आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नजमा : बळी आणि गुन्हेगार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबाची आर्थिक हलाखी दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आई-बापच मुलींना शरीरविक्रय करायला भाग पाडतात किंवा एखाद्या श्रीमंत विलासी माणसाला लग्नाच्या बुरख्याआड विकतात. भारतीय समाजाचे हेही एक वास्तव आहे. कोप-यातले, ज्याच्याकडे फार कुणाचे लक्ष गेले नव्हते किंवा जातही नाही असे. परंतु तरीही ते वास्तव आहे. नजमा त्या वास्तवाची बळी होती आणि त्या वास्तवाच्या पिंज-यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी दुस-या कुणाला तरी त्याच पिंज-यात अडकवू पाहणारी गुन्हेगारही! त्या वास्तवापासून स्वत:ला वाचवण्याच्या धडपडीत ती ते वास्तव आणखी गडद करण्याचा गुन्हा करून बसली! आणि ही शोकांतिका आणखी गडद झाली. नजमा लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या ‘बाजार’ या 1982 सालच्या चित्रपटाची नायिका!

सत्तरच्या दशकाच्या अखेरी अखेरीला आखाती देशांतले वयस्कर श्रीमंत अरब हैदराबादसारख्या मुस्लिमबहुल शहरात येऊन गरीब कुटुंबातल्या अल्पवयीन मुलींशी निकाह लावत, आपल्या वासना शमवून झाल्यानंतर त्यांना वा-यावर सोडत किंवा त्या मुलींना आपल्या देशात नेऊन त्यांची पुनश्च विक्री करत असल्याच्या धक्कादायक बातम्यांनी नुकतेच देशाला हादरे दिले होते. अशा प्रकारे अरब देशाच्या वाटेवर असलेल्या अमीना या अल्पवयीन मुलीची सुटका त्या विमानातल्या एका एअरहोस्टेसच्याच विवेकामुळे आणि दक्षतेमुळे झाली होती. आणि वर उल्लेखलेले वास्तव प्रसारमाध्यमांतून जळजळीतपणे जगासमोर आले होते. या पार्श्वभूमीवरच 1982मध्ये सागर सरहदींचा ‘बाजार’ प्रदर्शित झाला. (गरिबीपायी आईनेच मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचे भीषण वास्तव पुढच्या काळात सुमित्रा भावे यांनी ‘दोघी’ या आपल्या मराठी चित्रपटात मांडले.)

‘बाजार’ सुरू होतो तो नजमाच्याच मिडशॉटवर. नजमा (स्मिता पाटील) आणि तिच्या आरशातल्या प्रतिबिंबावर. नजमाचा नट्टापट्टा जवळजवळ आटोपला आहे आणि ती ओठांवर लिपस्टिक फिरवत, लास्ट टच देत बसली आहे. पण स्वत:च्या प्रतिबिंबाकडे पाहणारे तिचे डोळे कोमेजलेले आहेत. त्या डोळ्यांतली प्रतीक्षा विझू पाहते आहे. चेहरा वेदनेची कहाणी सांगत आहे. डोअर बेल वाजते आणि डोळ्यातली ती प्रतीक्षेची ज्योत जराशी फडफडते. विफल रंगलेल्या ओठांवर बारीकशी आशा चमकते आणि नजमा दार उघडायला धावते...अख्तर (भरत कपूर) येतो आणि ती त्याला बिलगते. क्षीण होत चाललेल्या आशेची पुन्हा एक फडफड केवळ...

