आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Movements Inspiration By Female Writers Literature Festivel

सामाजिक आंदोलनाची प्रेरणा देणारे लेखिका संमेलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महिला लेखकांसाठी सुरू केलेली ही चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी बीड जिल्ह्याने मागील वर्षी अंबाजोगाई, यंदा बीड आणि पुढील वर्षात माजलगावला संमेलन घेण्याचे ठरवून पाठबळ दिले आहे. एकीकडे जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्या, बलात्कारासारख्या घटनांचा राज्यभर डांगोरा पिटला जात असला, तरी साहित्यपंढरीत महिला लेखक, खेडूतच नव्हे तर नागरी लेखिकांना लिहितं करण्याचं, साहित्य रसिकांना साहित्य पर्यटनाची संधी देण्याचं काम याच बीड जिल्ह्यात केलं जातं, हेही दाखवून दिलं. उत्कृष्ट आयोजन, तडाखेबंद नियोजन आणि चोख व्यवस्थापनाने आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्यही झालं. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या नावानं बोटं मोडणा-यांना लेखिका साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी झगडणा-या पुरुषांनीही चोख उत्तर दिलं आहे. ग्रामीण, नागरी लेखिका, युवती, महिलांना लिहितं करण्यास लावणारं हे लेखिका साहित्य संमेलन सर्वसमावेशक ठरलं.

सुहासिनी इर्लेकर यांच्या कवितांवरील वेगळा
वाचन-नृत्य-गायनाचा काव्य संग्रहण कार्यक्रम

परिसंवाद, काव्यवाचन, कथाकथन या सत्रांना वेळ आणि वक्त्यांची मर्यादा यावर मात करण्यासाठी सर्व स्तरातील वयोगटातील स्त्रियांसाठी पारंपारिक लोकगीत व आजीची गोष्ट हे कार्यक्रमही झाले. त्यामुळे ग्रामीण व कष्टकरी महिलांना केवळ व्यासपीठ मिळाले. एवढेच नाही तर त्यांचा सन्मानही केला गेला. महाराष्ट्रात, देशात वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या चौदा युवतींचा उद्घाटनाच्या दिवशी पाहुण्यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला, हे या संमेलनाचे वेगळेपण म्हणावे लागेल. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी कवितेवर आधारित कधीही झाला नसेल असा सुहासिनी इर्लेकर यांच्या कवितांवरील ‘आकाशच्या अभिप्रायार्थ ’ हा वाचन, नृत्य, गायन असा काव्य संग्रहणाचा कार्यक्रम साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांनी दिग्दर्शित केला होता.

महिलांच्या व्यथांवर हे संमेलन केवळ चर्चेच्याच दिशेने गेले नाही तर यातून मराठवाड्यातील लेखिकांना ठळकपणे स्वतंत्र व्यासपीठ मिळाल्याने भविष्यात साहित्यिक, सामाजिक आंदोलनाची पेरणीही झाली. मराठवाड्यासह राज्यातील ख्यातनाम लेखिकांनाही निमंत्रण देऊन संयोजकांनी विषयाचे गांभीर्य अधिक ठळकपणे मांडले. संमेलनाध्यक्ष प्रा. मथू सावंत यांचे भाषण प्रभावी ठरले, तर मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेपासून लोकप्रतिनिधींवर स्त्री अत्याचाराबात आसूड ओढला. राजकारणातील स्त्रियादेखील अत्याचारित स्त्रियांनाच दूषणे देऊन मोकळे होत असल्याची खंत मांडली. राज्यमंत्री फौजिया खान यांनी उद्घाटनाच्या भाषणात दारूबंदीबाबत सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका मांडली, त्यातून सरकारने दारूबंदीचा धाडसी निर्णय घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमांच्या नियोजनाला तोडच नाही
क्षीरसागर कुटुंबीयांनी हाती घेतलेल्या कार्यक्रमांच्या नियोजनाला तोड नसते, हे या लेखिका साहित्य संमेलनातून पुन्हा एकदा ठळकपणे दाखवून दिले. नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी हे संमेलन सर्वार्थाने कसे नेटके होईल हे पाहिले. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी त्यांना भक्कम साथ दिली. सुहासिनी इर्लेकर साहित्य नगरीशेजारीच सुरू असलेल्या महासोमयाग यज्ञाचा संमेलनातील उपस्थितीवर काही परिणाम झालाच. महिला अत्याचाराचे विषय परिसंवादात ठळकपणे आले. यात पाहिजे तेवढे वैविध्य नव्हते. संमेलनाने स्त्री लेखकांना लिहायला, शब्दावरच्या भावना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. महिला, लेखिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतोय, तो मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महिलांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल. त्याविषयीदेखील संमेलनास आलेल्या लेखिकांनी त्यांना धन्यवादही दिले.
संतसाहित्यावर हवा होता परिसंवाद
संमेलनस्थळाला ज्या सुहासिनी इर्लेकरांचे नाव देण्यात आले, त्या संतसाहित्याच्या अभ्यासक होत्या. संतसाहित्यावरच त्यांना पीएच.डी. देखील मिळालेली. लेखिका साहित्य संमेलनात संतसाहित्यावर आधारित एखादा परिसंवाद असायला हवा होता. संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या स्त्री म्हणून काव्यातील जाणिवा, केवळ टिपल्या नाहीत तर उणिवादेखील धीटपणे मांडल्या. यावर सुहासिनी इर्लेकरांनी संत कवयित्रींचा अभ्यास केलेला आहे. इर्लेकरांनी चित्रण केलेल्या समीक्षणावर परिसंवाद झाला असता तर संतसाहित्यावर प्रकाश पडला असता आणि आतापर्यंतच्या संमेलनात जे झालेलं नाही, ते नावीन्यही दिसून आलं असतं. लेखिका साहित्य संमेलनातील प्रवाहाने मराठी, मराठवाड्यातील वाङ्मय समृद्ध झालं असं म्हणता येणार नसलं तरी त्याची कक्षा रुंदावली आहे. लक्ष्मणरेषा दूर गेली. हे वाङ्मय उंबरठ्यातून अंगणात येण्याइतपत व्यापकता नक्कीच आली. स्त्री जाणिवांमध्ये बदल झाले. अन्यायाला वाचा फोडण्याकडे स्त्रियांचा कल गेल्याचे संमेलनातून दिसून आले.

