Home »Magazine »Madhurima» Sonal Supate Short Story

आत्‍ताचा क्षण...

आयुष्यात नवा दिवस आहे की नाही कुणाला माहितेय? जिथं अगदी पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, अशा जगात फ्यूचर सिक्युअर करण्यात क

सोनल सुपाते | Oct 10, 2017, 00:05 AM IST

  • आत्‍ताचा क्षण...
आयुष्यात नवा दिवस आहे की नाही कुणाला माहितेय? जिथं अगदी पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, अशा जगात फ्यूचर सिक्युअर करण्यात काय अर्थ? अन् तेही त्यासाठी वर्तमानाचा बळी देऊन. फक्त एकच ध्येय आता प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं.

आमच्या भंडारे सरांचा तास म्हटल्यावर आम्ही सगळे गडबडीत तयार होऊन निघालो. तसं सर कडक असायचे, ओरडायचे वगैरे असं काही नव्हतं. फक्त त्यांचा तास सगळ्यांना आवडायचा, कोणालाही तो चुकवू नये असंच वाटायचं. तो गाठण्यासाठीच खरं तर आमच्या सगळ्यांची तारांबळ उडालेली. आम्ही लवकर उठून तयार झालेलो. तरीही कसली गडबड चालली होती आमचं आम्हालाच कळेना.

मी पोहोचले. बाकीचे माझे मित्रमैत्रिणी पण आले होते वेळेवर. १५-२० मिनिटं लवकरच पोहोचलो होतो आम्ही तासाला. सर आले. त्यांनी वर्गात प्रवेश करताच आमचा सुरू असलेला गोंधळ शांत झाला. सरांचा हसतमुख चेहरा पाहताच आम्ही अजून प्रसन्न झालो.

सर म्हणाले, ‘आज तास राहू द्या. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सरांनी असं म्हटल्यावर आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. मग सर बोलू लागले, मी आता येत होतो. येताना मला आपल्या मैदानातील पिंपळाच्या झाडावर दोन सुंदर सुतार पक्षी बसलेले दिसले. सकाळचं कोवळ ऊन अन् थंडीत तो खूपच सुंदर दिसत होते.’ नंतर त्यांनी आम्हाला विचारलं, ‘तुमच्यापैकी किती जणांनी ते पाहिलं?’
सगळा वर्ग एकदम शांत.

‘कुणीच नाही? बरं जाऊ द्या... फारच सुंदर आहेत ते पक्षी कुणाला पाहायचे असतील तर जाऊन बघून या...’
‘सर! आतापर्यंत ते असतील तिथे?’ सूरज उवाच.
‘हो ना सर, गेले असतील उडून.’ पल्लवी उवाच.
‘बरोबर. मग तुम्ही पण येता येताच का नाही पाहिले?’
सर असं म्हणताच आम्ही सगळे एकदम बोलू लागलो.

‘सर, तुमचं लक्ष गेलं तसं सगळ्यांचंच कसं जाईल? अन् कशावरून आम्ही येताना ते तिथं असतील?’
सर म्हणाले, ‘बरं. ते जाऊ दे. मग तुम्ही काय बघितलं ते सांगा? ती बाभळीला घरटं बांधणारी चिमणी? ते गुलाबाच्या फुलावर पडलेलं दंव, ती झेंडूच्या फुलांवरची फुलपाखरं? बरं ते राहिलं, आपल्या मैदानावरच्या हिरव्यागार गवतात एकटंच एक पिवळं फूल आलंय. ते तरी पाहिलं की नाही?’
आता मात्र सगळा वर्ग शांत होता. आमच्यापैकी कुणीच यातलं काहीच पाहिलं नव्हतं, जे की सहज नजरेला पडणार होतं. एकही गोष्ट एकानेही पाहिलेली नव्हती.

‘बघा तासाच्या गडबडीत, त्याच्या विचारात तुम्ही हे सगळं मिस केलं. अन् वरून तर आता मी तास पण घेणार नाही,’ सगळ्यांना असं शांत पाहून सरच बोलू लागले. ‘ये जवानी ये दिवानी’ पिक्चर पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी? त्यातला रणवीर अन् दीपिका पाहिली ना?’ आम्ही सगळ्यांनी माना हलवल्या - अर्थात ‘हो’ अशाच.

