आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जाणतोच की माणूस समाजप्रिय आहे. पूर्वीच्या पारावर बसून मारलेल्या गप्पा गेल्या. आताची पिढी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गप्पा मारते. त्यातून जन्म झाला ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट्सचा. परंतु या साइट्सबाबत अनेक गैरसमज आहेत. पहिला हा की फेसबुक, ट्विटरसारख्या साइट्स फक्त मुले आणि तरुण वापरतात. पण वस्तुस्थिती ही आहे की या साइट्सवरचे 50% लोक 35 वर्षांच्या वरचे आहेत. दुसरा गैरसमज असा की तुमच्या पानावरून तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाईल, पण वस्तुस्थिती अशी की ती तर कोणत्याही पानावरून चोरता येऊ शकते. तिसरा गैरसमज असा की या साइट्स वापरायला अत्यंत अवघड आणि तांत्रिक आहेत, मात्र वस्तुस्थिती अशी की त्या अत्यंत सोप्या आणि युझरफ्रेंडली आहेत.


सोशल नेटवर्किंगची उपयुक्तता ही की संगणकाचा वापर करून जगभरातील लोकांशी संवाद साधणे, छायाचित्र आणि चलचित्रांची देवाणघेवाण करणे. काही सोशल नेटवर्किंग साइट्स खालीलप्रमाणे -
* ट्विटर - ट्विटर हे वेगाने वाढणारे सोशल नेटवर्क आहे. तुम्ही आपल्या आवडत्या माणसांना, नामवंतांना फॉलो (मागोवा) करू शकता. ट्विटरमध्ये 140 कॅरेक्टरचे छोटे टेक्स्ट मेसेज असतात. यालाच मायक्रो ब्लॉगिंगही म्हणतात. समजा काही रंजक ट्विट माझ्याकडे अमिताभ बच्चनकडून आले तर मी ते पुन्हा रिट्विट करू शकते. म्हणजे माझ्या ग्रुपमधल्यांना परत पाठवू शकते, ज्यावरून त्यांना कळेल की हे अमिताभ बच्चन यांनी पाठवले आहे.
* फेसबुक - ट्विटरसारखे छोट्या जागेत लिहिण्यापेक्षा फेसबुकवर तुम्हाला तुमचे संपूर्ण पान उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या मित्राबरोबर छायाचित्र, चलचित्र, ऑनलाइन खेळ गप्पा सगळे शेअर करू शकता. खासगी गप्पा तसेच खुल्या चर्चाही करू शकता. फेसबुकच्या काही सॉफ्टवेअर्सच्या साहाय्याने पुस्तक, सिनेमाचे परीक्षणही करू शकता.
* लिंक्डइन - लिंक्डइन काहीसे फेसबुकसारखेच, परंतु फक्त व्यावसायिक वापरासाठी आहे. आपल्या जुन्या आणि नव्या व्यावसायिक सहका-यांबरोबर संपर्कात राहण्याचा हा उत्तम मार्ग आहे. तसेच इथे तुम्ही मित्राच्या मित्राच्या मित्राशी व्यावसायिक संपर्क साधू शकता.
* फ्लिकर - या साइटवर दुतर्फी संपर्क (socialising) फार कमी होतो, परंतु तुम्ही छायाचित्रं अपलोड आणि शेअर करू शकता. कॉपीराइटचे बंधन नसेल तर तुम्ही डाऊनलोड करून ती परत वापरू पण शकता.
* गुगल प्लस - ही साइट फेसबुकची प्रतिस्पर्धक म्हणूनच आली आहे. परंतु अजून याची लोकप्रियता फेसबुक किंवा ट्विटरइतकी नाही. गुगल प्लसमध्ये वेगवेगळ्या मित्रांना वेगवेगळ्या सर्कल्समध्ये ठेवायची सोय आहे. त्यामुळे प्रत्येक गटाबरोबर वेगवेगळ्या गप्पा मारता येतात.
तुम्ही कोणतीही वैयक्तिक किंवा इतर पोस्ट करणार असाल तर ती आधी तपासून बघायला हवी. वैयक्तिक माहिती किती दाखवायची हे तुम्ही ठरवू शकता. आपली भाषा इतरांना दुखावणारी किंवा आरोप करणारी नसावी. त्याउलट तुमच्या पोस्टिंग्जमुळे इतरांच्या आनंद आणि ज्ञानात भर कशी पडेल हे पाहा.