आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sooni Taraporwala Article About Ambedkarite Thoughts

एकांडा क्रांतिसूर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१४ एप्रिल रोजी येणाऱ्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जीवनावर अाधारित, डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या पटकथाकार सूनी तारापोरवाला यांचं आंबेडकरी विचारांचा प्रभाव अधोरेखित करणारं हे मनोगत.
मी तेव्हा लाॅस एंजल्समध्ये राहात होते, मीरा नायरच्या बुद्ध या चित्रपटासाठी राॅबर्ट बोल्टच्या पटकथेचं पुनर्लेखन करत होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजे एनएफडीसीचे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी मला विचारलं, डाॅ. आंबेडकरांवर चित्रपट करायचाय, पटकथा लिहीशील का म्हणून. आणि त्यांनी मला धनंजय कीर यांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं चरित्र पाठवून दिलं. मला तोवर डाॅ. आंबेडकरांचं जीवन वरवर माहीत होतं, पण त्यातले कंगोरे ठाऊक नव्हते, कारण भारतीय इतिहासातून ते जवळपास बाहेर फेकले गेले आहेत. मी त्वरित होकार दिला आणि तब्बल एक दशकभर चालू राहिलेल्या प्रवासाला सुरुवात केली. अर्थात तेव्हा हे माहीत नव्हतं की, प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित व्हायला दहा वर्षं लागतील म्हणून.
पटकथा लिहायची म्हणजे संशोधन करायला हवं होतं, खूप अभ्यास करायची गरज होती. मग मी वाचत गेले, वाचत गेले, वाचत गेले. जे जे त्यांनी इंग्रजीत लिहिलं होतं, ते वाचलं. त्यांची मराठीतील भाषणं इंग्रजीत अनुवादित करून घेतली. त्यांच्याशी संबंधित ज्या ज्या व्यक्ती होत्या, त्यांना भेटले. सोबत अर्थातच माझे सहलेखक कै. दया पवार होते. दुसरे सहलेखक अरुण साधू यांच्याशीही अनेकवार चर्चा केल्या.
वाचताना, त्यांच्या परिचितांशी बोलताना बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व उलगडत गेलं. इतके पैलू होते त्यांना, की कशाचं कौतुक करावं. त्यांचं मन, बुद्धिमत्ता, धैर्य, करुणा हे सगळंच प्रशंसनीय होतं, पण मला सगळ्यात जास्त स्पर्श करून गेलं ते त्यांचे एकटेपण. ते एकटेच त्यांनी निवडलेल्या रस्त्याने चालत होते. जातीमुळे त्यांना त्यांच्या बौद्धिक पातळीवरच्या समविचारी लोकांनी परिघाबाहेर ठेवलं होतं, आणि त्यांच्या वर्तुळात, त्यांच्या माणसांमध्ये त्यांच्या प्रज्ञेशी जुळवून घेता येईल असं कोणीच नव्हतं.
इतकी वर्षं झाली चित्रपट प्रदर्शित झाला त्याला, पण कितीतरी आठवणी अजून ताज्या आहेत मनात. स्मरणीय क्षण चित्रपटातले आणि त्यांच्या आयुष्यातलेही. उदा. लंडनमध्ये शिकत असताना, शिक्षण अर्धवट सोडून ते बडोद्याला आले आणि त्यांना बडोद्याच्या महाराजांकडे नोकरी करावी लागली. या अशा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसाला बडोद्यात राहायला जागा मिळाली नाही. त्यांच्या हाताखालचे कर्मचारी कामाच्या फाइल्स त्यांच्या टेबलावर लांबून फेकत, जवळ जाऊन ठेवण्याचीही तसदी ते घेत नसत. सर्वांसाठी असलेल्या माठातलं पाणी त्यांना सहकारी पिऊ देत नसत. आणि या सगळ्यावर मात करून त्यांनी आणि त्यांच्या करोडो अनुयायांनी मिळवलेला विजय, ज्या धर्माने त्यांना इतकं हीन वागवलं त्याला मागे सोडून गौतम बुद्धांच्या मार्गाने त्यांचं परिवर्तन. हे सगळं कायमसाठी मनावर काेरलं गेलंय.
बाबासाहेबांची शिकवण, मूल्यं, तत्त्वं यातलं बरंचसं भारतातल्या मोठ्या समुदायाला माहीतच नव्हतं, पूर्वीसुद्धा. त्यामुळे त्यांची शिकवण आज विस्मरणात गेलीय का, हा प्रश्नच पडायला नको. दलितांनी मात्र त्यांची तत्त्वं खूप प्रेमाने आणि जिद्दीने सांभाळली आहेत, जपली आहेत. त्या माणसाने एकट्याने या सगळ्यांना गाळातनं वर उचललं आणि त्यांचं स्वत्त्व त्यांना मिळवून दिलं. त्यामुळे ते त्यांना विसरूच शकणार नाहीत व कायमच हृदयाशी जपून ठेवतील. गांधीजींसारख्या अनेक नेत्यांचे वरवर गोडवे जरूर व सतत गायले जातात, पण आंबेडकरांसारखं हृदयातलं स्थान फारसं कुणाच्या नशिबात नाही. त्यांचं एक ऋण मला नेहमीच जाणवत राहील, सर्वच भारतीय स्त्रियांना ते वाटायला हवं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे केलं, ते अतुलनीय होतं. हिंदू कोड बिलाद्वारे स्त्रियांना समान हक्क देण्याचा त्यांचा प्रयत्न अपुराच राहिला, आणि त्यांना कायमच त्याचं शल्य बोचत राहिलं असेल.
बाबासाहेब हा भारतातला एक लक्षणीय माणूस होता.
जय भीम!
सूनी तारापोरवाला, मुंबई
soonitara@gmail.com