सर बोलू लागले. ‘काही तरी जास्त मिळवण्याच्या अपेक्षेत आपण बहुधा, नव्हे तर बहुतेकदा आपल्याकडे जे आहे ते पण गमावून बसतो. जसं सकाळी घडलं. फुलांचं उमलणं. त्यावरचं दंव, त्या पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळच्या निसर्गाची मुक्त उधळण. सगळंच तर मिस केलं ना आपण? हे सारं नसेल पुढच्या क्षणाला.’

इंग्रजीत एक म्हण आहे - Stop and smell the roses.
‘थांबा. थांबा अन् अनुभवा या फुलांचा गंध, हे क्षण. पुढे काय होईल, काय मिळेल याचा विचार सोडा, जे जे आहे ते या क्षणात अनुभवा, हा क्षण जगा. भविष्यात आपण ठरवू तसंच सगळं होत नसतं. म्हणून भविष्याचा विचार सोड. वर्तमानात जग. वर्तमानातील प्रत्येक गोष्टीचा आनंद साजरा कर. याचा अर्थ असा नक्कीच नाही की, ध्येय ठरवू नको, त्यासाठी कष्ट करू नको. ध्येयप्राप्तीसाठी निघालो आहोत, ज्या रस्त्यावरून निघालोय तो प्रवास मोठा आहे मग प्रवासाचा आनंद घेत घेतच ध्येयापर्यंत पोहोचलो तर उलट आनंदच ना! प्रत्येक क्षण सातत्याने भूतकाळात जमा होत जातो. परत न येण्यासाठी. कधीही. प्रत्येक जाणारा क्षण आपल्याला एक एक पाऊल पुढे घेऊन जातोय. कदाचित. अंताकडे.’

आम्ही सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. आता उलट सरांनी तास न घेतल्याचं दु:ख नव्हतं. या तासातच खूप काही शिकलो होतो ना आम्ही. या वरच्या गोष्टीतल्या ओळी खूपदा वाचल्यासारख्या, कॉपी केल्यासारख्या वाटतीलही प्रत्येकाला. कारण प्रत्येकाला असं कोणी ना कोणी भेटलेलं असतं या क्षणांना मुठीत घे जग म्हणून सांगणारं. कधी कधी पुस्तकातून, कधी स्वत:सोबत घडलेल्या घटनांमधून, कधी हिंदी, इंग्लिश, मराठी पिक्चरमधून. थ्री इडियट्समधला रँचो असो वा ये जवानी ये दिवानीमधले दीपिका नि रणवीर, ‘हा क्षण’ पुस्तकातील सिद्धार्थ असो वा आपल्या आयुष्यात असणारा ‘तो’. तो असतोच. या क्षणात जगा हा संदेश देणाराच नव्हे, तर त्याच्यासोबत आपणही प्रत्येक क्षण जगतो असा तो. स्वत:ला व स्वत:सोबत जगाला एक नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा एक नवा कोपरा देणारा. आयुष्य तर असंही जगतच असतो ना, फक्त हे शिकवतात कसं जगायचं. आयुष्यात नवा दिवस आहे की नाही कुणाला माहितेय? जिथं अगदी पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, अशा जगात फ्युचर सिक्युअर करण्यात काय अर्थ? अन् तेही त्यासाठी वर्तमानाचा बळी देऊन. फक्त एकच ध्येय आता प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं. ध्येयाकडे जायचंच आहे अन् निघालोही आहे. फक्त आता प्रायोरिटी बदलल्या.

आता माहीत झालंय आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवंय.
ही गोष्ट त्या सर्वांसाठी ज्यांचं सगळं व्यवस्थित आहे. (असंच दर दिवशी स्वत:ला कितीदा तरी समजवणाऱ्यांना). तो रोजचा झाकोळणारा सूर्य त्यांना विचारत असतो, आज काय नवीन केलंस बाळ? आज तू स्वत: किंवा दुसऱ्यानं आनंदी राहावं असं काय केलंस? अन् दररोजच्याप्रमाणे ‘काहीच नाही’ असं उत्तर देणाऱ्यांसाठी तो सूर्य मिश्किलपणे हसून जातो. अन् ज्यांच्या काळजात धस्स होतं, मनाला हेलकावे बसतात त्या सर्वांसाठी. थोडा वेळ विचार करणारे अन् परत ‘पहिले पाढे पंचावन्न’ म्हणून परत कामाला लागणाऱ्या त्या सर्वांसाठी ही गोष्ट.
- सोनल सुपाते, देगाव, सोलापूर, supate231sonal@gmail.com

Next Article

Recommended