आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonali Navangul Article About Overcoming Fear Of Public Speaking

पलीकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे एक मजेदार जाणीव मला होतेय. ज्या मर्यादा, जे त्रास, जी आव्हानं नको वाटायची, दमायला व्हायचं तेच सगळं मला फार हवं झालंय. टिटॅनसचं इंजेक्शन दुखतं म्हणून टाळण्याकडं कल असायचा आणि आता इंजेक्शनच्या पहिल्या अवघडलेपणानंतर दुखणा-या बाजूवर झोपलं तर ती ठसठस, कमरेत अडकलेला आवंढा जाम हवासा वाटतो. हे काय आहे? अनेक कवी ‘दु:ख हवे मज’ असं म्हणून ‘नकोशी’ भावना एन्जॉय कशी करतात हे समजण्याची सुरुवात होतेय असं वाटलं.


जे नकोय ते हवंसं होणं आणि त्यातून ‘नकोशी’ भावना गळून पडण्याचे लहान लहान क्षण असतात... त्याकडं पाहताना आपण आपल्याला सापडत जातो.


मला शाळा बुडवायचं निमित्त हवं होतं. ‘कथाकथनाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जायचं तर तयारी नीट करते,’ म्हणून मी घरी थांबले. 8-9 वर्षांची होते. काहीतरी चाळा म्हणून बैलगाडीच्या जूजवळ लोंबकाळले. झोका घेतला आणि बैलगाडी पडली पाठीवर. अपघात गंभीर होता. जन्मभर पुरून उरेल इतका मोठा! तेव्हापासून ध्वनिक्षेपक म्हणजे माइक वजाच झाला आयुष्यातून. त्यानंतर अकरा-बारा वर्षांनी अचानक कामाचा भाग म्हणून सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट लिहिणं आणि अर्थातच कार्यक्रम निभावणं अंगावर येऊन पडलं. कुठंतरी अपघाताशी माइकचा संदर्भ मनातून जुळला होता म्हणून असावं कदाचित, माइक हातात घेण्याचा प्रसंग आला नाही, येऊ दिला नाही. मधल्या काळात ‘जगणं’ शिकण्यात झरझर वेळ निघून गेला, तेव्हा माइकबद्दल मनात अकड तयार झालीय का, हेही तपासलं नाही. नोकरीचा भाग म्हणून कामाला नकार देता येण्यासारखा नव्हता. मी का जमणार नाही हे सांगून पाहिलं, पण मला काम सोपवणारे पी.डी. देशपांडे म्हणाले, ‘सूत्रसंचालन तूच करायचं आहेस. तुला जमेल असं मला वाटतंय. शंका आली तर विचार.’


कार्यक्रमाची पूर्ण माहिती घेऊन मी मला जमेल तसं काही लिहून काढलं, पण कार्यक्रमाच्या आठवणीनंही घशाला कोरड पडायची. वाटायचं, शब्दच फुटणार नाही तोंडातून. बोबडं काही बोलून जाईन आणि सगळे हसतील. कार्यक्रमाला पाचसातशे माणसं होती आणि सूत्रसंचालन कोण करणार - तर माझ्यासारखी मुलगी, जी अनेक वर्षांत माइकवर बोलणं काय, साधं स्टेजवर गेलेली नव्हती. जिचं शाळेत-कॉलेजात जाणंही केवळ परीक्षेपुरतं. म्हणजे संवादबिंवाद काय तो घरच्यांशी आणि मित्रमैत्रिणींशी. जाहीर बोलायचं कसं?


कार्यक्रमाला अवघे दोन तास उरले असताना मला अचानक थंडीच वाजून आली. ताप मोजून पाहिला तर शंभरच्या वर होता. सारखा खोकला येत होता. व्हीलचेअरवर बसले तर ती चालवताना दंडात पेटके आल्यासारखं वाटायला लागलं. मी पी.डी. देशपांडेंना फोन केला सांगायला की ‘माझं काही खरं नाही. मला माफ करा. मी जबाबदारी पार पाडू शकण्याच्या अवस्थेत नाहीये. माझं स्क्रिप्ट घेऊन तुम्हीच कार्यक्रम पार पाडा.’ त्यांना माझ्या आवाजावरून अंदाज आला असावा, तेवढे ते चतुर आहेत. त्यांनी मला माझं काही सांगूच दिलं नाही, उलट ‘स्टेजजवळ ये, मला काही माहिती हवीय ती दे.’ म्हणून मलाच पुन्हा कामाला लावलं. माझी जाम तंतरली होती. मी छान कपडे घालून, थोडासा मेकअप वगैरे करून, सूत्रसंचालनाचे कागद घेऊन तिथं पोहोचले. त्यांनी मला बोलू न देता किरकोळ कामांत गुंतवून ठेवलं आणि वेळ पुढे सरकला. कार्यक्रमाचे पाहुणे आल्यावर ‘ऑल द बेस्ट! आता सुरू करायला हरकत नाही,’ म्हणत ते निसटले.


