आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काही सरकारी खेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपलं सरकार कामचोर आहे, असं प्रत्येक मतदाराला प्रामाणिकपणे वाटतं. प्रशासन म्हणजे केवळ रुक्ष कारभार, निरस भाषणबाजी, कंटाळवाणी कार्यशैली असं समीकरणच तयार झालं आहे. पण गेली काही वर्षं आम्ही सरकारी आणि प्रशासनिक कामांचा सखोल, सरुंद आणि सलांब अभ्यास केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की सरकार आणि प्रशासन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात काम करत असतात. किंबहुना त्यांनी आपल्या क्रीडा संस्कृतीत अनेक नव्या खेळांची भर टाकली आहे आणि काही जुन्या खेळांना नवा अर्थ मिळवून दिला आहे. सत्ताधारी असो की विरोधक, प्रशासकीय अधिकारी असो की कर्मचारी, मंत्रालयापासून अगदी ग्रामपंचायतीपर्यंत हे खेळ मोठ्या हिरिरीने सातत्याने खेळले जातात. अशाच काही खेळांची ही ओळख.


तळ्यात-मळ्यात : यालाच प्रशासकीय भाषेत ‘निलंबन’ असंही म्हणतात. यात विरोधी पक्षावर राज्य असतं आणि सरकारी पक्ष खेळत असतो. काही विरोधक गंमत म्हणून कधी एखाद्या पोलिसांशी ‘झिम्माफुगडी’ खेळतात, तर कधी मंत्री किंवा कधी मुख्यमंत्र्यांशीही ‘भ’ किंवा ‘म’च्या भाषेतून बोलतात. ती भाषा समजत नाही म्हणून मंत्री सभापतीकडे तक्रार करतो. सभापती मग मोठ्या उत्साहाने त्या विरोधकाला तळ्यात जायला सांगतात, म्हणजेच निलंबित करतात. विरोधकही खोटंखोटं चिडत निघून जातात. पण काही दिवसांनी सरकारी पक्षाला पुन्हा खेळायची हुक्की येते, तेव्हा ते अगोदरच्या खेळाडूंना आधी मळ्यात घेतात. असा हा खेळ कायम खेळला जातो.


दांडू लपवणे : संसद, नगरपालिका अशा ठिकाणी हा खेळ खेळला जातो. विशेषत: नगरपालिकांमध्ये हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. तिथं एक बिनपाण्याची विहीर असते आणि त्यात एक न बुडणारं टेबल असतं. त्यावर एक राजदंड असतो. त्याचं रक्षण एक बिनकामाचा आयुक्त करत असतो. विरोधी पक्षातले नगरसेवक त्याची नजर चुकवून हा राजदंड लंपास करण्याचा प्रयत्न करतात. आयुक्ताचे रक्षक त्याला विरोध करतात. मोठ्या हुशारीनं हा खेळ खेळला जातो.


स्लो-फायलिंग : स्लो सायकलिंगपासून प्रेरणा घेऊन हा खेळ काही डोकेबाज सरकारी अधिका-यांनी शोधून काढला. नेत्यांनाही तो फारच आवडला. त्यामुळे सगळीकडे हा खेळ सामान्य लोकांसोबत मोठ्या उत्साहाने खेळला जातो. यात सामान्य लोकांच्या कामाच्या फायली आधी निवडण्यात येतात. खेळाच्या पहिल्या पायरीत या फायली कोणालाच मिळणार नाहीत अशा ठिकाणी लपवल्या जातात. कोणी त्याची चौकशी केली तर त्याला ‘चौकशी चालू आहे, फाइलच मिळत नाही, पुन्हा अर्ज करा, साहेब बदलून गेले, नियम बदलले’ असली मजेशीर कारणं सांगून वाटेला लावलं जातं. मग लोक काकुळतीला येऊन ‘आम्ही हरलो’ असे म्हणतात. तेव्हा अधिकारी त्यांना, ‘फायलीवर वजन नाही, वजन ठेवा, तेव्हाच ती पुढे सरकेल’ असं सांकेतिक भाषेत सांगतात. लोकांना कळत नाही की वजन ठेवल्यानं फाइल पुढे कशी सरकणार? पण तीच तर या खेळातली गंमत असते. तुम्ही स्वत:च खेळून बघा आणि अनुभवा ही जादू.


खो-खो : हा खेळ नेतेमंडळी सरकारी अधिका-यांसोबत खेळतात. काही सरकारी अधिकारी अतिशय नाठाळ, हट्टी आणि दुस-याच्या कामात सारखं नाक खुपसणारे असतात. विशेषत: नेतेमंडळींच्या जिव्हाळ्याच्या कामात ‘खो’ घालायला यांना फारच आवडतं. ते सामान्य लोकांच्या बाजूने असतात. असली चीटिंग नेत्यांना आवडत नाही. मग ते त्या सरकारी अधिका-याला खो देतात. त्याला मग या खेळाच्या नियमाप्रमाणे दुसरीकडे जावं लागतं. यालाच सरकारी भाषेत ‘बदली’ म्हणतात.


शेम-शेम : हा खेळ विरोधक आपल्या सत्ताधारी मित्रांसोबत खेळतात. सारखं सारखं ‘लोककल्याणाची कामं’ करून कंटाळा आला की दोन्ही पक्ष हा खेळ खेळू लागतात. मग कोणत्या तरी फालतू कारणावरून विरोधक आधी सत्ताधारी पक्षाविरुद्ध जोरदार नारेबाजी करतात. सत्ताधारी मंडळी मग विरोधकांच्या या कामाचा तेवढ्याच जोरात निषेध करतात. अशी दोघांची मस्त करमणूक झाली की त्यांच्यात लोककल्याणाची नवीन कामं करण्याचा नवा उत्साह संचारतो (असं म्हणतात.).


भानामती : भानामतीसारखे जादूचे प्रकार होत नाहीत असं अंनिस दाभोलकरांनी सांगून ठेवलंय. सरकारनंही त्यांच्या या म्हणण्याला पाठिंबा दिलाय. तरी गंमत म्हणजे, खुद्द मंत्रालयातच भानामतीचे प्रकार घडत असतात. हा जादूचा खेळ कोण खेळतो, याची माहिती आम्हालाही मिळालेली नाही. पण साधारण त्याचं स्वरूप आम्हाला कळलं आहे. एखाद्या लोकोपयोगी कामात काही भ्रष्टाचार झाला की त्याच्याशी संबंधित फायली ठेवलेल्या जागेत अचानक आग लागते. त्यात या फायली जळून जातात. त्यामुळे सरकारला पुन्हा नव्यानं काम करण्याची संधी मिळते.


विशेष सूचना : वरील सर्व खेळ अत्यंत धोक्याचे आहेत. केवळ तज्ज्ञ नेतेमंडळी आणि सरकारी अधिकारीच ते खेळू शकतात. सामान्य लोकांनी हे खेळ आपल्या जबाबदारीवर खेळावेत.
त्यांचा खेळखंडोबा झाल्यास गरीब नेत्यांना आणि अधिका-यांना दोष देऊ नये.