आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समूहभान उडते आकाशी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जी गोष्ट आपल्यापाशी नाही, तिचंच माणसाला सर्वाधिक आकर्षण वाटत राहतं. पुराणातला एक श्रावणबाळ सोडला, ज्ञात प्राचीन इतिहासातला एक बुद्ध आणि अपवादात्मक संत परंपरा सोडली, तर भारतीय संस्कारांना परोपकार, दयाबुद्धी, कुटुंब आणि नातेसंबंधांच्या पलीकडच्या सेवा-शुश्रूषेचं तसं वावडंच राहिलं आहे. त्यामुळेच कदाचित, व्यक्ती आणि कुटुंबकेंद्री भारतीय समाजसमूहाला या गुणांचं भारी आकर्षण आहे. तशी संधी मिळाली की, तो ती मनापासून घेतोही आणि त्याची वारेमाप जाहिरातबाजीसुद्धा करत फिरतो. दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, गारपीट, भूस्खलन, भूकंप अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्ती आणि आग, अपघात, दहशतवादी हल्ले या मानव निर्मित आपत्तींप्रसंगी समूहाच्या परोपकारी आणि दानशूर वृत्तीचे दर्शन घडतेच घडते. सगळे एकदिलाने मदत कार्यात उतरतात. त्यांच्यात झळकणारा माणुसकीचा पाझर गहिवर आणतो.
अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर, अतिवृष्टीमुळे चेन्नई पाण्यात बुडाली, तेव्हा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदप्रमाणे चेहऱ्याच्या-बिनचेहऱ्याच्या अनेकांनी बेसहारा पूरग्रस्तांना आसरा दिला. त्यांची निवाऱ्याची, अन्न आणि औषधपाण्याची व्यवस्था केली. चेन्नईत आलेल्या पुराने उडालेली दैना आटोक्यात येते, तोच मुंबईच्या कांदिवली उपनगरातल्या दामू नगर भागात एकाच वेळी ४०-५० गॅस सिलेंडर्सचा स्फोट होऊन तासा-दोन तासांत घरादारांची राखरांगोळी होऊन हजारो संसार उघड्यावर आले. ते सुन्न करणारं दृश्य पाहून कांदिवलीतल्या समाज समूहांनी दुर्घटनाग्रस्तांना त्वरित पैसे-अन्नधान्य-भांडीकुंडी-कपडेलत्ते पुरवले. कुणी म्हणेल, मग यात प्रॉब्लेम काय आहे?
यात प्रॉब्लेम एवढाच आहे की, आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘फ्रॉम दी हार्ट अॅट सोल’ धावून जाणारे भारतीय समाज समूह नैसर्गिक असो वा मानवनिर्मित आपत्ती टाळण्याबाबत मात्र कायमच बेफिकिरी दाखवतात. घटना घडून गेल्यानंतर हे समूह जागे होतात आणि घटना विस्मृतीत गेली की, आलेली जागही आटोपते.
दहा वर्षांपूर्वी २६ जुलैला मुंबईत आलेला पूर, आता चेन्नईला काही दिवसांपुरतं अपंगत्व देणारी अतिवृष्टी किंवा फेब्रुवारी-मार्च दरम्यान मराठवाड्याने अनुभवलेली गारपीट या साऱ्या घटना वातावरण बदलाचा दुष्परिणाम आहेतच, पण त्याहीपेक्षा माणसाच्या बेमुर्वतपणाचाच परिपाक अधिक आहेत.

पुणे असो वा मुंबई किंवा नाशिक असो वा नागपूर; नगरनियोजनाचे वाजलेले तीन-तेरा, डोंगरदऱ्यांत होत असलेली बेबंद जंगलतोड, नद्या-नाले आणि ओढ्यांचे रोखलेले वा वळवलेले प्रवाह, त्यात होत चाललेले मनमानी प्रदूषण या सगळ्यामागे सार्वजनिक नीति-नियमांबाबत समूहांमध्ये असलेला तुच्छताभाव आहेच; परंतु याशिवाय माणूस आणि निसर्गाला शून्य किंमत देण्याची अक्षम्य बेफिकिरी या सगळ्याला कारणीभूत आहे.
