आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उणिवांचे रूपांतर संधीत करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणूस म्हणजे गुण-अवगुणांचं अजब मिश्रण आहे. मानवाला निसर्गाने काही चांगल्या गुणांबरोबरच काही दुर्गुणही दिलेले आहेत. कोणताही माणूस चांगल्या गुणांचा असा काही नसतो. म्हणजे तो परिपूर्ण नसतो. गुण-दोष हे व्यक्तिपरत्वे असतात. एखाद्याचा गुण तो दुसर्‍याचा दोष असू शकतो, त्याचप्रमाणे दुसर्‍याचा दोष हा एखाद्याचा गुण असू शकतो.

आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये कोणतीच उणीव नसते, असा सर्वसामान्य समज असतो; परंतु या आपल्या समजाला छेद देणार्‍या घटना आजूबाजूला घडत असतात. ज्यांना आपण यशस्वी असे म्हणतो, अशा व्यक्तिमत्त्वांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असे आढळून येते की, ही माणसेसुद्धा तुमच्या-आमच्यासारखी सर्वसामान्य माणसे असतात. आपल्यामध्ये आढळणारे गुण-अवगुण त्यांच्यामध्येसुद्धा आढळून येतात, परंतु त्यांच्याकडे असलेल्या उणिवांना खतपाणी न घालता त्या उणिवांवर मात करत किंवा त्या उणिवांचे रूपांतर संधीमध्ये करण्याचे कौशल्य त्यांनी संपादन केलेले असते. त्यांच्या यशाचे हेच गुपित असते आणि नेमके तेच आपल्याला उमगत नाही.

"Favourable winds never flow everytime' आपल्याकडे असणार्‍या उणिवा आपल्यावर येणारी संकटे याचे रूपांतर संधीमध्ये करण्याची क्षमता अंगी बाळगणार्‍यांनाच यशाचा मार्ग उमगतो. जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या फलंदाजाभोवती कडेकोट क्षेत्ररक्षण लावलेले असते, त्या वेळी त्या कडेकोट क्षेत्ररक्षणाचा बाऊ न करता एखाद्या सकारात्मक विचाराचा फलंदाज त्या क्षेत्ररक्षणातील कच्चा दुवा (गॅप) शोधून काढतो आणि नेमका चौकार लावतो. हे शोधून काढण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे.

पळवाट काढण्यात सगळेच तरबेज
यशस्वी माणसांच्या यशाच्या गोष्टी प्रचंड स्फूर्ती देतात. क्षणात आपण भारावूनसुद्धा जातो. त्यांनी मिळवलेल्या यशाने आपण इतके भारावून जातो की, त्यांच्या भूमिकेत आपण स्वत:ला पाहायला सांगतो. त्यांच्यासारखे आपल्याला बनता येईल का, असेसुद्धा आपल्याला वाटून जाते. पण हे सारे क्षणभंगुर असते.

दुसर्‍याच क्षणी आपण हे ठरवून टाकतो की हे आम्हाला जमणार नाही. त्यांच्याकडे अमुक अमुक गोष्ट किंवा परिस्थिती होती म्हणून त्यांना ते शक्य झाले. ही परिस्थिती माझ्याकडे नसल्यामुळे मला हे शक्य नाही. असा विचार करून लगेचच आपण स्वत:ला त्यांच्या भूमिकेतून म्हणजे सकारात्मक विचारातून बाहेर काढतो. चांगली व अनुकूल परिस्थिती फक्त दुसर्‍यांकडेच असते असा आपला गैरसमज असतो. पळवाट काढण्यात आपण सगळेच तरबेज असतो.

सकारात्मक दृष्टिकोन : आयुष्यातील मोठे वरदान
मला तुम्हाला दोन वेगवेगळ्या शूज कंपनीच्या सेल्समनची गोष्ट इथे सांगावीशी वाटते. अमेरिकेमधील शूज कंपनीचा सेल्समन व ब्रिटनच्या शूज कंपनीचा सेल्समन बर्‍याच वर्षांपूर्वी आफ्रिकेतील काँगो या देशामध्ये आपापल्या वस्तंूचे प्रमोशन करायला जातात. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात येते की, तिथले सर्वच नागरिक अनवाणी चालतात. ही स्थिती पाहून दोघेही जवळच्या टेलिग्राफ ऑफिसमध्ये जातात आणि आपापल्या मॅनेजरला संदेश पाठवतात. सकारात्मक दृष्टिकोन हे आयुष्यातील सर्वात महान वरदान आहे आणि ते आपल्या अंशी बाळगून तुम्ही स्वत:साठी महत्त्वाचे योगदान देऊ शकता. सकारात्मक दृष्टिकोनाचा स्वभावावर, आयुष्यावर, कृतींवर अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. सकारात्मक स्वभावाने नसलेल्या संधीसुद्धा निर्माण होऊ शकतात.

आपल्या गुणांची आपल्याला मुळीच किंमत नसते
आपल्यावर असलेल्या बिकट परिस्थितीचे गाऱ्हाणे मांडण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाण्याऐवजी त्यालाच चिकटून राहण्याची आपली जिद्द असते. आपल्यावरील प्रत्येक परिस्थिती आपण कशा प्रकारे समजावून घेतो व त्या परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया कशी असते यावरच आपले नशीब सर्वस्वी अवलंबून असते. सर्वसाधारणपणे मानवी स्वभाव हा फार विचित्र असतो. आपल्याकडे असलेल्या गुणांची आपल्याला मुळीच किंमत नसते आणि आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीबद्दल आपण तक्रारीने भरलेलो असतो. आपल्याजवळ असलेल्या संधींचा आणि साधनांचा आपण अजिबात उपयोग करीत नाही, पण आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींना उजाळा देत बसतो आणि हाच आपल्या यशाचा आणि समाधानाचा शत्रू ठरतो.

अशक्य ते शक्य । करिता सायास। कारण अभ्यास । तुका म्हणे।
तुकाराम महाराजांनी हेच सांगितले होते की, अशक्य असणार्‍या गोष्टीसुद्धा अभ्यासाने शक्य होतात. आपल्यामध्ये असणार्‍या उणिवांचा बाऊ करण्यात काहीही अर्थ नसतो. त्याच उणिवांचा अभ्यास करायला शिका. ससा व कासव यांची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्याचा नेमका अर्थ जाणून घेणे दूरच राहते. शर्यतीत पळण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व गोष्टींनी जो परिपूर्ण होता, तो ससा मात्र शर्यत हरला होता. पळता न येणारे कासव मात्र जिंकले होते. ते कसे शक्य झाले? कासवाने आपल्या उणिवांचा बाऊ केला असता तर हे शक्य नव्हते. केवळ प्रचंड आशावाद व प्रयत्नांमधील सातत्य या दोन गोष्टींच्या बळावरच कासवाने शर्यत जिंकली होती. कासवाने आपल्या कमतरतांचा ब्रभा केला असता, तर सशापुढे बिचार्‍या कासवाचा कधीच पाडाव झाला असता.
स्मिता केळकर, मुंबई.
Smit.kelkar@gmail.com