नजमा गेली सहा वर्षे मुंबईतल्या या फ्लॅटमध्ये राहते आहे, अख्तर आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करेल आणि आपल्याशी लग्न करेल, या आशेवर नजमा आहे. अख्तरबरोबर ती हैदराबादहून पळून आली ती एका नरकातून सुटण्यासाठी. स्वत:ला नबाब म्हणवून घेणारे, पण आज विलक्षण हलाखीत जगणारे, तरीही कुणाची चाकरी करणे म्हणजे आपल्या नबाबी बाण्याला बट्टा लावणे असे समजणा-या कुटुंबातली तरुण मुलगी नजमा. घर चालवण्यासाठी प्रत्यक्ष आईच तिला शरीरविक्रय करायला सांगते. ‘मी नोकरी करीन, कुणाची तरी चाकरी करीन आणि घर चालवीन, पण असले काम करायला सांगू नकोस’ असे नजमा विनवते, पण आई आपल्या आग्रही सुरातून आपली हतबलता तिच्यापुढे मांडते. ती परंपरेची गुलाम आहे आणि घरातल्या पुरुषांच्या नाकर्तेपणापुढेही हतबलच आहे. ‘आपले नबाब घराणे. आपण कुणाची चाकरी करत नसतो. आपण नोकर ठेवतो. घरातल्या पुरुषांना कुणाची नोकरी करणे हे अप्रतिष्ठेचे वाटते. अशा घराण्यातली मुलगी नोकरी करते आहे कळलं तर लोक काय म्हणतील?’, असे आईचे म्हणणे आहे. शरीरविक्रय मात्र या कानाचे त्या कानाला कळू न देता होऊ शकणार आहे.

नजमाच्या कुटुंबाने तिला शरीरविक्रय करून पैसे मिळवायला भाग पाडलेले आहे. तिच्यावर प्रेम करणा-या गरीब सलीमची (नसीरुद्दीन शाह) अखेरची भेट घेताना ती त्याला म्हणते, ‘मेरे घरवालों को डर है कि उनकी सोने की चिड़िया कहीं उड़ न जाए।’ माझ्या घरातली माणसे सोन्याची अंडी देणारी कोंबडी हातची जाऊ देणार नाहीत. सलीमला कळत नाही तिने स्वत:ला ‘सोने की चिड़िया’ का म्हटले. तीही त्याचे उत्तर देत नाही. ‘चाहती नहीं मुझे?’ या त्याच्या प्रश्नाचे उत्तर सूचकपणे ती फक्त एवढेच देते, ‘आपसे शादी नहीं कर सकती.’ हीच नजमा अख्तरबरोबर पळून जाते ती त्याने तिला लग्नाचे वचन दिल्यावरून. असे का? अख्तर हा तिच्याकडे प्रथम आला असावा तो गि-हाईक म्हणून. तिने शरीरविक्रय करणेदेखील मजबुरीने स्वीकारले असले तरी मुकाटपणे स्वीकारलेले दिसत नाही. अख्तरच्या पहिल्या भेटीत तिने त्याच्यावर फ्लॉवरपॉट फेकून मारलेला आहे. हे दृश्य प्रत्यक्षात चित्रपटात नसले तरी दुस-या भेटीत अख्तर कपाळावर जखम घेऊन आलेला आहे, ‘आप फिर आ गए?’ म्हणून तिने पुन्हा फ्लॉवरपॉट उचलला आहे. पण तो या मनस्वी मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. तो तिला आपले तिच्यावर प्रेम जडल्याचे सांगतो, तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊ इच्छित असल्याचे सांगतो. स्वत:च्या पायावर उभे राहताच तिच्याशी लग्न करण्याचे वचन देतो आणि नजमा त्याच्याबरोबर पळून जाते. घरी मनीऑर्डर पाठवत राहते. त्याने शाकिरभाई या कुणा दोस्ताच्या फ्लॅटमध्ये जिथे तिला ठेवलेले असते तिथे नजमा, अख्तर स्वत:च्या पायावर उभा राहून आपल्याशी लग्न करेल, याची वाट पाहात सहा वर्षे राहते. घराची आर्थिक गरज नजमा नजरेआड करू शकत नाही आणि गरीब सलीमशी लग्न करू शकत नाही, हे त्याचे एक स्पष्टीकरण. परंतु कुणा बिझनेसमनचा मुलगा असलेला पण अजून बापावरच अवलंबून असलेला, विलासप्रिय आणि ‘स्वत:च्या पायावर उभा राहण्या’साठी कुणा शाकिरभाई नामक संशयास्पद बिझनेस करणा-या वयस्कर, विलासी मित्रावर अवलंबून असलेला अख्तर तिला चालणार आहे. कारण कसे का असेना, ती त्याच्या छायेत राहून घरी मनीऑर्डर पाठवू शकते आहे. घरून साजिद (फारुख शेख) या मानलेल्या भावामार्फत पाठवलेल्या पत्रांची उत्तरे मात्र ती कधीच देत नाही, कारण घरच्यांना तिने माफ केलेले नाही. पत्रे येतात, मनीऑर्डर येते, म्हणजे तिचा ठावठिकाणा घरच्यांना माहीत आहेच. परंतु घरची माणसे कधी तिचा शोध घेत येत नाहीत. कारण त्यांची आर्थिक गरज ती भागवते आहे. किंबहुना मुलगी पळून गेली, एवढे जाहीर करून गुपचूप तिच्या मनीऑर्डरवर जगता येते. तिने शरीरविक्रय करावा किंवा कुणाबरोबर पळून जावे, पैसे मिळत राहिले तर या घराला त्याच्याशी काही कर्तव्य नाही.

