आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैच्छिक धूम्रपानाचा सर्वांनाच धोका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घालूनही आठ वर्षे झाली आहे. का बर शासनाने हा निर्णय घेतला असावा? तंबाखूच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असते. विशेष म्हणजे हे वायू शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतात. एखाद्या धूम्रपान ओढणा-या व्यक्तीमुळे इच्छा नसताना आजूबाजूच्या व्यक्तींच्या नाकातोंडावाटे तो धूर त्यांच्या शरीरात जात असतो. त्यालाच अनैच्छिक धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग) म्हणतात. धूम्रपान करताना दोन प्रकारचा धूर निर्माण होत असतो. धूम्रपान करणा-या च्या तोंडावाटे जो धूर त्या व्यक्तीच्या शरीरात जात असतो त्याला मेनस्ट्रीम स्मोक अथवा मुख्य धूर म्हणता येईल. याउलट जो धूर सिगारेटमधून बाहेर पडत असतो त्याला साइडस्ट्रीम स्मोक अथवा बाह्य धूर म्हणता येईल.

सामान्यत: धूम्रपानामुळे बाहेर पडणा-या धुरापैकी 15 टक्के धूर धूम्रपान करणा-या च्या शरीरात जात असतो, तर 85 टक्के धूर वातावरणात बाहेर पडत असतो. यातील बराचसा धूर आजूबाजूच्या व्यक्तीच्या शरीरात त्यांची इच्छा नसताना जात असतो. म्हणजे त्यांच्यावर हा अन्यायच नाही काय? सर्वात वाईट बाब म्हणजे साइडस्ट्रीम धूर वा बाह्य धुरात कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोझमाइन व बेन्झोपायरिनसारखे अत्यंत घातक घटक अधिक प्रमाणात असतात. (तंबाखूत एकंदर 4000 घटक आढळतात. त्यापैकी जवळजवळ 40 टक्के घटक कर्कजन्य असतात.) तंबाखूत जवळजवळ 6 टक्के या प्रमाणात आढळणा-या कार्बन मोनॉक्साइड या वायूला रक्तातील जीवनावश्यक हिमोग्लोबिनचे प्राणवायूपेक्षा 20 पट जास्त आकर्षण असते. त्यापासून निर्मिती होते कार्बोक्झी हिमोग्लोबिन या पदार्थाची. त्यामुळे हृदय किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयगती थांबण्याची किंवा अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता वाढते.

*नायट्रोझमाइन्स व बेन्झोपायरिन हे दोन्ही पदार्थ कर्कजन्य पदार्थ आहेत. स्वाभाविकच बाह्य धुरातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणा-या धुरामुळे इतरांना कर्करोग होऊ शकतो.
* धूम्रपान न करता अनैच्छिक धूम्रपानामुळे यूएसए मध्ये दरवर्षी जवळजवळ 3000 लोकांना फुप्फुसाचा कर्करोग होतो असा अंदाज आहे. त्यामुळे समाजातील काही जाणकार लोकांनी यांची दक्षता घेण्याची गरज आहे.
*अनैच्छिक धूम्रपानामुळे धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या सतत संपर्कामुळे सरासरी तीन सिगारेट प्रत्यक्षात ओढण्याएवढ्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.
*अनैच्छिक धूम्रपानामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता खूप वाटते. यात ब्राँकायटिस, न्यूमोनियाचा समावेश होतो. शिवाय अस्थमा होण्याची शक्यता वाढते.
*याव्यतिरिक्त अनैच्छिक धूम्रपानामुळे हृदयविकार, अर्धांगवायू, कर्करोग, घशांचा संसर्ग, कानाचा संसर्ग, डोळे चुरचुरणे वारंवार चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे इत्यादी त्रास होतात.
*धूम्रपान करणा-या व्यक्तींच्या कुटुंबीयांना तर वर नमूद केलेल्या धोक्यांचा सर्वाधिक फटका बसतो. गर्भवती मातांना तर त्यामुळे अविकसित वा मृत बाळ होऊ शकते. लहान मुलांचा विकास त्यामुळे खुंटतो. क्वचितच त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो.
*आपण धूम्रपान वा तंबाखूच्या सर्व सवयी सोडा व आपले व आपल्या कुटुंबीयांचे आयुष्य सुखमय करा.