आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांमधील अतिचंचलता गुणकारी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोहम (बदललेले नाव) शांत बसतोस की मारू तुला? सोहमच्या आईने चिडून त्याला मारले. हे पाहा डॉक्टर, हा एक मिनिटसुद्धा शांत बसत नाही, सारखा चलबिचल करत असतो. कुणाच्या ना कुणाच्या खोड्या करतो. वर्गात इकडून तिकडून फिरत असतो. कुणाला पण मारतो. दगड फेकतो. विचित्र प्रकारचे आवाज काढतो. शाळेत तर रोजच मार खातो. तरीही परिणाम शून्य. काय करावे काही समजत नाही. हा इतका चंचल आहे की, शेवटी मीच थकते, सोहमच्या आईने हताशपणे सांगितले. चौफेर उधळणारा मनाचा हा बेबंदपणा म्हणजेच एडीएचडी ही लहान वयात कमी-अधिक प्रमाणात दिसणारी एक अवस्था आहे.


निदान : मनाच्या या बेबंदपणाचे म्हणजेच अतिचंचलतेचे निदान करण्यासाठी काही निकष वापरले जातात. जर मुलाचे वय सातपेक्षा जास्त असेल व खालीलपैकी साधारणपणे 7-8 समस्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मुलांमध्ये आढळून आल्यास त्याला अतिचंचलता असे निदान करतात.


1. कुठल्याही गोष्टीत एकाग्रता नसणे. 2. असंयम, अधीरता. 3. गरज नसताना बडबडणे किंवा अति बोलणे. 4. एका जागी बसल्यावर सतत हात किंवा पाय हलवणे 5. एखाद्या गोष्टीत टिकून किंवा ध्यान न राहता अर्धवट सोडून दुसरी तिसरी किंवा वारंवार गोष्ट बदलणे. 6. शाळेच्या ठिकाणी किंवा दैनंदिनीमधल्या वस्तू हरवणे किंवा विसरणे. 7. एखाद्या खेळामध्ये किंवा कामामध्ये खूप वेळ लक्ष केंद्रित न होणे. 8. समस्येचा प्रश्न पूर्ण होण्याआधी विचार न करता पटकन उत्तर देणे. 9. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता धोकादायक वागणे उदा. स्वयंपाकातील चाकूचा खेळामध्ये वापर, आगपेटीच्या काड्या पेटवणे, उंचावरून उडी मारणे, कड्यावरून वाकणे इ. 10. दुस-याच्या कामात किंवा संभाषणात व्यत्यय आणणे. 11. कुठल्याही अवांतर गोष्टींनी उदा. रेडिओ-टेप-टी.व्हीचा आवाज, माणसाचे बोलणे, पक्ष्यांचा आवाज इत्यादीमुळे पटकन लक्ष विचलित होणे. 12. इतर लोक आपल्याशी बोलताना त्याकडे लक्ष नसणे. 13. कुठल्याही सूचना पाळताना त्रास होणे किंवा एकामागून एक सांगितलेल्या सूचनांप्रमाणे अर्थ लावून कृती करता न येणे. 14. खेळत असताना आपल्या खेळण्याची वेळ येईपर्यंतदेखील शांत न बसणे.


कारणे : काही मुलांमध्येच हा दोष का आढळतो, याबाबत मानसशास्त्रज्ञांचे काही निष्कर्ष आहेत.
1. आनुवंशिक - दोन्ही सख्ख्या लहान -मोठ्या भावंडांमध्ये किंवा दोन्ही जुळ्या भावंडांमध्ये किंवा आई-वडिलांना होता म्हणून मुलांमध्ये आढळणे.
2. मेंदूकार्य बिघाड - मेंदूतील काही रसायनांमध्ये कमतरता वा दोष असणे.
3. अविकसित अवस्था - पूर्ण दिवस भरण्याअगोदर बाळाचा जन्म होणे.
4. गरोदरपणी मातेने मद्यपान, धूम्रपान केल्याने होणारे दुष्परिणाम.
5. अन्नातील कृत्रिम रंग वा घटकद्रव्ये.
लक्षणे : ही मुले चंचल, अधीर व पटकन चिडणारी असल्यामुळे समाजात वावरताना कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. उदा. कुणाशी मैत्री-नाते जोडताना जुळवून घेणे यांना कठीण जाते. सहज मूड बदलणे. विरोध सहन न होणे, लहानसहान गोष्टींमुळे लक्ष विचलित होणे. कधी काय करतील याचा नेम नसणे, इतरांच्या अंगावर थुंकणे. या मुलांच्या वेंधळ्या स्वभावामुळे वस्तू सांभाळून ठेवणे, नियमित गृहपाठ करणे, वेळेवर आवरणे काम करणे या मुलांना जमत नाही. त्यामुळे मूल जाणूनबुजून आपल्याला त्रास देत असल्याचा पालकांचा समज होतो. त्यामुळे पालक, शिक्षक सर्वच या मुलांना वारंवार रागावतात, शिक्षा करतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो व भावनिक खच्चीकरण होते. पण या समस्येतून स्वत: बाहेर पडणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होऊन बसते. म्हणूनच अशा समस्यांमध्ये वेळेतच योग्य व्यक्तींचे समुपदेशन व मार्गदर्शन, औषधोपचार, योग्य पद्धतीची वागणूक यांना महत्त्व आहे.
उपाययोजना : अशा मुलांची वागणूक व व्यक्तिमत्त्व याचा अभ्यास करून दिलेली होमिओपॅथिक औषधी या समस्येची तीव्रता कमी करण्यास खूपच मदत करतात. यापैकी काही औषधी अशी : -
1. अर्सेनिक अल्बम - चंचलपणा, आसपासच्या माणसांशी न बोलणे, एकांतवेळी बरे वाटणे. इतरांना त्रास अवस्थेत बघताना आनंदी होणे.
2. बेलडोना - चटकन मैत्री करणारी मुले, रागात आक्रमकता, अंग व चेहरा लाल होणे, गरम होणे, अतीशय उत्साही, कुठल्याच गोष्टीत लक्ष न लागणे
3. चामोमीन - घाईघाईने बोलणे, उद्धटपणा, डॉक्टर तपासणी करताना बाहेर पळून जाणे, दुस-यांना चूक ठरवणे, साधे-सरळ उत्तर न देणे.
4. टेरेन्शुला - सतत किंचाळणे, विचित्र आवाज काढणे, जोराने संगीत, वाद्य वाजवणे किंवा ऐकणे, कामामध्ये विसराळूपणा, इतर मुलांना त्रास देणे, विनाकारण मारणे, ढकलणे, धोक्याची जाणीव नसणे. याशिवाय फॉस्फरस, ल्युबरकपुलिनम, लायकोपोडियम, झिंकम मेट ही औषधी उपयोगी पडतात.
दरम्यान, होमिओपॅथी उपचाराने या अवस्थेपासूनसुद्धा मुक्त होण्यास मदत होते. पण औषधांची मात्रा (डोस) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे. मुळापासून संपूर्ण आजाराचे उच्चाटन हे होमिओपॅथीचे तत्त्व असल्यामुळे या उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल वाढत आहे.


drmukesh001@gmail.com