मुंबईत नोकरी करणारा सलीम तिला पुन्हा एकदा अख्तरच्या वचनाच्या फोलपणाची जाणीव देत म्हणतो, की सहा वर्षांपूर्वी मला शक्य नव्हते पण आज मी तुझ्याशी लग्न करू शकतो, तू या खाते-यातून बाहेर पड. ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. अख्तरशिवाय आपल्याला पर्याय नसल्याचेच नजमाच्या मनाने घेतले आहे. मग नजमाच्या आयुष्यात सलीम नेमकी
कोणती भूमिका करतो?

आपल्यालाही नजमासारखी एखादी तरुण मुलगी पाहून तिच्याशी आपले लग्न लावून द्यावे, त्याच अटीवर आपण तुला स्वत:च्या पायावर उभे राहायला (म्हणजे नेमके काय?) मदत करू, असा लकडा चार मुलांचा बाप असलेला व्यसनी, विलासी शाकिरभाई अख्तरमागे लावतो आणि अख्तर ते काम नजमावर सोपवतो. अख्तरशी लग्न करायच्या असोशीपायी नजमा हे अप्रिय काम करायला तयार होते, ती आपला सदसद्विवेक बाजूला सारून. हैदराबादेत गरिबी दूर करण्यासाठी विकायला काढलेल्या मुलींची रांग पाहून नजमा अस्वस्थ होते, तिथून पळ काढते, घुसमटते, ‘मुझसे क्या करा रहा है मौला? मुझे किस गुनाह की सजा दे रहा है मौला?’ म्हणून स्वत:शीच आक्रोश करते. पण अख्तरशी लग्न या एका उद्दिष्टासाठी ती पुन्हा शाकिरसाठी गरीब घरातली मुलगी शोधायला निघते. शाकिरभाईचे लग्न जुळवले नाही तर आपलेही लग्न होणे शक्य नाही, हे अख्तर पुन्हा पुन्हा सांगून तिला पुन्हा प्रयत्नाला लावतो.

