आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचे आयुष्य जरा हटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची आयुष्यातील खरी कसोटी आहे इथून पुढे. तुमचा प्रवास एका चाकोरीतून होता. अभ्यासाची काळजी घ्यायला आई-वडील, समंजस शिक्षक होते, स्पर्धा होती ती ही मर्यादित साच्यामध्ये. परंतु दहावीनंतरचे पुढचे आयुष्य जरा हटके असणार आहे, याची कल्पना असू द्या.

तुम्ही अजूनपर्यंत शाळेत अव्वल नंबर घेणारे असाल, मॉनिटर राहिले असाल, परंतु त्याचा तुमच्या पुढील भावी आयुष्यात काहीही संबंध नसेल हे ध्यानात घ्या. यापुढील तुमचे कॉलेज आयुष्य हे एका कोर्‍या करकरीत शैक्षणिक पाटीप्रमाणे असणार आहे. यात काय गिरवायचे हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षाला तुम्ही जे काही विविध निर्णय घ्याल त्यावरच तुमचे उर्वरित कॉलेज आयुष्य सर्वस्वी अवलंबून राहील.

घाबरवायचा किंवा कॉलेज आयुष्याबद्दल तुम्हाला असलेली उत्सुकताही हिरावण्याचा माझा उद्देश नाही. या लेखांद्वारे ज्या सवयी, कौशल्य, गोष्टी तुम्ही आत्मसात कराल, त्या फक्त कॉलेज आयुष्यापुरत्याच नव्हे तर भावी करिअरमध्येही तुमची साथ देतील.

उच्च आत्मविश्वासाने कॉलेजात जा
नवीन कॉलेजबद्दल वाटणार्‍या उत्सुकतेबरोबर थोडी फार का होईना भीतीही असते. कारण तुमची शाळा ही तुमच्या जवळपासच्या परिसरात होती. परंतु इथून पुढे पूर्ण अनोळखी वातावरण, नवीन इमारत मोठमोठे वर्ग एवढे विद्यार्थी बाप रे बाप. अशा अनोळखी वातावरणात माझा कसा बरं निभाव लागेल? त्यात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची भीती असते ती इंग्रजी भाषेची. कारण शाळेत अजूनपर्यंतचा संवाद हा मराठी भाषेतून झालेला असतो. त्यामुळे इंग्रजी थोडे बोलायला येत असले तरी कमतरता असते आत्मविश्वासाची...
परंतु मित्रांनो घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण जी भीती तुम्हाला वाटतेय, ज्या विचारांच्या तणावाखाली तुम्ही आहात, तेच विचार कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असतील. बाहेरून जरी तुम्हाला जाणवले नाही तरी कोणत्या न कोणत्या प्रकारची थोडीफार का होईना भीती ही प्रत्येकालाच वाटते.
तेव्हा तुमची मानसिक परिस्थिती ही काही वेगळी नाही. It's normal, असा विचार करून सामोरे जा.

कॉलेजच्या पहिल्या दिवशी काय परिधान करावे याबाबतीतही तुम्ही विचार करत असाल. असे कपडे परिधान करा ज्यात तुम्हाला Comfortable वाटेल आणि त्याचबरोबर ज्यात तुम्ही छान दिसाल ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास आपोआपच वाढेल आणि तुमच्या वागण्यातून, हावभावातून हा आत्मविश्वास समोरच्यांना सहज दिसून येईल. पहिल्या दिवशी मैत्री करताना कोण चांगले वाटतंय कोण वाईट, याचा पडताळा करत बसू नका. धडाधड सर्वांशी ओळख करून घ्या आणि पाहा तुमच्या विचारात आणि वागण्यात कितीतरी सकारात्मक बदल घडून येतील. तुमचे कॉलेज आयुष्य फुलवणार्‍या उर्वरित मार्गदर्शन टिप्स पाहू. पुढील लेखात...

स्मिता केळकर
मुंबई. Smit.kelkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...