आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:ला पैलू पाडा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अद्भुत आणि मौल्यवान वस्तूपैकी एक म्हणजे हिरा. प्रत्येकाला किमती मौल्यवान रत्ने, माणिक, हिरे आपल्याजवळ बाळगावे, असे वाटत असते. या हिर्‍याला आपले ‘अलौकिकत्व’ प्राप्त करताना कोणकोणत्या अवस्थेतून आणि प्रसंगातून सामोर जावे लागते याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला अखंड प्रेरणेचे स्रोत मिळेल. आता तुम्ही विचार कराल की हिर्‍यासारखा निर्जीव वस्तूकडून आपल्या सजीवांना काय प्रेरणा मिळणार?

करिअरच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे बरेचसे गुण आपल्याला हिर्‍यात पाहायला मिळतात. कुठल्याही प्रसंगी ध्येयाला चिकटून राहण्याची वृत्ती, ध्येयासाठी स्वत:ला झोकून देण्याची चिकाटी वृत्ती, हसत हसत कष्टांना सामोरी जाण्याची व कधीही माघार न घेण्याची वृत्ती आपण या मौल्यवान अशा ‘हिर्‍यापासून’ घेऊ शकतो. परंतु हे ‘अमूल्यत्व’ हिर्‍याला सहजासहजी प्राप्त होत नाही. हिर्‍याला आपले हिरेपण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कसोट्यातून जावे लागते. कुठे असतो हा हिरा. तिजोर्‍यातून आणि लावण्यवतींच्या सुंदर दागिन्यांमधून मिरवणारा हा हिरा प्रत्यक्षात मात्र खोल खोल भूमातेच्या उदरात ओबडधोबड स्वरूप घेऊन दडून राहिलेला असतो. खाणीत खोलवर जावे तेव्हा हिर्‍याचा हा दगड म्हणजेच कोळसा माणसाच्या हाती लागतो. ज्या वेळी तो माणसाच्या हाती लागतो, त्या वेळी तो जणू माणसाला सांगत असतो की, संधी मिळताच मी आपले असामान्यत्व सिद्ध करेन; आणि हीच त्याची महत्त्वाकांक्षा, जिद्द त्याच्या तेजस्वी रूपाला, चकाकीला आणि प्रसिद्धीला कारणीभूत ठरते.

करिअरमधील वाटचालसुद्धा, हिर्‍याच्या जडणघडणसारखीच असते. आणि करिअर क्षेत्रातसुद्धा प्रत्येक जण स्वत:ला हिर्‍याप्रमाणे मौल्यवान बनवू शकतो. हिरा केव्हा बनतो? जेव्हा तो अतिउच्च तापमापातून तावून सुलाखून बाहेर पडतो. खाणीतला प्रत्येक कोळसा हा हिरा बनू शकत नाही. जो कोळसा अतिउच्च कोटीच्या तापमानातून सुलभ बाहेर पडण्याचे आव्हान स्वीकारतो,त्याच क ोळशाचे रूपांतर हिर्‍यात होत असते. हाच मंत्र करिअरमध्येसुद्धा लागू होतो. कठीण प्रसंगांना सामोरे जात, वेगवेगळे आव्हान पेलत ज्या व्यक्ती करिअरमध्ये वाटचाल करतात, अशा व्यक्तींच्या वाट्याला करिअरमधील सोनेरी क्षण येतात. तप्त आगीमधून हिर्‍याचा प्रवास होतो तो कारागिराच्या हातात. इथे त्याला वेगवेगळे पैलू पाडून घडवले जाते. त्यामुळे हिर्‍याला सौंदर्य प्राप्त होत असते. करिअरमध्ये सुद्धा व्यक्तीकडे हिर्‍याप्रमाणे विविध पैलू असतील म्हणजेच त्याच्याकडे एकापेक्षा एक वेगवेगळी कौशल्य असतील तर अशा व्यक्तीला करिअरमध्ये आपली चमक दाखवता येईल. पण हे करण्यासाठी व्यक्तीजवळ स्वत:ला घडवण्याची, स्वत:ला पैलू पाडून घेण्याची प्रवृत्ती असणे जरुरीचे आहे.

हिरा हे जेव्हा सर्व काटेकोरपणे सहन करतो, तेव्हा कुठे त्याला आपले हिरेपण प्राप्त होत असते. नाहीतर त्यालासुद्धा एक सर्वसामान्य दगड म्हणूनच रहावे लागले असते हिरा जेव्हा एवढ्या हालअपेष्टा सहन करतो, तेव्हा तो मौल्यवान बनतो. तेव्हाच तो राजमुकुटात मिरवण्याच्या योग्यतेच्या बनतो; कारण त्याच्याजवळ इतर रत्नांपेक्षाही अधिक तेजस्वी बनवतात. थोडक्यात हिर्‍याप्रमाणे आपण आपल्यात सकारात्मक नवीन बदल घडवून आणण्याची मानसिकता निर्माण केली पाहिजे. हीच मानसिकता आपल्या चकाकीला, प्रसिद्धीला आणि तेजस्वी रूपाला कारणीभूत ठरतात. हिर्‍याचा एक गुणधर्म असा की, हिर्‍याला फ क्त हिराच छेद देऊ शकतो. त्याचप्रमाणे, एखादी व्यक्ती जेव्हा हिर्‍याप्रमाणे सर्वोच्च स्थानावर प्रभुत्व मिळवते, तेव्हा अशा वेळी तिला छोटी छोटी आव्हाने शिल्लक राहात नाही. अशा व्यक्तीला आव्हान मिळतात ती, फ क्त तेवढ्याच प्रकारची उंची गाठलेल्या व्यक्तीकडूनच. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून क रिअरचा आलेख सतत वाढतच राहील.