म्हणजे, पाच हजार वर्षांच्या या थोर संस्कृतीचे पाईक असलेल्या या समूहांमध्ये ‘माणूस स्वस्त आणि तो सोडून इतर सगळं मौल्यवान’ अशी सध्याची स्थिती आहे. पण आपली संस्कृती थोर म्हणत इंग्लंड-अमेरिकेला कितीही शिव्या घातल्या तरीही ज्यांनी टुरिझमच्या पलीकडे पाश्चात्त्य देश समजून घेतले आहेत, त्यांना जाऊन विचारलं तर कळेल, संस्कृतीभ्रष्ट, उच्छृंखल, बेबंद अशी आपण दूषणे देत असलेल्या इंग्लंड-अमेरिकेत माणसाची किंमत आजही सर्वोच्च आहे. कायद्याने आखून दिलेले नीति-नियम पाळणे हा तिथल्या समाजसमूहांचा खरा गुण आणि खरा धर्म आहे. तिथे आठ वर्षांचा नातू आणि त्याचे ऐंशी वर्षाचे आजोबा अतिवृष्टी-अतिबर्फवृष्टी वा आगीनंतर आवश्यक ठरणाऱ्या आपत्ती नियोजनाबाबत सारखेच सजग आहेत. तिथे माणसाच्या हातून दुर्घटना घडून नये, यासाठी कायद्याने आखलेल्या नियमांकडे धर्मवचन म्हणून पाहणारे बहुसंख्येने आहेत. म्हणूनच, ‘आम्ही दोनच प्रवासी होतो तरीही बस सोडली गेली. आपल्या इथल्यासारखं गिऱ्हाईकं मिळ‌वण्यासाठी ड्रायव्हरने गावभर दहा फेऱ्या नाही मारल्या किंवा पेट्रोलचा खर्च परवडत नाही, म्हणून बसच कॅन्सल नाही केली.’ किंवा ‘सासूबाईंना अचानक छातीत दुखू लागलं, पण पुढच्या दहाव्या मिनिटाला एअर अॅम्ब्युलन्स आली आणि विसाव्या मिनिटाला सासूबाई ऑपरेशन टेबलवर गेल्यासुद्धा.’ अशा असंख्य सत्य कहाण्या आपल्या कानावर येत राहतात. हल्ली तर नातवांच्या ओढीने इंग्लंड-अमेरिकेत गेलेले आजी-आजोबा न विसरता आपल्या भारतातल्या नातेवाइकांना वॉट्स अॅप-फेसबुकवरून ‘अगं, सक्काळी सक्काळी घराबाहेर पडले, समोर पाहते तर काय, हरणांची देखणी जोडी बॅकयार्डमध्ये मस्तपैकी फिरत होती.’ असे कौतुकभरले मेसेज आणि सोबत त्या देखण्या हरणांचे फोटोही फॉरवर्ड करतात.
आता, फोन केल्यानंतरच्या पाचव्या मिनिटाला एअर अॅम्ब्युलन्स किंवा परसदारी हरणांची जोडी हे दृश्य भारतीयांसाठी दिवास्वप्न असलं तरीही नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्तींना रोखण्यासाठी समूह म्हणून सिरिअस होणं अवघड आहे का? खरं तर ते अवघड आहेच, कारण कुटुंब-नातेवाइकांपलीकडे फार्फार तर जात-धर्मापलीकडे समूहांच्या संवेदनांचा परीघ विस्तारत नाही. आणि कुटुंब-नातेवाइकांपलीकडच्या माणसांना माणूस म्हणून फारशी किंमतही मिळत नाही. मात्र आपत्ती घडून गेल्यानंतर पदर खोचून-बाह्या सरसावून समूह म्हणून आम्ही सज्ज होतो. पण महापुरानंतर होणारी हानी टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करता आली असती, आगीनंतरचा विध्वंस रोखण्यापेक्षा आग लागूच नये या दृष्टीने नियोजनपूर्वक पावलं उचलता आली असती, याचे समूह म्हणून भान काही येत नाही. नुसतं सभा-संमेलनातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणणं सोप्पं आहे. वचन प्रत्यक्षात अमलात आणायची वेळ येते तेव्हा नेमकं हे वैश्विक भान आकाशात उडत जातं. असं एकदा नाही पुन:पुन्हा होत राहतं. पण असं होत राहणं म्हणजे आत्मनाश ओढवून घेणं आहे, आणि हाच इशारा चेन्नईच्या पुराने आणि कांदिवलीच्या आगीने दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी आटोपलेल्या ‘पॉरिस क्लायमेट चेंज समेट’मध्ये सामील तज्ज्ञ-अभ्यासकांनी अशाच काही आत्मनाशी समाजसमूहांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता इशारा दिलेले ते आत्मनाशी आम्ही नाही आहोत, असा संस्कृतीचा दाखल देत उद्दामपणा करण्याऐवजी होय, तो इशारा आमच्यासाठीच आहे, याचा स्वीकार करणं नितांत गरजेचं आहे. कारण, तसा तो केला गेला तरच मार्ग दिसण्याची शक्यता आहे. अन्यथा, पुन्हा पुढच्या वर्षीचा चेन्नईचा पूरही ठरलेला आहे, पुरानंतरचा हाहाकारही ठरलेला आहे आणि कांदिवली पाठोपाठ इतरही गाव-शहरांत आगीचे तांडव ठरलेले आहे.
‘आपली कुटुंबव्यवस्था आणि या व्यवस्थेने रुजवलेली मूल्ये हा आपल्या राष्ट्राचा पाया आहे’ हे वाक्य टाळ्या घेण्यापुरतेच ठीक आहे. कारण, याच कुटुंबव्यवस्थेत निर्माण झालेल्या दोषांनी (कुटुंबीय-नातेवाईक-हितचिंतक इत्यादींचे कोटकल्याणास कायदेकानू वाकवून सर्वोच्च प्राधान्य देणे वगैरे...) खरं तर भारताचा पाया भुसभुशीत करण्यास प्रारंभ केला आहे. चेन्नईचा पूूर किंवा कांदिवलीच्या आगीच्या निमित्ताने ते ठळकपणे अधोरेखितही झाले आहे.
- रसिक टीम
divyamarathirasik@gmail.com
बातम्या आणखी आहेत...