या संमेलनातून साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळाली. संमेलनातून कार्यप्रेरणा, निर्मिती प्रेरणा नक्कीच मिळाली. स्फुल्लिंगाला चेतना देण्याचे काम व निर्मिती प्रेरणेची दिशा, आलेख संमेलनागणिक उंचावत जात असल्याचे स्पष्ट झाले. संमेलनाचे आयोजन, व्यवस्थापन चोख होते. वातावरण निर्मितीत ग्रंथदिंडी ते उद्घाटनापर्यंत देखणा सोहळा झाला. विद्यार्थिनींतील चेतना पाहून प्रौढ वयातील महिलाही उत्साहित होतात हे दिसून आले. स्त्रीच्या वयाचा स्तर नव्हे तर भारूड, कथाकथन, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या महिलांचे कार्यक्रम, आजीच्या गोष्टी या लोकजीवनातील सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील महिलांची वैचारिक घुसळण झाली. हे कार्यक्रम पाहण्यास जे चुकले, त्यांना नक्कीच चुकल्यासारखं वाटायला लागलं आणि महिलांच्या मनातील मळभही दूर झालं असावं. याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धा, संस्कार शिदोरी, लोकगीत सादरीकरणाने साहित्य अभिव्यक्ती संकल्पना जी कल्पकतेने घेतली गेली, ती सुंदरच होती. एका संमेलनातून सारा अर्क देण्याचा झालेला प्रयत्न हेच या संमेलनाचे वेगळेपण म्हणावे लागेल.

इतर भाषकांनाही सहभाग
संमेलन यशस्वी करण्यासाठी मनात ज्या ज्या कल्पना होत्या, त्या मांडल्या. मराठीपुरतं मर्यादित नव्हे तर इतर भाषकांनाही सहभागी करून घेत वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी सांगितले. साहित्याने परिवर्तनाची बीजे पेरली जातात. वर्तमान व्यवस्थेतील लांच्छनास्पद बाबींविरुद्ध पुकारलेले एक वैचारिक बंड असते. या बंडाची पेरणी होण्यास साहित्य संमेलने विलक्षण पोषक ठरतात याचे हे संमेलन उत्तम उदाहरण आहे, असे मसापचे बीड शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी सांगितले.

साहित्यात रमला बीड जिल्हा
ज्या बीड जिल्ह्यात मराठीची पहिली कविता मुकुंदराजांनी लिहिली, दासोपंतांनी पासोडीसारखी अद्वितीय काव्यशैली जन्माला घातली, चक्रधर स्वामी, शेख महंमदबाबा यांच्यासारखे महान संतकवी या जिल्ह्याच्या भूमीत राहिले, त्या मातीत साहित्य रुजणे क्रमप्राप्त आहे. याचा अनुभव सध्या येत आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरात मराठवाडा साहित्य संमेलन कडा (ता.आष्टी) येथे झाले. केज, माजलगाव, बीडला मसापचे साहित्य संमेलन, अंबाजोगाईत लेखिका साहित्य संमेलन झाले, त्यापाठोपाठ बीडला आणि आता पुढील वर्षी हे संमेलन माजलगावमध्ये होणार आहे. दरडवाडी (ता. केज) येथे रार्ष्ट्रीय भारूड महोत्सव , माजलगावला शिवार साहित्य संमेलन झाले. या बाबी लेखन, वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यास पोषकच ठराव्यात.