‘नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत!’ असं म्हणताना मला जोरदार हुडहुडी भरली. पहिल्यांदा तर माझा आवाज प्रतिध्वनीसारखा माझ्या कानात दडे मारून गेला. थरथरला! दहा मिनिटं उलटल्यावर मला माइकवर आवाजाचा थ्रो कसा होतोय याचा अंदाज आला. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी थंडी पळून गेली. थोडा चोरलेला वाटणारा आवाज मोकळा, स्वच्छ झाला. कार्यक्रमासाठी बोलतेय अशी औपचारिकता गळून गेली आणि त्यात आपोआप मनाच्या तळातला हृद्य भाव उमटत गेला. कार्यक्रम संपल्यावर ‘नव्या सूत्रसंचालिके’ची पाठ थोपटायला गर्दी झाली तेव्हा मी आतून मऊमऊ होत गेले. थोडंसं समोरच्यानं रेटल्यामुळं आणि पर्याय न उरून मीही स्वत:ला रेटत नेल्यामुळं मला अचानक एक मज्जा मिळून गेली होती.


काही क्षणांपूर्वी आपण ज्या गोष्टीकरिता हताश होतो त्या गोष्टीवर आपण व्यवस्थित मांड ठोकून स्वार झालोय याचा अचाट आनंद मला झाला होता. भिऊन राहण्यापेक्षा भीती कशी आहे हे थेट अनुभवून त्यातून पार जाणं अधिक सुखाचं होतं. माझी बोबडी वळेल, लोक हसतील, मी ज्यांच्यासोबत काम करते अशांना माझी फजिती वर्षभर हसवेल, माझी ‘पोझिशन’ खराब होईल ही सगळी अ‍ॅझम्प्शन्स मी रचलेली होती... रचलेल्या गोष्टी ख-या आहेत का हे तपासून पाहिल्याशिवाय मत बनवायचं नाही हा मी घेतलेला धडा माझ्या मर्यादेवर केलेलं सीमोल्लंघनच ठरला.


कालांतरानं ‘चतुरंग रंगसंमेलना’त अशाच एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. ताण होताच, पण तो अधिक परिपक्व आणि संख्येनं भरपूर म्हणजे 6 ते 8 हजार रसिकांच्या उपस्थितीचाही होता. त्या काळात मी वेगळ्या त-हेनं जगापासून तुटलेली होते, त्यामुळं प्रसिद्ध चेहरेही माझ्यासाठी अनोळखी. कार्यक्रम संपला. कौतुकबिवतुक स्वीकारत मी गर्दीतून बाहेर पडत होते. एका आजोबांनी मला थांबवलं. तसे अंगकाठीने ताठ. अंगात झब्बा, डोक्यावर गोल, वेगळ्या प्रकारची टोपी, डोळ्यांवर चष्मा, पण त्या चष्म्याआडून डोकावणारे डोळे खूप मायाळू. आवाजाला धार असली तरी माझ्याशी बोलतानाचा स्वर प्रेमाचा. म्हणाले, ‘मुली, खूप छान केलंस. मोठी होशील! मला ओळखलंस का?’
मी एका टोकाकडून दुस-या टोकाकडे मान हलवत ओळखलं नसल्याची प्रामाणिक कबुली दिली. आजोबा हसले, म्हणाले, ‘मी प्रभाकर. प्रभाकर पणशीकर! नाटकात कामं करतो.’ त्यांनी स्वत:चं नाव उच्चारलं आणि माझ्या अंगभर रोमांच उभे राहिले. माझ्या सूत्रसंचालनाला इतक्या मोठ्या व्यक्तीनं दाद दिली हे खरंच वाटत नव्हतं. संकोचून आणि बावचळल्यामुळं मी त्यांच्याशी दोन शब्द धड बोलूही शकले नाही.


आणखी काही वर्षांचा काळ मध्ये गेला. पणशीकरांनी या दुनियेतून एक्झिट घेतलेली होती. कोल्हापुरातल्या माझ्या एका कार्यक्रमानंतर मी बाहेर पडले तर एक आजी आवर्जून मला भेटण्यासाठी थांबलेल्या होत्या. त्यांनी खूप मायेनं पाठ थोपटली, आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, ‘मोठी होशील!’ त्या आजींबरोबरच्या त्यांच्या मैत्रिणीनं ओळख करून दिली, ‘या विजयाताई. प्रभाकरपंत पणशीकरांच्या मिसेस!’ मी पुन्हा एकदा मोहरून गेले. प्रभाकरपंतांची आठवण त्यांना आवर्जून सांगितली. अगदी त्यांच्यासारखाच आशीर्वाद प्रभाकरपंतांनी मला सूत्रसंचालन ऐकून दिला होता ही आठवण विजयातार्इंनाही सुखावून गेली आणि त्यांनी प्रेमभरानं माझा हात दाबला. आयुष्यात असे अनेक प्रसंग. आपली वैगुण्यं किंवा मर्यादा, त्यांच्याविषयीचं भय आपण पार करू शकलो, सीमोल्लंघन करू शकलो तर कालच्या मर्यादा या आपल्यासाठी वर्तमानातील शक्तिस्थळं ठरू शकतात... आजमावून पाहा!