आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या आयुष्यात घडणा-या घटनांना आपणच जबाबदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आयुष्यात घडणा-या घटनांना आपणच जबाबदार असतो. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना दोष देण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. थोडक्यात आपणच आपल्या आयुष्याचे निर्माते असतो.
तुमचे आयुष्य हे तुमच्या विचारांवर आणि क्रियांवर पूर्णत: अवलंबून असते. तुम्ही जी पुस्तकं किंवा मासिकं वाचता तुम्ही जो चित्रपट किंवा टी.व्ही. शो पाहता, तुम्ही ज्या व्यक्तींच्या, मित्र-मैत्रिणीच्या सहवासात राहाता, त्या सर्वांवर तुमचे विचार आणि तुमची कृती अवलंबून असते. तुमची प्रत्येक कृती ही केवळ तुमच्याच नियंत्रणाखाली असते.
"If you keep on doing what you have always done, you will keep on getting what you have always got.'
आपल्या कृतीत बदल न करता, आपल्या मनायोग्य घटना घडतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे असते. मनायोग्य घटना घडवून आणण्याकरिता आपल्याला वेगवेगळ्या, नवनवीन विचारांचा, नवीन व्यक्तींचा जीवनात समावेश करणे आवश्यक असते. सतत दुसऱ्यांना दोष देणाऱ्या, तक्रारी करणाऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत का? अशा व्यक्ती आहेत ज्या नेहमी नकारात्मक विचार पसरवतात? जर असतील तर अशा व्यक्तींच्या संपर्कात राहणे कटाक्षाने टाळा. तुमच्या मित्र-मैत्रिणी फक्त एका फोनद्वारे तुम्हाला टेन्शन, नैराश्य देऊ शकतात. तुमचे स्वप्न साकार होणे अशक्य आहे असे सांगून स्वप्न पाहणे सोडून द्या, असा सल्ला जर तुम्हाला देत असतील, तर नवीन मित्र-मैत्रिणी शोधण्याची वेळ तुमच्या आयुष्यात आलेली आहे.
तुम्ही ज्या ज्या व्यक्तीबरोबर वेळ घालवता, तुमचे सहकारी, शेजारी, ऑफिसमधील इतर व्यक्ती, मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य यांची यादी बनवा. त्यानंतर ज्या व्यक्ती नकारात्मक आहेत, त्यांच्या पुढे (-) असे चिन्हा लिहा आणि ज्या व्यक्ती सकारात्मक, मनोबल उंचावणाऱ्या आहेत, त्यांच्या नावापुढे (+) असे चिन्ह लिहा. ज्या ज्या व्यक्तींपुढे तुम्ही (-) हे चिन्ह लिहिलेले आहे, त्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळा. जर ते शक्य नसेल तर त्यांच्या सहवासातील वेळ जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या नकारात्मक प्रभावापासून स्वत:ला जास्तीत जास्त दूर ठेवा. यशस्वी होण्याकरिता, यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा सहवास मोलाचा ठरत असतो. अशा व्यक्तींच्या सहवासातून आपल्याला सकारात्मक, मनौधैर्य उंचावणाऱ्या विचारांचा अनमोल खजिना प्राप्त होत असतो. अशा व्यक्तींनी जी यशाची तत्त्वे स्वीकारली आहेत, ज्या यशस्वी धोरणांचा वापर आपल्या आयुष्यात केला आहे, त्यांचा समावेश आपल्याही आयुष्यात करण्याचा प्रयत्न करा. या व्यक्ती काय करतात, कोणते विचार बाळगतात, कोणती पुस्तके वाचतात, कोठून प्रेरणा मिळवतात याचे बारकाईने निरीक्षण करून त्यांचा प्रयोग आपल्याही आयुष्यात करून पाहा.
माझ्या एका सेल्स ट्रेनिंगमध्ये मी सर्व सेल्सच्या व्यक्तींना प्रश्न विचारला, ‘तुमच्या कंपनीतील ५ टॉप सेल्स पर्सनची नावे ज्यांना माहिती आहेत, त्यांनी हात वर करा.’ जवळजवळ सर्वांनीच हात वर केला. त्यानंतर मी त्यांना सांगितले की ज्यांनी या टॉप व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्या यशाची तत्त्वे जाणण्याचा प्रयत्न केला अशांनीच हात वर करा. एकही हात वर आला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या कंपनीतील कार्यक्षम, यशस्वी व्यक्ती सर्वांनाच माहीत होत्या, परंतु त्यांच्या यशाचे गुपित जाणण्याचा प्रयत्न मात्र कोणीच केला नाही.

यशस्वी होण्याकरिता, सकारात्मक, मनोधैर्य उंचावणाऱ्या, आत्मविश्वास वाढवून तुम्हाला प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अशा व्यक्तींच्या सहवासात राहा, ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे, जे तुमची स्वप्न साकारण्यास सतत प्रेरणा देतात आणि तुमच्या विजयावर आनंदित होतात. मग नक्कीच, Success is yours.
Smit.kelkar@gmail.com