अख्तर स्वत: कधीच कोणतेच प्रयत्न करत नाही, पण अगतिक नजमाला अख्तरची निष्क्रियता कधी जाणवत नाही. किंवा ती जाणवून घेण्याची गरज ती स्वत:ला कधी जाणवू देत नाही. जे प्रयत्न करायचे ते आपणच, हे जणू तिने गृहीत धरलेले आहे. गरजही आहे ती तिलाच. अख्तरला काही फरक पडत नाही. मग ती आपला सदसद्विवेक पुन्हा गाडून टाकते.
तिच्याबरोबर आलेल्या मैत्रिणीलाही आपण करू पाहात असलेल्या अन्यायाची टोचणी आहे. कोवळ्या शबनम(सुप्रिया पाठक)ची अवस्था पाहिल्यावर ती नजमाला म्हणते, ‘यह हम क्या कर रहे हैं?’, त्यावर नजमा उत्तरते, ‘जिंदगी में किस कम्बख्त को मालूम है कि वो क्या कर रहा है?’ तिच्या या उत्तरात तिच्या सदसद्विवेकावर स्वार होऊन बसलेली तिची अगतिकता आहे. आणि मग ती त्या अपराध भावनेवर उपायही सुचवते, ‘तो अनजान बने रहना ही अच्छा है. दर्ग्यावर एक चादर चढवून यायचं आणि अपराधातून मुक्त व्हायचं.’ पण नजमा खरोखरी अशी मुक्त होऊ शकणार असते का? तिच्या हातून शबनम-साजिदची शोकांतिका झाली नसती, तरी शबनमसारख्या इतर कुणा मुलीचा बळी शाकिरभाईच्या शेजेवर देऊन झाल्यानंतर गाडून टाकलेला तिचा सदसद्विवेक मनाच्या कबरीतून तिला टोचत राहिला नसताच, असे मुळीच नाही. अख्तरशी लग्न करूनही नजमाच्या चेह-यावर सुरुवातीला दिसली तीच वैफल्यभावना आता अपराध भावनेचे कायमचे अस्तर लेवून आली असती.

कथेत नाट्य येते ते शाकिरभाई नेमका शबनमला पसंत करतो तिथे. नजमा शबनमची माहिती मिळवून शाकिरभाईचे लग्न ठरवून येते. गैरसमजापायी नजमा ज्या गरीब पंधरा वर्षांच्या मुलीचा सौदा शाकिरभाईसाठी करून आली ती नेमकी तिच्या मानलेल्या भावाची- साजिदची - प्रेमिका आहे, हे नजमाला हे कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. शाकिरभाई माघार घेणार नसतो, शबनमचे आईवडील तिचा सौदा करून बसलेले असतात, कारण त्यांना त्या पैशात आपल्या मोठ्या मुलीचे लग्न जुळवायचे असते. पैसा परत करण्याची भाषा करणेदेखील त्यांना त्यांच्या गरिबीपायी शक्य नसते. एका गरीब अल्पवयीन मुलीवर आपण केलेल्या अन्यायाच्या जाणिवेपेक्षाही आपल्या लाडक्या धाकट्या भावाचे-साजिदचे-आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या अपराध भावनेने नजमा उद्ध्वस्त होते.

नजमावर प्रेम करणारा गरीब पण विचारवंत शायर सलीम (नसीरुद्दीन शाह) याची व्यक्तिरेखा ही या कथेच्या आशयात छुप्या सूत्रधाराचेच काम करते. ती परिस्थितीवर कठोर भाष्य करते, नजमाला वास्तवाचे भान आणून देऊ पाहते. त्यासाठी लेखक-दिग्दर्शकाने लांबलचक संवादांचाही आश्रय भरपूर प्रमाणात घेतलेला आहे. चित्रपट माध्यमाला शोभू नये इतक्या प्रमाणात. (सागर सरहदी हे इप्टाच्या नाट्यचळवळीतील लेखक-दिग्दर्शक. नाटकाचा, प्रबोधनकर्त्या नाट्यचळवळीचा तो प्रभाव ‘बाजार’मध्ये प्रकर्षाने आढळतो.) अखेरीला नजमाच्या व्यक्तिरेखेला अधांतरातून एका समापनबिंदूपाशी आणण्याची चित्रपटाची गरजही या सलीमच्या रूपाने भागवली गेली आहे. सलीम साजिदसारखा हाडामांसाचा वाटत नाही. साजिदने शबनमला वाचवण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न जिवावर उदार होऊन केला, तसा कोणता प्रयत्न नजमासाठी सलीम करत नाही. ‘जब तक जीने के लिए मर्द का सहारा चाहिए, चाहे वो अख्तर हो चाहे सलीम, तुम खिलौना बनी रहोगी’, असा इशारा तो नजमाला देतो. इशारे देण्याचे काम तो करतो. मुलींच्या या बाजारात आपण खरेदी करायला येऊन गुन्ह्यात सहभागी झालो, असे नजमाला वाटते तेव्हा तो तिला तिच्या नेमक्या भूमिकेचे भान आणून देतो. तो म्हणतो, ‘तू ग्राहक नाहीस, तू आहेस या बाजारात विकली गेलेली एक वस्तू. विकत घेतलेलं एक खेळणं. आपल्या शरीराला एखाद्या दुकानाच्या शोकेसपासून वाचवण्यासाठी तू अख्तरच्या घरातली सजावटीची वस्तू बनणं पसंत केलंस. तुम इस मरते हुए समाज की गिरती दीवार हो.’ सलीम हा सागर सरहदींच्या विचारांचा चित्रपटातला प्रतिनिधी आहे. आणि खरे तर सतत द्विधावस्थेने गांजलेल्या नजमाचे ते दुसरे मन आहे.

