आर्थिक क्रयशक्ती तेव्हाच वाढेल जेव्हा शेतीमालाला योग्य ती किंमत मिळेल. शेतकर्‍याच्या मालाला योग्य ती किंमत न मिळणे, हेच पिढ्यान्पिढ्या शेतकर्‍याच्या वाटेला आलेल्या दारिद्र्याचे प्रमुख कारण आहे, असे लेखकाने म्हटले आहे.
एका बाजूला राज्यकर्ते, नोकरशाहीवर्ग यांनी स्वत:चा पगार तिपटीने वाढवून घेऊन स्वत:ची प्रगती करून घेतली. मात्र त्याच वेळी शेतकर्‍यांवर वेळोवेळी बंधने घालून त्यांना दारिद्र्याच्या वाटेवर नेले. त्याचबरोबर लेखकाने कांदा, साखर, कापूस या पिकांचा इतिहास आपल्यासमोर ठेवून त्या बाबतीतील सरकारी धोरणांवर प्रकर्षाने टीका केलेली आहे. या पिकांच्या झालेल्या राजकारणाची शेतकर्‍याला त्याचबरोबर ग्राहकालाही किती झळ सोसावी लागली, याचे आकडेवारीसह स्पष्टीकरणही दिलेले आहे.
सरकारने या पिकांबाबत चालवलेल्या निर्यातबंदी धोरणावर टीका करून, या धोरणामुळे आपल्याला जागतिक बाजारपेठा गमवाव्या लागल्या, असे दु:खही लेखकाने व्यक्त केले आहे. शेतकर्‍याने घाम गाळून उत्पादित केलेल्या कापसावर निर्यातबंदी केली जाते. परंतु त्याच कापसापासून बनलेल्या कापडावर मात्र निर्यातबंदी घातली जात नाही. हा कोणता न्याय? शेतकरी व कापड व्यापारी यांच्या धोरणात भेद का? असा प्रश्नही लेखकाने उपस्थित केलेला आहे. चिमणदादा पाटील यांच्या मते, उद्योजक, व्यापारी हे संघटित असतात. मात्र शेतकरी संघटित नसतात आणि हेच शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाचे कारण आहे.
तिन्ही हंगामात पिकणार्‍या कांद्याचाही राजकीय फायद्यासाठी वापर करून कशा प्रकारे कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकले गेले, याचेही प्रभावी विश्लेषण आकडेवारीसह दिलेले आहे. साखर उत्पादनात भारत अग्रेसर असूनही निर्यातीवरील निर्बंधामुळे साखरेला योग्य ती किंमत मिळत नाही. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारद्वारे निर्यातीवर निर्बंध घातले जातात; पण त्याची झळ मात्र शेतकर्‍यांना सोसावी लागते. त्यामुळे लेखकाच्या मते, या समस्येवर मध्य गाठणे फार आवश्यक आहे की, ज्यामुळे महागाईही नियंत्रणात राहील व शेतकर्‍यांच्या साखरेलाही योग्य ती किंमत मिळेल.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक विश्लेषण आकडेवारीच्या साहाय्याने अत्यंत प्रभावी व परिणामकारक पद्धतीने मांडलेले आहे. यावरून लेखकांनी घेतलेल्या परिश्रमांचीही कल्पना येते. त्यामुळे सरकारची कृषी धोरणे, शेतीउत्पादन व त्याचा शेतकर्‍यावर होणारा विपरीत परिणाम याचे एक संपूर्ण चित्र वाचकांसमोर उभे राहते.
मात्र जर हे पुस्तक चिमणदादा पाटील यांनी लेखाच्या संग्रहरूपाने प्रकाशित न करता एक एक विषय घेऊन सखोल विश्लेषण केले असते तर उत्तम झाले असते. कारण विविध लेखांचा संग्रह प्रकाशित केल्यामुळे वैचारिक साखळी तुटत जाते. बर्‍याचशा घटना, विधाने यांचा उल्लेखही वारंवार झालेला आहे; ज्यामुळे पुस्तकाविषयी किंवा लेखनाविषयी असलेली उत्सुकता कमी होऊ शकते.
कृषी धोरणे व कृषी क्षेत्र या विषयावरील लेखांच्या क्रमात लेखकाने पाणी व नद्या याविषयीचेही दोन लेख पुस्तकात दिले आहेत. या विषयांतरामुळे वाचकांची वैचारिक साखळी तुटते. कृषी क्षेत्र नि धोरणे व त्याचा शेतकर्‍यावर होणारा परिणाम याविषयीच्या लेखांमध्येच लेखकाने मानवी संस्कृतीत नद्यांचे योगदान・व पाणी संरक्षणासाठी कठोर नियम・या दोन लेखांचा समावेश केला आहे. ते पुन्हा कृषी क्षेत्राकडे वळले आहेत. नदी, पाणी हे विषय जरी कृषी क्षेत्राशी निगडित असले तरीही या पुस्तकात मात्र ते दिशाभूलच करतात. हे पुस्तक कृषी क्षेत्रातील वास्तव परिस्थितीबद्दल वाचकाला सजग करतेच; पण त्याचबरोबर योग्य कृषी धोरणे अमलात आणली गेली तर कृषी क्षेत्रासह देशाचाही विकास होईल, असा आशावादही दर्शवते.

० पुस्तकाचे नाव : बळीराजाचा जागल्या
० लेखक : चिमणदादा पाटील (दहिवदकर)
० प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ
० मूल्य : रु. 300/‑
० पृष्ठसंख्या : 255
(smit.kelkar@gmail.com)