चित्रपटाच्या अखेरीला अख्तरला खडे बोल सुनावून, त्याला सोडून नजमा धावत ट्रेन पकडून सलीमच्या डब्यात शिरते, हे केवळ एक प्रतीकात्मक दृश्य म्हणायला हवे. कारण तत्पूर्वी सलीमनेच - म्हणजे तिच्या अंतर्मनानेच की काय - तिला तिच्या आत्मभानाचा मार्ग सुचवला आहे - ‘जिस दिन बिना सहारे के जीना सीखोगी उस दिन तुम्हारी अपनी शख्सियत होगी. उस दिन तुम नजमा होगी। - ज्या दिवशी (पुरुषा)च्या आधाराशिवाय जगायला शिकशील त्या दिवशी तुझं स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व तुला गवसेल. त्या दिवशी तू नजमा नावाची व्यक्ती झालेली असशील. त्या दिवशी तू कुणाच्या हातातलं खेळणं राहणार नाहीस.’

मग नजमा अख्तरला सोडल्यावर सलीमकडे तरी का येते? नजमा येते ती आपली जबानी द्यायला! ती गाडीच्या डब्यात शिरून सलीमच्या मिठीत नाही शिरत! ती म्हणते, ‘मैं बयान देती हूँ कि इस गुनाह, इस जुर्म, इस नाइन्साफी में मैं बराबर की शरीक हूँ।- या गुन्ह्यात माझाही तेवढाच हात आहे.’ ती गुन्हा कबूल करते तो स्वत:पुढे! सलीम हे केवळ तिच्या त्या सदसद्विवेकाचे दृश्य रूप आहे. बयान देऊन होताच चित्रपटाच्या अखेरच्या फ्रेममध्ये नजमा आणि सलीम कॅमे-याच्या म्हणजेच प्रेक्षकांच्या दिशेला पाहतात, एकमेकांकडे नाही! सलीमची व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्यक्षात नजमाच्या अंतर्मनातल्या अमूर्त विचाराला, खळबळीला दिलेले मूर्त रूप आहे. नजमाच्या आरशातल्या प्रतिबिंबाने किंवा तिच्यातूनच बाहेर येऊन तिच्यासमोर उभ्या ठाकलेल्या तिच्या प्रतिमेने तिला जे सुनावले असते, तेच सलीम तिला सुनावतो. सलीमची व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्यक्षात दिग्दर्शक सागर सरहदींनी योजलेला एक ‘डिव्हाइस’ आहे. नजमाच्या मनातल्या खळबळीला, विद्रोहाला, अपराध भावनेला मूर्त रूप देण्यासाठी योजलेला ‘डिव्हाइस’. नजमा येते ती सलीमकडे नव्हे, ती येते नजमाकडेच! स्वत:कडेच!